कॅन्सरग्रस्त ज्येष्ठ रुग्णांवर आधारित ‘रसायु’चे संशोधन शिकागो मध्ये प्रकाशितवैद्य योगेश बेंडाळे यांची माहिती; ज्येष्ठ नागरिकांवर प्रभावी उपचार शक्य होणार
पुणे : कर्करोगाने पीडित ज्येष्ठ रुग्णांवर आता प्रभावी उपचार करणे शक्य झाले आहे. त्यासाठी आयुर्वेदीय रसायन चिकित्सा उपयोगी ठरत असल्याचे संशोधन पुण्यातील वैद्यांनी केले आहे. कर्करोग व इतर दुर्धर आजारांवर आयुर्वेदाची मात्रा गुणकारी असल्याचे हे संशोधन असून, नुकतेच त्याची दखल अमेरिकन सोसायटी ऑफ क्लिनिकल ऑन्कोलॉजी २०२४ या शिकागो येथे भरलेल्या परिषदेत घेतली आहे, अशी माहिती रसायु कॅन्सर क्लिनिकचे वैद्य योगेश बेंडाळे यांनी दिली आहे. या संशोधनामध्ये वैद्य योगेश बेंडाळे यांच्यासह वैद्य अविनाश कदम, वैद्य पूनम गवांदे, डॉ. धनश्री इंगळे व रसायु कॅन्सर क्लिनिकच्या टीमचा सहभाग होता.
वैद्य योगेश बेंडाळे म्हणाले, “आधुनिक संशोधनानुसार ६५ वर्षापेक्षा अधिक वय असणाऱ्या वृद्धाना तरुणांपेक्षा ११ पटीने अधिक कॅन्सरचा धोका असतो. जागतिक स्तरावर कर्करोगाच्या चिकित्सेमध्ये जेरियाट्रिक ऑनकॉलॉजी ही नवीन शाखा उदयाला आली असून, कॅन्सरच्या वयस्कर रुग्णांवर ह्या शाखेमार्फत उपचार केले जातात. अमेरिकन कॅन्सर सोसायटीच्या मते कर्करोग होण्याच्या प्रमाणामध्ये वृद्ध रुग्णाचे प्रमाण हे ६१ टक्के आहे. या वयोगटातील अत्यल्प रुग्णांचा सहभाग हा विविध क्लिनिकल ट्रायलमध्ये असतो. त्यामुळे सर्वसाधारण कॅन्सर रुग्णांच्या शाखेपेक्षा जेरियाट्रिक ऑनकॉलॉजिच्या शाखेचे महत्व लक्षात येते.”
“रसायु क्लिनिक २८ वर्षांपेक्षा अधिक काळ कॅन्सर व अन्य दुर्धर आजारांवर आयुर्वेदाच्या माध्यमातून चिकित्सा करत आहे. रसायू क्लिनिकची जागतिक स्तरावर ७७ पेक्षा अधिक संशोधने प्रकाशित झाली आहेत. आता झाले संशोधनही ‘जर्नल ऑफ क्लिनिकल ऑनकॉलॉजि’मध्ये प्रकशित झाले आहे. या संशोधनामध्ये कॅन्सरच्या वयस्कर रुग्णांच्या जीवनाच्या दर्जामध्ये सुधारणा होऊन, चिंता व नैराश्य कमी झाले व आयुर्वेद रसायन चिकित्सा पद्धती रुग्णांकरिता सुरक्षित व परिणामकारक असल्याचे दिसून आले,” असे वैद्य बेंडाळे यांनी नमूद केले.
वैद्य बेंडाळे पुढे म्हणाले “वार्धक्य अवस्थेत शरीर स्वभावतःच दुर्बल असते, त्यात कॅन्सरच्या आणि प्रगत अवस्थेतील रुग्णांना पाश्चात वैद्यकातील चिकित्सा घेताना येणाऱ्या मर्यादा, दुष्परिणाम किंवा त्याचे अपेक्षित परिणाम न दिसणाऱ्या रुग्णांकरिता समाजात एक सक्षम शास्त्रीय निकषांवर आधारित रुग्णकेंद्रीत उपचार पद्धतीची गरज आहे. आयुर्वेद रसायन चिकित्सेमार्फत समाजातील या वर्गांकरिता पर्याय उपलब्ध असून रुग्णांना यातून मिळणारे समाधान, सुधारित आयुष्याचा दर्जा आणि संशोधनात्मक दृष्टी ठेवून केले जाणारे कार्य हे रसायू कॅन्सर क्लिनिकचे वैशिष्ट्य होय.”
का केले संशोधन?
– वार्धक्यातील आजारामुळे हे कॅन्सरचे रुग्ण पाश्चात्य वैद्यकातील उपचार घेण्यासाठी पात्र नाहीत अथवा दुष्परिणामुळे चिकित्सा थांबवावी लागते.
– पाश्चात वैद्यकीय उपचारांना प्रतिसाद न देणाऱ्या कर्करोगाच्या प्रगत अवस्थेत कॅन्सरच्या वयस्कर रुग्णावर प्रभावी उपचार शोधण्यासाठी
– काही कॅन्सरचे वयस्कर रुग्ण पाश्चात्य चिकित्सा घेण्यास अनुत्सुक असतात, त्यांना पर्याय देण्यासाठी
– ६५ वर्षापेक्षा अधिक वय असणाऱ्या व कर्करोगाबरोबर रक्तदाब, हृदयरोग, मधुमेह असे आजार असलेल्या रुग्णावर आयुर्वेद रसायन उपचार पद्धतीची सुरक्षितता व परिणामकता अभ्यासणे
असे झाले संशोधन
– २०२० ते २०२३ ह्या कालावधीमध्ये ६५ वर्षावरील अधिक वयाचे, कर्करोगाबरोबर दुर्धर आजाराने ग्रस्तांचा अभ्यास
– १०१० वृद्ध कर्करुग्णांपैकी पात्र १६७ रुग्णांचा अभ्यास
– कॅन्सरच्या प्रगत अवस्थेतील रुग्णांचाच समावेश
– सहा महिने किंवा अधिक काळ आयुर्वेद रसायन चिकित्सा सेवन केलेल्यांचा समावेश
– चिकित्सा सुरु झाल्यावर तीन व सहा महिन्यानंतर रुग्णाच्या जीवनाचा दर्जा, नोंदींचा अभ्यास
संशोधनाचा निष्कर्ष काय ?
– रुग्णाच्या जीवनाच्या दर्जात सुधारणा झाली
– चिंता व नैराश्य कमी होऊन त्यांच्यात सकारात्मकता व आजाराशी लढण्याचे सामर्थ्य वाढले
– आयुर्वेद रसायन उपचार पद्धती सुरक्षित व परिणामकारक ठरले
– रसायन चिकित्सा घरच्या घरी मुखावाटे सहज घेता येत असल्याने प्रगत कॅन्सरच्या रुग्णांचा प्रतिसाद
– वृद्ध तसेच प्रगत अवस्थेतील कॅन्सरच्या रुग्णांना एक सक्षम पर्याय म्हणून रसायन चिकित्सेचा विचार शक्य