रोहा : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान मुलांना धोका असल्याचे वर्तविले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर धाटाव येथील सुदर्शन केमिकल्स कंपनीच्या सहकार्यातून रोहा उपजिल्हा रुग्णालयात उभारलेल्या लहान मुलांसाठीच्या विशेष वार्डचे उद्घाटन शनिवारी रायगडच्या पालकमंत्री अदितीताई तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. वार्डमधील नक्षीदार रंगकाम, लोकप्रिय कार्टूनची रेखाचित्रे, खेळणी अशा विविध गोष्टीतुन साकारलेला आणि ‘हसत खेळत राहूया, कोरोनाला हरवूया’ असा संदेश देणारा हा विशेष वार्ड (बालरंजन केंद्र) सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.
खास लहान मुलांना केंद्रित करून उभारलेल्या वार्डचे उद्घाटन झाल्यानंतर याचे हस्तांतरण रोहा उपजिल्हा रुग्णालय अधीक्षक अंकिता मते यांच्याकडे करण्यात आले. प्रसंगी कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट विवेक गर्ग, पीपल प्रॅक्टिस विभागाच्या प्रमुख श्रीमती शिवालिका पाटील, सीएसआर आणि प्रशासकीय विभागाच्या उप सरव्यवस्थापक माधुरी सणस, रुपेश मारबते, रवी दिघे यांच्यासह रुग्णालयातील डॉक्टर्स, स्टाफ नर्सेस उपस्थित होते. अदितीताई तटकरे यांनी ‘सुदर्शन’च्या या उपक्रमाचे कौतुक केले.
विवेक गर्ग म्हणाले, “जागतिक रंगद्रव्ये उत्पादनात अग्रेसर सुदर्शन केमिकल इंडस्ट्रीज सामाजिक कार्यातही अग्रेसर असते. कोरोना काळात विविध उपक्रमातून सुदर्शनने सामाजिक बांधिलकी जपली आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेत बालकांना कोरोना संसर्गाचा धोका असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. याच पार्श्वभूमीवर उपजिल्हा रुग्णालय, रोहा येथे सुदर्शन सीएसआर फौंडेशनच्या विशेष सहकार्यातून या बालरुग्ण कक्षाची उभारणी करण्यात आलेली आहे.”
अंकिता मते म्हणाल्या, “संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान मुलांना धोक्याची शक्यता लक्षात घेऊन हा विशेष वार्ड उभारला आहे. हसतखेळत मुलांवर उपचार होतील, या दृष्टीने सुदर्शन कंपनीने अतिशय कल्पक असा वार्ड तयार केला आहे. खेळणी, लोकप्रिय कार्टूनची भिंतीचित्रे यामुळे हे एक बालरंजन केंद्र बनले आहे. सुदर्शनने याआधीही पीपीई किट, औषध फवारणी, वाशिंग मशीन व अन्य साहित्य रुग्णालयास दिले आहे. आरोग्य यंत्रणेला हातभार लावण्याचा सुदर्शन कंपनीचा पुढाकार महत्वाचा आहे.”