पुणे : नाशिकमधील ज्योतिष अशोक खरात उर्फ ‘कॅप्टन’ याला एका ३५ वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणात पोलिसांना ५८ आक्षेपार्ह व्हिडिओ सापडल्याची माहिती समोर आली असून, यावरून संताप व्यक्त होत आहे.
यासंदर्भात पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे-पाटील यांनी गंभीर आरोप करत राज्य महिला आयोगाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “कॅप्टन खरात” नावाच्या भोंदू बाबाकडून धार्मिक विधींच्या नावाखाली महिलांचे शोषण होत असल्याचा आरोप त्यांनी केला. सुमारे ५८ महिला या प्रकरणाच्या बळी ठरल्याचा दावा त्यांनी केला.
ठोंबरे-पाटील म्हणाल्या, “मी एक वर्षापूर्वीच या प्रकरणाची वाचा फोडली होती, मात्र तरीही पोलिसांनी वेळीच कारवाई का केली नाही?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.” आरोपीकडून महिलांना भांड्यात लघवी करून त्यात गुंगीचे औषध मिसळून बेशुद्ध करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
यावेळी त्यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावरही गंभीर आरोप केले. संबंधित ट्रस्टमध्ये त्यांचे नाव असल्याचा दावा करत त्यांनी नैतिकतेच्या आधारावर तत्काळ राजीनामा देण्याची मागणी केली. आरोपीचा आत्मविश्वास वाढण्यामागे महिला आयोगाचे संरक्षण असल्याचा संशय आहे,” असे त्या म्हणाल्या.
या प्रकरणातील काही व्हिडिओ पुरावे समोर आल्याचा दावा करत, त्यामध्ये महिलांवर अमानुष अत्याचार दाखविल्याचे त्यांनी सांगितले. तपासावर प्रभाव टाकला जाऊ शकतो आणि पुरावे नष्ट होण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली. पोलिस तपासात हस्तक्षेप होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचेही त्यांनी नमूद केले.
रूपाली ठोंबरे यांनी यावेळी स्पष्ट केले की, खरातच्या संबंधित सर्व ट्रस्टवर गुन्हे दाखल होणे आवश्यक आहे. जर चाकणकर यांनी राजीनामा दिला नाही, तर या अन्यायाविरोधात संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. तसेच, या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आपण स्वतः सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन त्यांना सर्व परिस्थितीची कल्पना देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
संबंधित ट्रस्टमधील सर्व सदस्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत, “पीडित महिलेनं दाखवलेलं धाडस कौतुकास्पद आहे,” असे त्या म्हणाल्या. तसेच या प्रकरणाला कोणताही राजकीय, जातीय किंवा धार्मिक रंग देऊ नये, असे आवाहन करत तपास निष्पक्ष होण्यासाठी रूपाली चाकणकर यांनी पदाचा राजीनामा द्यावा, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.
