समताधिष्ठित समाज व्यवस्था टिकण्यासाठी बंधुतेची गरज
डॉ. श्रीपाल सबनीस यांचे प्रतिपादन; विश्वबंधुता साहित्य परिषदेतर्फे रयत विचारवेध संमेलन
पुणे: “समाजातील सर्व घटकांना शिक्षणाची दारे खुली व्हावीत, त्यातून समताधिष्ठित समाजाची निर्मिती व्हावी, यासाठी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी समता व बंधुतेचा विचार घेऊन रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून गोरगरिबांना सन्मान दिला. ही समताधिष्ठित समाज व्यवस्था भविष्यातही टिकून राहावी, यासाठी बंधुतेची गरज आहे,” असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक, माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.
बंधुता लोकचळवळीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त विश्वबंधुता साहित्य परिषद आणि रयत शिक्षण संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रयत विचारवेध संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. श्रीपाल सबनीस बोलत होते. नवी पेठेतील पत्रकार भवनात झालेल्या कार्यक्रमात संमेलनाध्यक्ष बंधुताचार्य प्रकाश रोकडे, उद्घाटक रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव डॉ. शिवलिंग मेनकुदळे, कवयित्री ललिता सबनीस, स्वागताध्यक्ष प्रा. डॉ. अरुण आंधळे, विद्यार्थी शिक्षक साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. सविता पाटील, कवी प्रा. चंद्रकांत वानखेडे, साहित्यिक प्रा. शंकर आथरे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. तसेच सबनीस यांच्या हस्ते डॉ. शिवलिंग मेनकुदळे, डॉ. अरुण आंधळे, डॉ. सविता पाटील, चंद्रकांत वानखेडे, शंकर आथरे, संगीता झिंजुरके आणि जनसंपर्क व पत्रकारितेतील योगदानाबद्दल जीवराज चोले यांचा संविधान देऊन सन्मान करण्यात आला.
डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले , “स्वार्थाच्या राजकारणापायी समाज तुटत चालला आहे. माणूस जातीधर्माच्या, वर्णभेदाच्या चौकटीत विभागाला जात आहे. अशावेळी समाजाला एकसंध ठेवण्यासाठी बंधुत्वाची भावना जनमानसात रुजायला हवी. भाऊरावांनी शंभर वर्षांपूर्वी केलेले कार्य पुढे घेऊन जाण्याचे काम प्रकाश रोकडे करत आहेत. धर्मांधतेचे राजकारण आपण हणून पाडायला हवे. मतभेदांना दूर करून सामाजिक समरसता जोपासण्याचे काम बंधुतेचा विचार करतो. बंधुतेची ही चळवळ विश्वव्यापी होतेय, याचा आनंद वाटतो.”
डॉ. शिवलिंग मेनकुदळे म्हणाले, “समता आणि बंधुता जपणारा माणूस आपल्याला बनायचे आहे. शाहू महाराजांकडून ज्या पद्धतीने कर्मवीर भाऊराव पाटील यांनी प्रेरणा घेतली तशी प्रेरणा आपल्याला घयायची आहे. अशा महापुरुषांचा विचार जपण्यासाठी आज बंधुतासारख्या संस्थांची गरज आहे. पारंपरिक बुरसटलेल्या विचारांना छेद देऊन भाऊराव पाटलांनी जसे शिक्षणाला प्राधान्य दिले त्याप्रमणे आज प्रत्येकाने शिक्षित होणे गरजेचे आहे. समाजात जर का सर्व बाजूनी परिवर्तन घडवायचे असेल तर शिक्षणाशिवाय याला पर्याय नाही. “
बंधुताचार्य प्रकाश रोकडे म्हणले, “छत्रपती शिवाजी महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी नेहमीच रयतेचा विचार केला. आपल्याला लोकशाहीचे, मानवतावादाचे धडे त्या काळापासून दिले आहेत. मात्र अलीकडच्या काळात रयतेला जाती-धर्माच्या नावाने लढवले जात आहे. आरक्षणाच्या नावाखाली देशातील रयतेला एकमेकांसोबत झुंजत ठेवले जात आहे. ही गोंधळाची परिस्थिती निवारण्यासाठी हे रयत संमेलन आहे. आज प्रत्येकाच्या घरात संविधान असणे महत्त्वाचे आहे. साहित्यिकांनी अपप्रवृत्तीच्या विरोधात आवाज उठवला पाहिजे.”
प्रा. डॉ. अरुण आंधळे यांनी प्रास्ताविक केले. संगीता झिंजुरके यांनी अमोघ सूत्रसंचालन केले. रमेश पतंगे यांच्या सनई चौघडा वादनाने कार्यक्रमाला चांगलीच रंगत आली. प्रा. शंकर आथरे यांनी आभार मानले.