
विद्यार्थी साहाय्यक समितीच्या विद्यार्थी विकास केंद्रातर्फे आयोजित वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. समितीचे कार्यकारी विश्वस्त तुषार रंजनकर, विद्यार्थी विकास केंद्राचे अध्यक्ष प्रभाकर पाटील, विद्यार्थी विकास केंद्राच्या कार्यवाह सीमा होस्कोटे, आपटे वसतिगृहाच्या पर्यवेक्षिका सविता भुक्ते उपस्थित होते.
शेखर गायकवाड म्हणाले, “स्पर्धांमध्ये सहभागी व्हावे, यश मिळवावे; पण स्पर्धेपलीकडे जाणे गरजेचे आहे. त्यासाठी एकत्र अभ्यास करायला शिका. त्यातून आपल्या कच्च्या विषयांची माहिती होते आणि सुधारण्यासाठी वाव मिळतो. तसेच इतर कुणाचे कुठले विषय कच्चे, पक्के आहेत, हे समजते. त्यातून कुणाला कुठली मदत, मार्गदर्शन हवे आहे, हेही कळते. सहकार्याची भावना वाढीस लागते. संतुलित आणि समतोल विचार महत्त्वाचा आहे. तो अंगिकारा. माहितीपेक्षा ज्ञान मिळवा. तुमच्यातील ऊर्जा, चैतन्य, कल्पकता आणि वेगळेपणाची समाजाला गरज आहे. ते सामर्थ्य प्राप्त करा.”