कर्मवीर भाऊरावांचा वारसा जपणारे ‘धारेश्वर प्रतिष्ठान’
धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठानच्या रौप्य महोत्सवी वर्षांच्या सांगता समारंभानिमित्त महाराष्ट्रासह देशाच्या जडणघडणीत बहुमूल्य योगदान दिल्याबद्दल ज्येष्ठ नेते, खासदार पद्मविभूषण शरद पवार यांची कृतज्ञता ग्रंथतुला, तसेच संस्थेच्या स्मरणिकेचे प्रकाशन आज (शुक्रवारी, ता. २३) होत आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठानच्या २५ वर्षांच्या वाटचालीचा घेतलेला आढावा…
– अनिकेत चव्हाण, संचालक, धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठान
गोरगरीब, बहुजन व मागास वर्गातील मुलामुलींना ज्ञानदान करणासाठी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्था उभारली. कर्मवीर भाऊरावांच्या विचारांचा हा वारसा घेऊन १९९९ मध्ये संवेदनशील व संस्कारी मनाच्या सोपान उर्फ काकासाहेब बंडोजी चव्हाण यांनी धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठानची मुहूर्तमेढ रोवली. सत्संग, संस्कार, अभ्यासूवॄत्ती, वैचारिक प्रगल्भता, विवेक असा सामाजिक, शैक्षणिक, आध्यात्मिक दॄष्टीकोन लाभलेल्या प्रगल्भ विचारांच्या कल्याणकारी संस्कारातून साकारलेले काकासाहेब चव्हाण भाऊरावांच्या विचारांने प्रेरित होऊन गेली २५ वर्षे धायरी व परिसरातील गोरगरीब, वंचित घटकांतील मुलामुलींना दर्जेदार व सर्वांगीण शिक्षण देण्यासाठी समर्पित भावनेने काम करत आहेत.
धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठानच्या आज ११ शाखा कार्यरत असून, या शैक्षणिक संकुलात आठ हजाराहून अधिक विद्यार्थी शिकत आहेत. २५० पेक्षा अधिक शिक्षक ज्ञानदानाचे काम करत आहेत. ‘उद्यमेन हि सिध्यन्ति कार्याणि न मनोरथैः’ या सिद्धांतानुसार गुणवत्तापूर्ण, रोजगाराभिमुख शिक्षण देण्यावर संस्थेने भर दिला आहे. प्री-प्रायमरी ते व्यावसायिक अभ्यासक्रम असलेल्या या शैक्षणिक संकुलातून हजारो विद्यार्थी घडले आहेत. नालंदा गुरुकुल, नालंदा इंग्लिश मीडियम स्कुल, कै. बंडोजी खंडोजी चव्हाण पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यालय, कै. शेवंताबाई बंडोजी चव्हाण कन्याशाळा व पूर्व प्राथमिक विद्यालय, कै. बंडोजी खंडोजी चव्हाण माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कला, वाणिज्य व विज्ञान शाखा, कै. नामदेव बंडोजी खंडोजी चव्हाण माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग, इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन अशा विविध शाखा आहेत.
‘एखाद्या भुकेल्या व्यक्तीला आपण अन्न देऊन त्याची एकवेळची भूक भागवू शकतो; मात्र, त्याला शिक्षण देऊन स्वावलंबी केले, तर त्याच्या आयुष्यभराच्या भुकेचा प्रश्न सुटेल,’ अशी धारणा घेऊन काकासाहेब चव्हाण सातत्याने २५ वर्षे ज्ञानदानाचे हे कार्य करताहेत. यंदा या रौप्य महोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभानिमित्त त्यांचे प्रेरणास्थान असलेल्या शरद पवार यांच्याप्रती कृतज्ञता म्हणून ग्रंथतुला करत आहेत. या ग्रंथतुलेतील ग्रंथाचे, पुस्तकांतील विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचावेत, असा त्यांचा प्रयत्न आहे.