विकास प्रकल्पांमध्ये दस्तावेजीकरण, सुरक्षेला अधिक प्राधान्य हवे

विकास प्रकल्पांमध्ये दस्तावेजीकरण, सुरक्षेला अधिक प्राधान्य हवे

अविनाश पाटील यांचे प्रतिपादन; बिल्डर्स असोसिएशनतर्फे रमेश धूत यांना ‘निर्माणरत्न २०२४’ जीवनगौरव पुरस्कार प्रदान
 
पुणे : “बांधकाम क्षेत्रात तंत्रज्ञान, कलात्मकतेचा अंतर्भाव होत असल्याने दिवसेंदिवस बांधकामाची गुणवत्ता वाढली आहे. बांधकाम क्षेत्रात कार्यरत विकासकांनी दस्तावेजीकरण व सुरक्षेकडे अधिक प्राधान्याने पाहायला हवे. नगरनियोजन विभागाकडून ग्रामीण भागातही अनेक प्रकल्प उभारण्यात येत आहेत. त्याच्या बांधणीत शहरी भागातील चांगल्या विकासकांनी पुढाकार घ्यायला हवा,” असे प्रतिपादन राज्याच्या नगर नियोजन विभागाचे संचालक अविनाश पाटील यांनी केले.

बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया (बीएआय) पुणे सेंटरतर्फे आयोजित आणि बी. जी. शिर्के कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड प्रायोजित २८ व्या ‘बीएआय-शिर्के वेल बिल्ट स्ट्रक्चर कॉम्पिटिशन २०२४’ या पुरस्कार वितरण सोहळ्यात अविनाश पाटील बोलत होते. हॉटेल शेरेटॉन ग्रँडमध्ये झालेल्या कार्यक्रमावेळी ऑल इंडिया ‘बीएआय’चे अध्यक्ष के. विश्वनाथन, ‘बीएआय’ पश्चिमचे उपाध्यक्ष आनंद गुप्ता, बी. जी. शिर्के कंपनीचे उपाध्यक्ष बिपीन कुलकर्णी, डब्ल्यूबीएससीचे अध्यक्ष धैर्यशील खैरेपाटील, बीएआय पुणे सेंटरचे अध्यक्ष सुनील मते, उपाध्यक्ष अजय गुजर, महेश मायदेव, सचिव राजाराम हजारे, खजिनदार शशिकांत किल्लेदारपाटील आदी मान्यवर उपस्थित होते. यंदा ‘बीएआय-पद्मश्री बी. जी. शिर्के जीवनगौरव पुरस्कार’ (निर्माणरत्न २०२४) धूत उद्योग समूहाचे रमेश धूत यांना प्रदान करण्यात आला. पुणेरी पगडी, शाल, सन्मानचिन्ह, मानपत्र आणि एक लाख अकरा हजार रोख रुपये असे पुरस्काराचे स्वरूप होते. धूत यांनी पुरस्काराची रक्कम कामगारांच्या मुलांना शैक्षणिक मदत करण्यासाठी ‘बीएआय’कडे सुपूर्द केली. यावेळी ‘बीएआय’च्या इंजिनीअरिंग डायरीचे प्रकाशन करण्यात आले.

यावेळी बांधकाम क्षेत्रातील विविध विभागात उल्लेखनीय काम करणाऱ्या कंपन्यांना सन्मानित करण्यात आले. जीआरआयटी-एन्व्हायरॉन्मेंटल डिझाईन प्लस रिसर्च स्टुडियो, प्राईड बिल्डर्स, निर्माण डेव्हलपर्स, कव्हलकेड प्रॉपर्टीज यांना निवासी श्रेणीत, प्राईड बिल्डर्स एलएलपी, विलास जावडेकर इको शेल्टर्स, फिनिक्स ग्रुप हैद्राबाद यांना कमर्शियल श्रेणीत, पुण्याबाहेरील उद्धव गावडे बारामती यांना निवासी व कमर्शियल श्रेणीत, एस्कॉन प्रोजेक्ट्स, पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांना औद्योगिक, रोहन बिल्डर्स इंडिया, ए. एस. देसाई इन्फ्रास्ट्रक्चर यांना पायाभूत सुविधा उभारणी, हर्ष कंस्ट्रक्शन्स यांना सरकारी प्रकल्प उभारणीत, मिलेनियम इंजिनियर्स अँड प्रायव्हेट लिमिटेड यांना वर्क अप टु बेअर शेल श्रेणीत, अक्रॉस नोड्स ट्रान्सीट सोल्युशन्स यांना बेस्ट ब्राऊनफिल्ड प्रोजेक्ट, वृक्ष लँडस्केप्स यांना लँडस्केप या श्रेणीमध्ये पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

रमेश धूत म्हणाले, “या पुरस्काराची सुरुवात झाली, तेव्हा निवड समितीचा अध्यक्ष होतो. आज बीएआयच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारताना आनंद होतो आहे. अभियंता झाल्यावर बांधकाम क्षेत्रात एक छोटा कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम सुरु केले. आज याचे उद्योग समूहात रूपांतर झाले आहे. माझ्या वाटचालीत घरच्यांचा सहभाग मोलाचा आहे. स्थापत्य अभियंत्यांकडे कठोर मेहनत, प्रामाणिकपणा जपावा. अभियंत्यांचे काम हे सैन्यासारखे आहे. स्थापत्य अभियंत्याला कुठेही जाऊन काम करावे लागते.”

के. विश्वनाथन म्हणाले, “बीएआय पुणे सेंटरचे कार्य कौतुकास्पद आहे. उच्च दर्जाची ही स्पर्धा घेऊन बांधकाम क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व समूहांना सन्मानित करण्याचे काम प्रेरक आहे. यातून बांधकाम विभागातील नावीन्यता सर्वांसमोर येत आहे.”

आनंद गुप्ता यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. सुनील मते यांनी स्वागत-प्रास्ताविक केले. राजाराम हजारे यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय आपटे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *