जगातील सर्वात उंच चिनाब रेल्वेपुलाची उभारणी हे  भारतीयांच्या प्रतिभेचे प्रतीक: प्रा. डॉ. के. एस. राव

जगातील सर्वात उंच चिनाब रेल्वेपुलाची उभारणी हे  भारतीयांच्या प्रतिभेचे प्रतीक: प्रा. डॉ. के. एस. राव

 
बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया, इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स व इंडियन जिओटेक्निकल सोसायटी
यांच्या वतीने ‘चिनाब रेल्वेपूल उभारणीतील तांत्रिक व सामाजिक आव्हाने’वर व्याख्यानाचे आयोजन
 
पुणे, दि. २६-  “जगातील सर्वात उंच चिनाब रेल्वेपुलाची उभारणी हा केवळ एक अभियांत्रिकी पराक्रम नसून, भारतीयांच्या प्रतिभेचे, स्थापत्य कौशल्य व क्षमतेचे आणि सामाजिक उत्तरदायित्वाचे प्रतीक आहे. भारतीय शास्त्रज्ञ, अभियंते, तंत्रज्ञ, कामगार यांच्या सखोल अभ्यासाची, कठोर परिश्रमाची ही फलश्रुती आहे,” असे प्रतिपादन आयआयटी दिल्लीच्या स्थापत्य अभियांत्रिकी विभागाचे एमिरेट्स प्राध्यापक डॉ. के. एस. राव यांनी केले. (  Dr. K. S. Rao, Emeritus Professor, Department of Civil Engineering, IIT Delhi. )   चिनाब नदीवरील रेल्वेपुलाच्या उभारणीत योगदान देणाऱ्या डॉ. के. एस. राव यांनी उपस्थितांच्या शंकांचे निरसन केले.
 
बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया (बीएआय) पुणे सेंटर, इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स पुणे लोकल सेंटर व इंडियन जिओटेक्निकल सोसायटी (आयजीएस)  (Builders Association of India (BAI) Pune Centre, Institution of Engineers Pune Local Centre and Indian Geotechnical Society (IGS) )    पुणे चॅप्टर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जगातील सर्वात उंच चिनाब रेल्वेपूल उभारणीतील तांत्रिक व सामाजिक आव्हाने’ यावर आयोजित व्याख्यानात डॉ. राव बोलत होते. शिवाजीनगर येथील इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्सच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात संयोजक व बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया पुणे सेंटरचे अध्यक्ष अजय गुजर, राज्य अध्यक्ष जगन्नाथ जाधव, इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्सचे मानद सचिव डॉ. उत्तम आवारी, ‘आयजीएस’चे रमेश कुलकर्णी, चेअरमन सुमन जैन आदी उपस्थित होते.

या व्याख्यानात डॉ. के. एस. राव यांनी पुलाच्या उभारणीत आलेल्या भूगर्भशास्त्रीय अडचणी, हवामानातील बदल, कडेकपारीत काम करण्यातील जोखीम, वाहतूक व दळणवळणातील अडथळे अशा अनेक पैलूंचा सविस्तर वेध घेतला. पुलाच्या तांत्रिक बाबींप्रमाणेच स्थानिक समाजावर झालेल्या परिणामांचाही त्यांनी अभ्यासपूर्वक मागोवा घेतला. चिनाब नदीवर उभारण्यात आलेला हा पूल ३५९ मीटर उंचीवर असून, पॅरिसमधील ‘आयफेल टॉवर’पेक्षा याची उंची अधिक आहे. भारतीय रेल्वेच्या उधमपूर-श्रीनगर-बारामुला मार्गाचा हा भाग असून जम्मू-काश्मीरच्या दळणवळणाच्या दृष्टीने हा पूल अत्यंत महत्त्वाचा आहे, असे डॉ. राव यांनी नमूद केले.

विद्यार्थ्यांसह अभियंते, बांधकाम व्यावसायिक, तांत्रिक अधिकारी, संशोधक आणि नागरी अभियांत्रिकी क्षेत्रातील तज्ज्ञांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण ‘बीएआय’च्या यूट्यूब चॅनेलवर करण्यात आले. प्रास्ताविकात अजय गुजर यांनी सर्वांचे स्वागत केले. तसेच ‘बीएआय’च्या उपक्रमांची माहिती दिली. सुमन जैन व डॉ. उत्तम आवारी यांनीही मनोगत व्यक्त केले. संजय आपटे यांनी सूत्रसंचालन केले. सी. एच. रतलानी यांनी आभार मानले. संपूर्ण कार्यक्रमाने तांत्रिक ज्ञानाच्या देवाण-घेवाणीसोबतच राष्ट्रीय प्रकल्पांची सामाजिक जाणीव समृद्ध करण्याचा हेतू साध्य केला.

‘वेल बिल्ट स्ट्रक्चर कॉम्पिटिशन २०२५’
बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने २९ व्या ‘वेल बिल्ट स्ट्रक्चर कॉम्पिटिशन २०२५’ची माहिती अजय गुजर यांनी दिली. विविध १६ प्रकारांमध्ये ही स्पर्धा होत असून, स्पर्धेसाठी नामांकने मागविण्यास सुरुवात झाली असल्याचे त्यांनी नमूद केले. ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत या स्पर्धेसाठी प्रवेश अर्ज पाठवता येणार आहे. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी ‘बीएआय’च्या पुणे सेंटर कार्यालयात भेट द्यावी किंवा ९८५०५३८३४६ यावर संपर्क साधावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *