सकल हिंदू समाजाच्या वतीने पुण्यात ठिय्या आंदोलन
छत्रपती संभाजी महाराजांच्या अवमानप्रकरणी इम्तियाज जलील यांच्यावर कठोर कारवाईची मागणी
पुणे: धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या अवमानप्रकरणी ‘एमआयएम’चे माजी खासदार इम्तियाज जलील व अन्य समाजकंटकांवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने पुण्यात मंगळवारी ठिय्या आंदोलन करण्यात आले. मार्केटयार्ड पोलीस स्टेशनसमोर शेकडो हिंदू कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

काही दिवसांपूर्वी माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात छत्रपती संभाजीनगर ते मुंबई तिरंगा रॅली काढण्यात आली होती. यावेळी महामार्गांवर असलेल्या धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या फलकावर काळे फासून त्यांचे नाव पुसण्याचा विखारी प्रयत्न केला गेला. तसेच या रॅलीदरम्यान असंवैधानिक घोषणा देऊन हिंदू बांधवांच्या भावना दुखावल्या. याचा निषेध करत असून, या रॅलीचे आयोजक इम्तियाज जलील यांच्यासह जिहादी कृत्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, यासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात ठिय्या आंदोलन करण्यात आले.
याबाबत मार्केटयार्ड पोलीस स्टेशनबाहेर आंदोलन करणाऱ्या हिंदू कार्यकर्त्यांनी म्हटले की, छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला काळे फासण्याची हिंमत शिवरायांच्या भूमीत केली. त्याविरोधात तात्काळ इम्तियाज जलील यांच्यावर गुन्हा दाखल करावा, यासाठी सकल हिंदू समाज आणि शिवभक्तांच्या वतीने संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात आंदोलन सुरु आहे. पोलिसांकडून जलील यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही, तोवर आम्ही ठिय्या आंदोलन सुरूच ठेवणार आहोत, असा आक्रमक पवित्रा कार्यकर्त्यांनी घेतला. तिरंगा रॅलीवेळी छत्रपती संभाजीनगर मार्गावरील गोळवाडी फाटा, जालना महामार्गावरील देवळवाडी फाटा, महिको कंपनी, शेलगाव ब्रिज, मात्रेवाडी यासह इतरत्र फलकांना काळे फासून विद्रूप केल्याचा आरोप सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.
एका हातात तिरंगा धरायचा आणि दुसऱ्या हाताने आमचे दैवत छत्रपती संभाजीराजेंचा द्वेष करायचा. छत्रपती संभाजीराजेंनी इस्लाम स्वीकारला नाही, त्याचा राग त्यांच्या मनात आहे. तिरंगा यात्रेतून हा द्वेष दिसून आला. संविधानाचा चुकीच्या पद्धतीने वापर करणाऱ्या जलील यांच्याविरोधात प्रकाश आंबेडकर, रामदास आठवले व इतर दलित नेत्यांनीही आवाज उठवला पाहिजे, अशी भूमिका कार्यकर्त्यांनी मांडली.
                            
 
                     
             
                                         
                                         
                                         
                                                 
                                                 
                                                