पुण्याला हसरे, आनंदी ठेवण्यात हास्य क्लबचे योगदान

पुण्याला हसरे, आनंदी ठेवण्यात हास्य क्लबचे योगदान

चंद्रकांत पाटील यांचे प्रतिपादन; नवचैतन्य हास्ययोग परिवाराच्या ऑनलाईन शाखेचा तिसरा वर्धापन दिन

 
पुणे : “सध्याच्या धावपळीच्या जीवनात ताणतणाव मुक्तीसाठी हास्ययोग प्रभावी थेरपी आहे. पुणे हसरे व आनंदी ठेवण्यात हास्ययोग क्लबचे योगदान मोलाचे आहे. ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने तुम्ही हजारो लोकांना आनंदी ठेवत आहात. काटे सर व मकरंद टिल्लू यांनी ही हास्ययोग चळवळ लाखो लोकांपर्यंत पोहोचावी,” असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

नवचैतन्य हास्य योग परिवाराच्या रौप्यमहोत्सवी गौरव विशेषांकाचे प्रकाशन व ‘हसायदान’ या ऑनलाईन शाखेचा तिसरा वर्धापन दिन चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक डॉ. सागर देशपांडे, ‘बाईपण भारी देवा’चे गीतकार वलय मुळगुंद, भाजप नेते संदीप खर्डेकर, नवचैतन्य हास्य योग परिवाराचे संस्थापक विठ्ठल काटे व सुमन काटे, मुख्य समन्वयक मकरंद टिल्लू, पदाधिकारी पोपटलाल शिंगवी, विजय भोसले, प्रमोद ढेपे, प्रसन्न पाटील, एकनाथ सुगावकर आदी उपस्थित होते.

 
चंद्रकांत पाटील म्हणाले, “हास्य योग चळवळीचा विस्तार सोसायट्यांमध्ये, ऑनलाईन स्वरूपात होत आहे. या चळवळीला अधिक व्यापक करण्यासाठी कोथरूडमध्ये पालिकेच्या जागेत हास्ययोग भवन उभारण्यात येत असून, महिनाभरात शासकीय प्रक्रिया पूर्ण करून ते हस्तांतरित केले जाईल. या क्लबला सामाजिक उपक्रमाची जोड द्यावी. संस्कारवर्ग, उद्योग प्रशिक्षण, ज्येष्ठांसाठी काही उपक्रम राबवावेत. मानवामध्ये परमेश्वर असल्याची शिकवण धर्माने दिली असून, प्रत्येकाला आनंदी ठेवण्याचे ईश्वरी कार्य आपण करत आहेत.”
 
 
मकरंद टिल्लू यांनी प्रास्ताविकात सांगितले की, कोरोनामुळे ऑनलाईन हास्य योग सुरू केला. चार लाखाच्या गुंतवणुकीतून स्टुडिओ उभारला. ज्येष्ठांना ऑनलाईन हास्ययोग शिकवला. नऊ देशांतून ५ हजार ६०० लोक यामध्ये सहभागी होत आहेत. नवचैतन्य हास्ययोगच्या १८० शाखा असून, त्यात आणखी ४५ शाखा जोडल्या जात आहेत. येत्या काळात एक लाख सभासद करण्याचे आमचे ध्येय आहे. सकारात्मक समाज आणि हसरे पुणे करण्यासाठी, मानसिक स्वास्थ्य चांगले राहण्यासाठी शाळा, कॉलेज, कंपन्या, पोलीस अशा विविध ठिकाणी हास्ययोग कार्यशाळा घेत आहोत.”
 
डॉ. सागर देशपांडे म्हणाले, “हास्य शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी महत्वाचे आहे. बदलत्या काळात निखळ हास्य दुर्मिळ झाले आहे. हास्य क्लबच्या माध्यमातून रोजची सकाळ हसरी होत आहे. मात्र, दिवसभर मानापमान यामध्ये आपण विरोधाभासी जीवन जगतो. घरातील लहानग्यांना उपदेश न करता त्यांच्याशी संवाद साधायला हवा.”
 
वलय मुळगुंद यांनी सांगितले की, पुणेकरांच्या मनात हास्याची बीजे रुजवण्याचे काम आपल्या हातून होत आहे. ‘बाई पण भारी देवा’ करताना आलेले अनुभव, किश्शे सांगून मुळगुंद यांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. मकरंद टिल्लू यांनी सूत्रसंचालन केले. विजय भोसले यांनी आभार मानले. 
 
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *