जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त १३ सप्टेंबर रोजी कँडल मार्चचे आयोजन

जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त १३ सप्टेंबर रोजी कँडल मार्चचे आयोजन

 
मानसिक आरोग्य जनजागृतीसाठी कनेक्टिंग ट्रस्ट व रोटरी क्लबचा पुढाकार
 
पुणे, दि. ५-  जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त मानसिक आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी कँडल मार्चचे(candle march) आयोजन केले आहे. आत्महत्या प्रतिबंधासाठी गेल्या वीस वर्षांपासून कार्यरत असलेल्या कनेक्टिंग ट्रस्ट व रोटरी क्लब ऑफ पुणे सारसबाग यांच्या पुढाकारातून हा कँडल  (This candle was launched by Connecting Trust and Rotary Club of Pune Sarasbagh.)  मार्च शनिवार, दि. १३ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजल्यापासून संभाजी उद्यान, जंगली महाराज रस्ता पुणे येथून निघणार आहे. कँडल मार्चमध्ये सहभागी होण्यासाठी https://bit.ly/candlemarch2025 यावर आपले नाव नोंदवावे किंवा कनेक्टिंग ट्रस्टच्या connecting_ngo या इन्स्टा पेजला भेट द्यावी, असे आवाहन कनेक्टिंग ट्रस्टच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रणिता मडकईकर यांनी केले आहे. या कँडल मार्चमध्ये रोटरी क्लब ऑफ पुणे कात्रज, रोटरी क्लब ऑफ पुणे साऊथ, रोटरी क्लब ऑफ पुणे कोथरूड, रोटरी क्लब ऑफ पुणे सहवास, रोटरी क्लब ऑफ पुणे मिडईस्ट, रोटरी क्लब ऑफ पुणे ईस्ट, रोटरी क्लब ऑफ पुणे सनराईज या क्लबचे सहकार्य लाभले आहे.
 
आत्महत्या हा आपल्या समाजासमोर उभा असलेला एक गंभीर प्रश्न आहे. अनेकदा मनातील वेदना, ताण, एकटेपण बोलून दाखवता येत नाही आणि त्यातून मोठे निर्णय घेतले जातात. या वेदना ऐकल्या जाव्यात, आधार मिळावा आणि प्रत्येकाला हे जाणवावे की तो एकटा नाही, यासाठी जनजागृतीची गरज आहे. याचाच एक भाग म्हणून अर्नवाज दमानिया यांनी २००५ मध्ये कनेक्टिंग ट्रस्ट ही संस्था सुरू केली. गेली दोन दशके ही संस्था सतत आत्महत्या प्रतिबंध, मानसिक आरोग्य जनजागृती आणि जीव वाचविण्याचे कार्य करत आली आहे. या प्रवासात हजारो लोकांना आधार, समज आणि जीवनाची नवी दिशा मिळाली आहे. या प्रवासात आता रोटरी क्लबनेही साथ देण्यासाठी हात पुढे केला असल्याचे कनेक्टिंग ट्रस्टच्या गायत्री दामले यांनी नमूद केले.
 
रोटरी सदस्यांसह रोटरॅक्टर आणि तरुण मंडळी या कॅन्डल मार्चमध्ये सहभागी होतील. निराश व्यक्तींना आशा देण्यासाठी, त्यांना पाठिंबा देण्यासाठी हा कॅन्डल मार्च महत्वपूर्ण ठरणार आहे. हा कँडल मार्च म्हणजे आत्महत्येमुळे आपले जीवन गमावलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी, समाजामध्ये मानसिक आरोग्याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि सध्या संघर्ष करत असलेल्या व्यक्तींना आधार देण्यासाठी एक गंभीर आणि अर्थपूर्ण पाऊल आहे. आपली एक छोटीशी मेणबत्ती आणि काही पावले, कोणाच्या तरी जीवनात प्रकाशाचा किरण ठरू शकतात. चला, आपण सारे मिळून या उपक्रमात सहभागी होऊन संवेदनशीलता, आशा आणि आधाराचा संदेश पोहोचवूया, असे आवाहन रोटरी क्लब ऑफ पुणे सारसबागचे अध्यक्ष आशुतोष वैद्य(ashutosh vaidy) यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *