आत्मविश्वासाने तर्कसंगत मांडणी हीच खरी वकिलांची ओळख

आत्मविश्वासाने तर्कसंगत मांडणी हीच खरी वकिलांची ओळख

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे नामवंत सरकारी वकील पद्मश्री ॲड. उज्ज्वल निकम यांना ‘सूर्यदत्त’तर्फे ‘सूर्यदत्त सूर्यभूषण राष्ट्रीय पुरस्कार २०२३’

पुणे : आंतरराष्ट्रीय ख्यातीचे विशेष सरकारी वकील पद्मश्री ॲड. उज्ज्वल निकम यांना सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनतर्फे ‘सूर्यदत्त सूर्यभूषण राष्ट्रीय पुरस्कार २०२३’ नुकताच प्रदान करण्यात आला. भारताचा नकाशा असलेले सन्मानचिन्ह, विद्यार्थ्यांनी बनवलेला विशेष स्कार्फ, सुवर्णपदक व सन्मान पत्र असे या सन्मानाचे स्वरूप आहे. लोकसेवा आणि कायद्याच्या क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल, तसेच विविध महत्वाच्या खटल्यात महत्वाची कामगिरी बजावल्याबद्दल ॲड. उज्ज्वल निकम यांना सन्मानित करण्यात आले.
 
सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांच्या हस्ते ॲड. उज्ज्वल निकम यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यापूर्वी, त्यांना सूर्यदत्त राष्ट्रीय पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलेले आहे. ‘सूर्यदत्त’च्या बावधन कॅम्पसमध्ये झालेल्या या कार्यक्रमावेळी सूर्यदत्त विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिथिलेश वर्मा, प्रा. केतकी बापट, प्रा. मोनिका सेहरावत आदी उपस्थित होते. यावेळी ॲड. उज्ज्वल निकम यांनी सूर्यदत्त विधी महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
 
माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, शास्त्रज्ञ डॉ. के. सिवन, सामाजिक कार्यकर्ते वजुभाई वाला, लेफ्ट. जनरल डॉ. दत्तात्रय शेकटकर, केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत, श्याम जाजू, खासदार सुप्रिया सुळे, पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, डॉ. श्रीरंग लिमये, डॉ. शकुंतला काळे, पोलीस अधिकारी संजय जाधव, चंद्रशेखर सावंत, डॉ. चंद्रकांत कोकाटे, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे आदी मान्यवरांना यापूर्वी ‘सूर्यभूषण राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान करण्यात आलेला आहे.
 

 

प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “भारताच्या कायदेविषयक इतिहासात ॲड. उज्ज्वल निकम यांचे नाव सुवर्णाक्षरात लिहिले जाईल. उत्कृष्ट कायदेतज्ज्ञ व चांगला माणूस अशी त्यांची ओळख आहे. अत्यंत कठीण व महत्वाच्या खटल्यात त्यांनी विशेष सरकारी वकील म्हणून काम केले आहे. प्रामुख्याने खून, बलात्कार, दहशतवादी हल्ले यासंबंधित खटल्यांत त्यांनी आरोपीना कठोर शासन होण्यासाठी योगदान दिले आहे. १९९३ चा मुंबई बॉम्बस्फोट, गुलशन कुमार खून प्रकरण, प्रमोद महाजन हत्या प्रकरण आणि २००८ चा मुंबई दहशतवादी हल्ला, मुंबईतील सामूहिक बलात्कार प्रकरण, कोपर्डी बलात्कार आणि खून खटला अशा अनेक खटल्यांमध्ये त्यांनी काम पहिले आहे. वकील देशाची सेवा कशी करू शकतो, हेच त्यांनी दाखवून दिले आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *