पिंपरी, दि. २६ – ‘ अभिजात मराठीची संगीत व गद्य नाट्य परंपरा अशी व्यापक संकल्पना घेऊन ‘रुद्रंग’ च्या कलावंतांनी सादर केलेला ‘लागले खूळ कलावंताला’ हा प्रयोग म्हणजे सर्वांग सुंदर निर्मिती होती. त्यामुळे माझी आजची संध्याकाळ चिरस्मरणीय झाली!’ असे गौरवोद्गार सांगली आकाशवाणी केंद्रावरील निवृत्त ज्येष्ठ निवेदक आणि यूट्यूबर दत्ता सरदेशमुख यांनी कॅप्टन कदम सभागृह, निगडी प्राधिकरण येथे काढले.
रुद्रंग या संस्थेच्या अकराव्या वर्धापधन दिनानिमित्त (On the occasion of the eleventh anniversary of the Rudrang organization ) प्रमुख अतिथी म्हणून दत्ता सरदेशमुख (datta sirdeshmukh) बोलत होते. या प्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक राजेंद्र घावटे, महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले यांची विशेष उपस्थिती होती. राजेंद्र घावटे म्हणाले की, ”लागले खूळ कलावंताला’ हा प्रयोग म्हणजे मंत्रमुग्ध करणारा अनुभव ठरला!’ तर पुरुषोत्तम सदाफुले यांनी, ”रुद्रंग’च्या (rudrang )कलाकारांचे अभिवाचन म्हणजे रंजनातून समाज प्रबोधन होते!’ असे मत व्यक्त केले.
‘पंचतुंड नररुंडमाळ धर’ या नांदीपासून सुरू झालेल्या या कार्यक्रमात ‘सं. सौभद्र’ (पौराणिक), ‘छावा’ (ऐतिहासिक), ‘एकच प्याला’ (सामाजिक), ‘प्रेमा तुझा रंग कसा’ , ‘कुब्जा’ शांतता कोर्ट चालू आहे’ , ‘चोरावर मोर’ (वग नाट्य), ‘नटसम्राट’ अशा एकूण आठ नाटकांतील प्रवेश व स्वगतांमधील विविध नाटककारांच्या भाषाशैलीचा सशक्त अनुभव रसिकांना अनुभवायला तर मिळालाच पण सं. ‘सौभद्र’ आणि ‘एकच प्याला’ या नाटकांतील पदगायन, वगनाट्यातील ‘पाडाला पिकलाय आंबा’सारखी लावणी म्हणजे नाट्यरसिकांसाठी अविस्मरणीय मेजवानीच होती. ‘नभ मेघांनी आक्रमिले’ , ‘नच सुंदरी करू कोपा’ ही पदे तरुण गायक नंदिन सरीन यांनी गायली; तर ‘कशी या त्यजू पदाला’ हे पद गायिका किशोरी सरीन यांनी गायले. दोघांचेही साभिनय गायन आणि इला पवार यांची लावणी यांनी प्रेक्षकांची मने जिंकून घेतली. शशीधर बडवे, कविता देशमुख, मोनिल जोशी, सुरेश कोकीळ, अरुणा वाकनीस, रमेश वाकनीस, उज्ज्वला केळकर या कलाकारांनी केलेले नाट्यवाचन म्हणजे वाचिक अभिनयाचा वस्तुपाठच होता. संपूर्ण कार्यक्रमाची संकल्पना, निवेदनसंहिता व दिग्दर्शन रमेश वाकनीस यांचे होते. बाळासाहेब विभूते आणि माधुरी ओक यांनी कार्यक्रमाचे शिस्तबद्ध संयोजन केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.