माता, मातृभाषा आणि मातृभूमीला विसरु नका

माता, मातृभाषा आणि मातृभूमीला विसरु नका

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे प्रतिपादन; सुर्यदत्ता स्त्रीशक्ती राष्ट्रीय पुरस्कारांचे वितरण

मुंबई : “जीवनात आपण कितीही यशाच्या शिखरावर पोहोचलो तरी माता, मातृभाषा आणि मातृभूमीला विसरता कामा नये. आपल्या जीवनाचे मूळ माता असून, तिच्याकडून मिळालेले संस्कार आणि जीवनामुल्ये आपल्याला घडवत असतात. मातृशक्तीचा सन्मान नेहमी सन्मान करा,” असे प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केले.

सुर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट पुणेतर्फे ‘सुर्यदत्ता स्त्रीशक्ती राष्ट्रीय पुरस्कार-२०२१’ वितरण सोहळ्यात राज्यपाल कोश्यारी बोलत होते. राजभवनात झालेल्या या पुरस्कार सोहळ्यावेळी सुर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया, उपाध्यक्षा व सचिव सुषमा चोरडिया, मुख्य विकास अधिकारी सिद्धांत चोरडिया, संचालक प्रा. सुनील धाडीवाल, प्रा. अक्षीत कुशल, अधिष्ठाता प्रा. नूतन जाधव, प्रा. मिलिना राजे, प्रा. रोहित संचेती आदी उपस्थित होते.

भारतीय चित्रपट सृष्टीतील योगदानाबद्दल अभिनेत्री निशिगंधा वाड, विशाखा सुभेदार, उर्वशी रौतेला, विशेष मुलांसाठीच्या कार्याबद्दल सिस्टर लुसी कुरियन, शिक्षण व महिला सक्षमीकरण क्षेत्रातील कार्याबद्दल डॉ. स्वाती लोढा, आरती देव, साहित्यातील कार्याबद्दल ललिता जोगड, सायबर सुरक्षा जागृतीबद्दल ऍड. वैशाली भागवत, क्रीडा क्षेत्रातील
कामगिरीबद्दल कविता राऊत-तुंगार, सामाजिक कार्याबद्दल तृषाली जाधव, कलासंगीत क्षेत्रातील कार्याबद्दल पलक मुच्छाल यांना ‘सुर्यदत्ता स्त्रीशक्ती पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. यावेळी कवयित्री ललिता जोगड यांनी डॉ. संजय चोरडिया यांच्यावर केलेल्या १३५० ओळींच्या कवितेचे प्रकाशन करण्यात आले.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी म्हणाले, “आनंदाच्या किंवा दुःखाच्या क्षणी प्रथम आपल्या तोंडी आई येते. तिच्या शिकवणीतून आपण घडत असतो. आपण ज्या क्षेत्रात कार्य करतोय, ते सर्वश्रेष्ठ झाले पाहिजे, यावर भर द्यावा. विश्वात बंधुभाव रुजवण्यासाठी, तसेच सर्वसमावेशक विकासासाठी प्रत्येकाने आपले योगदान दिले पाहिजे.”

प्रा. डॉ. संजय चोरडिया म्हणाले, “विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या महिलांना दरवर्षी ‘सुर्यदत्ता स्त्रीशक्ती राष्ट्रीय पुरस्कार-२०२१’ प्रदान करण्यात येतो. राज्यपालांच्या हस्ते यंदा या अकरा महिलांना सन्मानित करताना आनंद होतो आहे. महिला सक्षमीकरण आणि समाजातील आदर्श व्यक्तिमत्त्वांचा सन्मान करणे आणि पुढील कार्यासाठी प्रेरित करणे आपले कर्तव्य आहे.”

निशिगंधा वाड, विशाखा सुभेदार, डॉ. वैशाली भागवत, पलक मुच्छाल, उर्वशी रौतेला यांनीही मनोगत व्यक्त केले. सिमरन आहुजा यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *