डॉ. आशिष लेले यांची माहिती
पुणे: कार्बन डायऑक्साइडपासून ‘डायमिथील इथर’ (डीएमई) या एलपीजी गॅसला पर्याय ठरणाऱ्या इंधनाची निर्मिती करणारे तंत्रज्ञान राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेने (एनसीएल) विकसित केले आहे. एकीकडे हवेतील कार्बनचे प्रमाण कमी करतानाच एलपीजी या विदेशातून आयात होणाऱ्या इंधनावरील अवलंबित्व कमी करणे, असा दुहेरी फायदा ‘एनसीएल’च्या तंत्रज्ञानामुळे होणार आहे.
‘एनसीएल’चे संचालक डॉ. आशिष लेले यांनी या क्रांतिकारी तंत्रज्ञानाबाबत गुरुवारी माहिती दिली.’फेसबुक लाइव्ह’च्या माध्यमातून झालेल्या या संवादात डॉ. लेले यांनी ‘एनसीएल’च्या पुढील दहा वर्षांतील संशोधनाच्या योजना मांडल्या.
हवामान बदल, प्रदूषण, विविध रोग यांसारख्या सध्याच्या काळातील समस्यांवर विज्ञान-तंत्रज्ञानाच्या साह्याने उपाय शोधण्यासोबत एकविसाव्या शतकातील तंत्रज्ञानाचा देशातील उद्योग क्षेत्राला फायदा करून देण्याचे ‘एनसीएल’चे लक्ष्य असल्याचे डॉ. लेले यांनी मुलाखतीत सांगितले.
ते म्हणाले, ‘हवामान बदल ही चालू शतकांतील प्रमुख समस्यांपैकी एक आहे. पृथ्वीचे तापमान वाढण्यात कार्बन डायऑक्साइडचा मोठा वाटा आहे. याच कार्बन डायऑक्साइडपासून मिथेनॉल आणि मिथेनॉलपासून डायमिथील इथरचा (डीएमई) रेणू तयार करणारे तंत्रज्ञान ‘एनसीएल’ने विकसित केले आहे. ‘डीएमई’ हा एलपीजी इंधनाला पर्याय ठरू शकतो. सध्या देशात वापरात असलेला बहुतेक एलपीजी आपल्याला आयात करावा लागतो. ‘डीएमई’ मुळे पैशांची मोठी बचत होतानाच ‘उज्ज्वला’सारख्या योजनेलाही बळकटी मिळू शकेल.’
भविष्यातील ऊर्जास्रोत ठरणाऱ्या हायड्रोजनबाबत डॉ. लेले म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय हायड्रोजन मिशनची घोषणा गेल्या वर्षी केली. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेमध्ये (सीएसआयआर) हायड्रोजन ऊर्जेसंबंधीच्या संशोधनाचा समन्वय ‘एनसीएल’ तर्फे केला जात आहे. नुकतेच ‘एनसीएल’ आणि सेंट्रल इलेक्ट्रोकेमिकल रिसर्च इन्स्टिट्यूटच्या सहयोगातून ‘केपीआयटी’ ने हायड्रोजन फ्युएल सेल बसचे प्रारूप विकसित केले. लवकरच हायड्रोजन इंधनाचा पर्याय लहान-मोठ्या विविध वाहनांसाठी उपलब्ध होऊ शकेल.’
‘कोव्हिड काळात अनेक समस्या नव्याने समोर आल्या आणि त्यावर तातडीने उपाय शोधण्यासाठी नव्याने तंत्रज्ञानाची निर्मितीही झाली. करोनाच्या पहिल्या, दुसऱ्या लाटेत देशात पीपीई किटचा दररोज सुमारे दोनशे टन कचरा तयार होत होता. पीपीई किटच्या प्लास्टिकवर प्रक्रिया करून त्यापासून दैनंदिन वापरातील वस्तू बनवण्याचे तंत्रज्ञान ‘एनसीएल’ने विकसित केले. हे तंत्रज्ञान कोव्हिडनंतरच्या काळातही उपयुक्त ठरणार असून, मायक्रो प्लास्टिकच्या समस्येवरही तोडगा ठरू शकेल,’ असेही डॉ. लेले म्हणाले.
एकविसाव्या शतकात जागतिक स्तरावर तंत्रज्ञानात मोठे बदल होत असून, जगाशी स्पर्धा करतानाच आपण आत्मनिर्भर राहू याचे भानही आवश्यक असल्याचे डॉ. लेले यांनी नमूद केले.