सिंधू सेवा दलातर्फे भगवान साई झुलेलाल यांचा १०७२ वा जन्मोत्सव साजरा
पुणे : भगवान साई झुलेलाल यांची आरती… स्टॅन्ड अप कॉमेडियन मोहित शेवानी आणि सहकलाकारांचे बहारदार सादरीकरण… सिंधी गीतांच्या ऐकाव्याश्या वाटणाऱ्या चाली… कलात्मक नृत्य… चाट-सामोसा-गोड भाताचा प्रसाद… रुचकर लंगर… डोक्यावर लाल टोपी आणि झुलेलाल यांचे अखंड भजन यातून नववर्षाच्या सुरुवातीला सिंधी संस्कृतीचे दर्शन घडले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षांनी होत असलेल्या या वार्षिक महोत्सवात सहभागी प्रत्येक सिंधी बंधू-भगिनींच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.
निमित्त होते, सिंधी समाजाच्या नववर्षाचे. भगवान साई झुलेलाल यांच्या १०७२ व्या जन्मोत्सवानिमित्त सिंधू सेवा दलातर्फे ‘चेटीचंड’ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. अल्पबचत भवनमध्ये झालेल्या या महोत्सवात संगीत, गायन, भजन आणि महाप्रसादातील विविध पदार्थ यामुळे चेटीचंड महोत्सव वैशिष्ट्यपूर्ण ठरला. यावेळी या कार्यक्रमात सिंधी समाजातील मान्यवर व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. यामध्ये राम जवाहरानी, राजीव व राहुल कृष्णानी, परमानंद व अनुप जमतानी, डॉ. विभा व विजय वासवानी, कविष थकवानी, हितेश फेरवणी,आकाश दलवानी, निर्मल, धर्मेश व नीरज वाधवानी,विशाल चुगेरा,चंदन पारवणी यांचा समावेश होता. सिंधू सेवा दलाचे अध्यक्ष पीटर दलवानी, ईश्वर कृपलानी, माजी अध्यक्ष मनोहर फरवणी,सुरेश जेठवानी व दीपक वाधवानी, सचिव सचिन तलरेजा, जनसंपर्क अधिकारी किरण फेरवानी आदी उपस्थित होते. या महोत्सवात पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील जवळपास तीन ते चार हजार सिंधी बांधव सहभागी झाले होते.
“सिंधी समाजाचा विकास करून समाजाच्या संस्कृतीविषयी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे व सिंधू समाजाच्या परंपरा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचविण्याचा आमचा मानस आहे. सिंधू सेवा दल गेली ३४ वर्ष कार्यरत आहे. चेटीचंड महोत्सवानिमित्त सर्व समाज एकत्र येतो. भगवान साई झुलेलाल यांचा उत्सव साजरा करतो. हा आनंदाचा क्षण अनुभवण्यासाठी आम्हीही दरवर्षी यामध्ये सहभागी होतो. यंदा जनरेशन नेक्स्ट डान्स अकँडमीतर्फे नृत्यकलेचे सादरीकरण आणि मोहीत शेवानी व मंजुश्री आसुदानी, शुभम नाथानी, अशोक सुंदरानी, करण खेमानी आदी कलाकार सहकार्यांचा लाईव्ह कार्यक्रम झाला,” असे पीटर दलवानी यांनी प्रास्ताविकात सांगितले.

 
                     
             
                                         
                                         
                                         
                                                 
                                                 
                                                