लोकबिरादरी मित्रमंडळ ट्रस्ट, स्मार्ट चॅम्प पुणे यांच्या वतीने ‘वर्ल्ड ऑफ पझल्स अँड ब्रेन गेम्स ३.०’ प्रदर्शन
पुणे : “मोबाईल, इंटरनेट, कार्टून या सगळ्यांपासून थोडेसे वेगळे होत मुलांचे भावविश्व विकसित होण्याची गरज आहे. त्यासाठी मेंदूला चालना देणारे खेळ, कोडी, वाचन, जिज्ञासू वृत्ती घडवणारे उपक्रम राबवायला हवेत. कुटुंबातील प्रत्येकाच्या सर्जनशीलतेला, बुद्धीला चालना व प्रोत्साहन देणारे उपक्रम घेण्याची आज गरज आहे,” असे मत गडचिरोलीच्या हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पाचे संचालक अनिकेत आमटे यांनी व्यक्त केले.
लोक बिरादरी मित्रमंडळ ट्रस्ट पुणे आणि स्मार्ट चॅम्प्स पुणेच्या वतीने आयोजित ‘वर्ल्ड ऑफ पझल्स अँड ब्रेन गेम्स ३.०’ या प्रदर्शनाचे उद्घाटन आमटे यांच्या हस्ते झाले. १ मे पर्यंत रोज दुपारी ४ ते रात्री १० या वेळेत सोलारिस फिटनेस क्लब, मयूर कॉलनी कोथरूड येथे हे प्रदर्शन होणार आहे. उद्घाटनावेळी लोक बिरादरी मित्र मंडळ ट्रस्टच्या विश्वस्त ऐश्वर्या चपळगावकर, शिल्पा तांबे, सदस्य अमेय देशपांडे, सोलारीसचे मुख्य कार्यकारी अधिकारी ऋषिकेश भानुशाली, स्मार्ट चॅम्प्स पुणेचे रविंद्र नाईक, रौनक नाईक आदी उपस्थित होते.
अनिकेत आमटे म्हणाले, “शहरी भागातील मुलांना विविध खेळ, खेळण्या, प्रयोगशाळा सहज उपलब्ध होतात. भामरागड सारख्या आदिवासी भागातील शाळांमधील मुलांना अशा गोष्टी मिळत नाहीत. तेथील शाळेत अशी खेळण्याची विशेष लॅब उभारण्याच्या दृष्टीने हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. अशा प्रकारच्या ‘पझल’ प्रयोगशाळा गडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसा येथे लोक बिरादरी प्रकल्प अंतर्गत चालविण्यात येणार्या तीन शाळांमध्ये उभारण्यासाठी याची मदत होईल. तसेच पुण्याच्या मुलांना आदिवासी मुलांशी जोडण्याचा आणि आदिवासी मुलांनाही अशा प्रकारचे अभिनव बौद्धिक प्रेरणा देणारे उपक्रम शिकायला मिळतील “
रौनक नाईक म्हणाले, “हे प्रदर्शन वय वर्ष ३ ते ९९ या वयोगटासाठी आहे. येथे तीन दिवस आपल्याला एक बौद्धिक सहल घडणार आहे. यातून प्रेक्षकांना विविध कोडी आणि बोर्ड गेम्सचे आकर्षक नमुने अनुभवायला मिळतील. शाब्दिक, गणिती, खेळ, बौद्धिक क्रीडाप्रकार एकल व समूह स्वरूपात असणार आहेत.”