पुणे : “दिव्यांग बांधवांच्या सन्मान आणि स्वावलंबनासाठी समाजाकडून होत असलेले प्रयत्न समाधानकारक असून, अशा उपक्रमांमुळे त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडत आहेत. मात्र अजूनही म्हणावा तसा सन्मान दिव्यांगांना आजही मिळत नाही,” असे प्रतिपादन पद्मश्री सन्मानित मुरलीकांत पेटकर यांनी केले. दिव्यांग बांधवांना मोटराईज्ड व्हीलचेअरचे योग्य प्रशिक्षण मिळाल्यास त्याचा मोठा फायदा होईल, असेही त्यांनी नमूद केले.
समदृष्टि, क्षमताविकास व अनुसंधान मंडळ (सक्षम) पश्चिम महाराष्ट्र प्रांत यांच्या वतीने वानवडी येथील जांभूळकर चौकातील दिव्यांग कल्याणकारी संस्था व संशोधन केंद्र येथे मोटराईज्ड व्हीलचेअर व कॅलिपर वितरण कार्यक्रमात मुरलीकांत पेटकर होते. प्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पुणे महानगराचे सेवा प्रमुख महेश मानेकर, सक्षमचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य डॉ. अविनाश वाचासुंदर, अण्णा विसपुते, ऑर्थो-स्पाईन तज्ज्ञ डॉ. विरेंद्र ओस्तवाल, राष्ट्रीय महासचिव उमेश अंधारे, प्रकल्प समन्वयक रविंद्र कोपरगांवकर, पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे अध्यक्ष ऍड. मुरलीधर कचरे, सचिव नरेंद्र बापट आदी उपस्थित होते.
सक्षम पश्चिम महाराष्ट्र प्रांत व अल्टीस कंपनीच्या सीएसआर उपक्रमातून अस्थिबाधित दिव्यांगांना निःशुल्क मोटराईज्ड व्हीलचेअर देण्यात आल्या. तसेच दिव्यांग कल्याणकारी संस्था व वल्कन टेक्नॉलॉजी यांच्या सहकार्याने कॅलिपरचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमात एकूण २० मोटराईज्ड व्हीलचेअर आणि २५ कॅलिपरचे वाटप करण्यात आले.
प्रास्ताविकात नरेंद्र बापट यांनी येत्या काळात ५०० मोटराईज्ड व्हीलचेअर वाटप करण्यात येणार असल्याचे सांगितले. या उपक्रमामुळे दिव्यांग बांधवांच्या स्वावलंबनाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलले गेले, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
