रोहन सुरवसे पाटील यांची टीका; विरोधी पक्षांना संपवण्याचे धोरण चुकीचे
पुणे : अवकाळी पावसाचा धुडगूस, पाण्याचे दुर्भिक्ष यामुळे शेतकरी दुभती जनावरे कसायला विकू लागला आहे. अशी भयावह परिस्थिती असताना राज्यकर्ते कुरघोडीच्या राजकारणात अडकले आहेत. येत्या निवडणुकीमध्ये शेतकरी, कष्टकरी, सुशिक्षित तरुणांनी मुजोर सत्ताधारी भारतीय जनता पक्ष व महायुतीला धडा शिकविला पाहिजे, असे स्पष्ट विचार महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांनी मांडले.
सुरवसे पाटील म्हणाले की, लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत सत्ताधारी गुळगुळीत कागदावर बुळबुळीत अक्षरांची छाप पाडून मतदारांना आकर्षित करीत प्रलोभने दाखवित आहेत. जाहीर सभांमध्ये विरोधकांवर टीका करीत आहेत. विरोधकच नको, अशी त्यांची भूमिका आहे. विरोधकांचे महत्व नाकारणे हेच भाजपचे धोरण आहे. पक्ष फोडायचे, नेते पाठवायचे हेच धोरण गेल्या काही वर्षात भाजपने राबवले आहे. ४०० पारचा नारा म्हणजे जनतेच्या डोळ्यात धूळफेक आहे.
विरोधक नसतील, तर लोकशाही कसली? असा सवाल उपस्थित करत सुरवसे पाटील म्हणाले, माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना लोकसभेमध्ये स्पष्ट बहुमत होते. मात्र, त्यांनी विरोधकांना कधीही दुय्यम समजले नाही. नेहमी सन्मान दिला. ही भावना आताच्या भाजप सत्ताधाऱ्यांमध्ये दिसून येत नाही. ईडी, सीडी, साडी आणि इतर सर्व मार्गांचा अवलंब करून भाजप सरकार ‘तोडाफोडा आणि राज्य करा’ ही इंग्रजांची नीती अवलंबत आहे. त्यामुळे आता या सरकारला सत्तेवरून खाली खेचायचे, असा चंग मतदारराजाने ठरवाले आहे.”
काँग्रेसच्या ७० वर्षांच्या काळात जेवढी महागाई वाढली नव्हती, त्यापेक्षा कितीतरी पटीने महागाई वाढली आहे. तरुणांच्या हाताला काम नाही, शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही, सरकारदप्तरी गरिबांची कोणी दखल घेत नाही, दाद कोणाकडे मागायची असा प्रश्न समान्य जनतेला पडला आहे. या सर्व प्रश्नांची उत्तरे सत्ताधाऱ्यांना विचारली पाहिजेत
– रोहन सुरवसे पाटील, सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस

 
                     
             
                                         
                                         
                                         
                                                 
                                                 
                                                