माखजन: माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ माखजन व श्री. अशोकजी पोंक्षे कलादालन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय निसर्ग चित्र व दशक्रोशिस्त चित्रकला स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. सदर स्पर्धेसाठी माखजन दशक्रोशीतील प्राथमिक व माध्यमिक अशा एकूण ३५ शाळांतील एकूण २४८ स्पर्धक विद्यार्थी सहभागी झाले होते. शालेय विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा तीन गटात पार पडली, तर खुल्या गटात जिल्हास्तरीय निसर्ग चित्र स्पर्धेसाठी जिल्ह्यातील नामांकित चित्रकार व कला महाविद्यालयातील विद्यार्थी चित्रकार अशा एकूण ४८ स्पर्धकांनी भाग घेतला.
सदर स्पर्धेत या व्यवसायिक चित्रकारांनी माखजन व आसपासच्या परिसरातील नयनरम्य स्थळांची अप्रतिम अशी चित्रे रेखाटली. या स्पर्धेला सह्याद्री स्कूल ऑफ आर्ट चे संस्थापक चेअरमन व प्रसिद्ध चित्रकार प्रकाश राजेशिर्के यांनी सदिच्छा भेट दिली व उदयोन्मुख चित्रकारांना प्रोत्साहित केले व संस्थेने जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारची भव्य स्पर्धा राबविली म्हणून कौतुक केले. या स्पर्धेचे बक्षीस वितरण कार्यक्रम ९ डिसेंबरला आंबव पोंक्षे येथील श्री. सूर्यनारायण संस्थेचे अध्यक्ष, ज्येष्ठ रंगकर्मी व सामाजिक कार्यकर्ते अशोक पोंक्षे यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. या जिल्हास्तरीय स्पर्धेचे यशस्वी आयोजन संस्थेचे अध्यक्ष किशोर साठे, उपाध्यक्ष शशिकांत घाणेकर, सचिव दीपक पोंक्षे, सहसचिव दीपक शिगवण, संस्था पदाधिकारी सुभाष सहस्त्रबुद्धे, संजय सहस्त्रबुद्धे, मुख्याध्यापिका रुही पाटणकर, पर्यवेक्षक अंबादास घाडगे, कलाशिक्षक अमोल पाटील व इतर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहयोगाने यशस्वीपणे पार पडले.