पुणे : वाचनाने माणसांच आयुष्य समृद्ध होतं यासाठी वाचन संस्कृती टिकली पाहिजे ती लोकांच्या मनामनात रूजली पाहिजे हा समाजहिताच्या विचाराचा धागा पकडत पुण्यातील धनकवडी येथील अखिल मोहननगर मित्र मंडळ ट्रस्ट गणेश मंडळाने महाराष्ट्राचे आराध्या दैवत बुद्धीची देवता गणरायाला पुस्तकांचा महानैवेद्य अर्पण केला. महापुरुषांचे थोर विचार लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी हा अभिनव उपक्रम कौतुकास्पद आहे.
समाजाला विचार संपन्न करण्याचे त्यांचे हे मौलिक कार्य प्रेरणा देणारे आहे.वाचनाने मनुष्य ज्ञानी होतो. ते ज्ञान म्हणजे मूल्यवान संपत्तीच होय. संत तुकाराम महाराज म्हणतात, “आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने”. अर्थात ग्रंथरुपी ज्ञानाला ते संपत्ती समजतात. ह्या संपत्तीची बरोबरी सोने किंवा हिऱ्यांनी होत नाही. म्हणून आम्ही वाचन केले पाहिजे. वाचाल तर वाचाल’ ही म्हण आजच्या घडीला किती समर्पक आहे हे आपण सर्वच जाणतो.आजच्या मनुष्याच्या ठिकाणी असणारे ज्ञान ही त्याची फार मोठी शक्ती आहे.
या शक्तीच्या साह्याने तो सुबुद्ध आणि प्रगल्भ तर होतोच परंतु त्याच्या कार्यसंस्कृतीवर सुद्धा त्याचा प्रभाव पडतो. मागल्या पिढीपेक्षा आताच्या पिढीचे वाचन अगदी अल्प झाले आहे अशी तक्रार सर्वच थरातून वाढली ती गोष्ट सत्यही आहे कारण वाचना व्यतिरिक्त रेडिओ, टेलिव्हिजन, कंप्युटर, चित्रपट, नाटके, इतर मनोरंजनाची साधने इतकी जास्त वाढली आहेत की या सर्व गलबल्यात मनुष्याला वाचण्यासाठी निवांतपणाच मिळेनासा झाला आहे लोप पावत चाललेली वाचन संस्कृती टिकवण्यासाठी अखिल मोहननगर मित्र मंडळ ट्रस्ट ने गणेशोत्सवाच्या माध्यमातून हा विचार मांडला आहे पुस्तकांचा महानैवेद्य अनेकांचे आकर्षण बनत आहे.
इतिहासाचा मागोवा, वर्तमानाचे भान आणि भविष्याचा वेध या तीनही गोष्टी जर कशामुळे शक्य होत असतील तर पुस्तकांमुळेच. व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीत अनेक घटकांचा हातभार लागतो. व्यक्ती आणि तिच्याभोवती असणारे जग यांच्या परस्परसंबंधातून व्यक्तिमत्त्वाचे शिल्प साकारत असते. या प्रवासात पुस्तकांची भूमिका अत्यंत मोलाची ठरते म्हणूनच सुस्पष्ट विचारांतून जीवनदृष्टी देणाऱ्या ग्रंथांना मानवी जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे.
‘वाचाल तर वाचाल’ या अल्पाक्षरांमध्ये जीवनाचा संदेश लपलेला आहे. अगदी प्राचीन काळापासूनचे संचित, इतिहास माणसाला जपून ठेवावासा वाटला त्यातून आली अक्षरलिपी व त्यातून आले शब्द. या शब्दांना ग्रंथरूप मिळाले आणि तो संस्कृतीचा ठेवा बनला. हा वारसा आपल्याला पावला-पावलावर समृद्ध करीत आला आहे. अनुभवाला ज्ञानाची जोड मिळाल्यानंतर जीवनाचा अर्थ गवसतो, म्हणून पुस्तके महत्त्वाची ठरतात या पुस्तकी विचार संस्कृतीवरती निरंतर प्रेम कायम राहावे हाच संदेश मंडळाच्या माध्यमातून देण्यात आला आहे.
जनसेवा फाऊंडेशन मांगडेवाडी, सुमती बालभवन, ममता फाऊंडेशन गुजर-निंबाळकरवाडी येथील सामाजिक संस्थांना ही पुस्तके वाटप करण्यात आली अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष अनिरुद्ध येवले यांनी दिली. यासाठी कार्याध्यक्ष मयूर बुरसे, खजिनदार गुरुनाथ साळुंखे तसेच मंडळाचे सर्वच कार्यकर्ते यांनी मोलाचे योगदान दिले.
(शब्दांकन : लक्ष्मण जाधव)