लॅटिन अमेरिका, कॅरेबियन देशांत भारतीय उद्योजकांना मोठ्या संधी

लॅटिन अमेरिका, कॅरेबियन देशांत भारतीय उद्योजकांना मोठ्या संधी

डॉ. जितेंद्र जोशी यांचे मत; ग्लोबल इंडिया बिझनेस फोरमतर्फे ‘इंडिया-लॅटिन अमेरिका व कॅरेबियन कंट्री’ व्यावसायिक परिषद

पुणे : “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणामुळे गेल्या दहा वर्षांमध्ये भारतीय उद्योजकांनी मोठ्या प्रमाणावर प्रगती केली आहे. त्यांना जगातील विविध देशांमध्ये विकासाच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. भारतीय उद्योजकांना आणि विशेषतः सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजकांना त्यांच्या उद्योगांचा विस्तार करण्यासाठी लॅटिन अमेरिका कॅरेबियन देशांमध्ये मोठ्या संधी उपलब्ध असून, त्या मिळवून देण्यासाठी ग्लोबल इंडिया बिझनेस फोरम (जीआयबीएफ) कटिबद्ध आहे,” असे मत ‘जीआयबीएफ’चे संस्थापक व ग्लोबल प्रेसिडेंट डॉ. जितेंद्र जोशी यांनी व्यक्त केले.
 
ग्लोबल इंडिया बिझनेस फोरमच्या (जीआयबीएफ) वतीने ‘इंडिया-लॅटिन अमेरिका व कॅरेबियन कंट्री’ व्यावसायिक परिषदेच्या उद्घाटनावेळी डॉ. जितेंद्र जोशी बोलत होते. ब्राझील, मेक्सिको, अर्जेंटिना, पेरू, चिली, कोस्टारिका, गयाना, उरुग्वे,क्युबा, त्रिनिदाद अँड टोबॅगो, व्हेनेझुएला, एल साल्वाडोर या १२ देशांचे राजदूत, उच्चायुक्त व डिप्लोमॅट्स यांच्यासह विविध क्षेत्रातील उद्योजक सहभागी झाले होते. प्रसंगी ‘जीआयबीएफ’च्या महासचिव दीपाली गडकरी, ग्लोबल स्टार्टअप संचालक अभिषेक जोशी, मार्केटिंग हेड वैशाली बदले, सल्लागार संजय देशपांडे आदी उपस्थित होते.
 
 
उरुग्वेचे राजदूत अल्बर्टो गुआनी, व्हेनेझुएलाच्या राजदूत कपाया रॉड्रिग्ज गोंजालेज, मिनिस्टर काऊन्सिलर रोजर सेयेद्दी, क्युबाचे व्यवहार प्रमुख अबेल अबल्ले डिस्पेगन, चिलीच्या दूतावासातील अधिकारी प्रियम अरोरा, कोस्टारिकाच्या व्यवहार प्रमुख सोफिया सालस, एल साल्वाडोरचे राजदूत गुईलेर्मो रुबिओ फ्युन्स, इकॉनॉमिक काऊन्सलर स्टीवन रेमिरेज, ब्राझीलचे व्यापार अधिकारी गोपाल सिंग राजपूत, मेक्सिकोचे इकॉनॉमिक्स अँड ट्रेड प्रमोशन प्रमुख डॅनियल डेल्गडो, गयानाचे  सचिव केशव तिवारी, पेरूचे ट्रेंड अँड टुरिझम कौन्सलर लुईस मिगुएल काबेलो यांनी आपापल्या देशांतील व्यावसायिक, गुंतवणुकीच्या संधींविषयी सादरीकरण केले. त्रिनिदाद अँड टोबॅगोचे उच्चायुक्त रॉजर गोपॉल ऑनलाईन सहभागी झाले. सर्वच देशांच्या प्रतिनिधींनी भारतीय उद्योजकांना त्यांच्या देशांत गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण देण्याचे आश्वासन दिले. यावेळी सर्व देशांच्या पदाधिकाऱ्यांचा सन्मानचिन्ह आणि पुणेरी पगडी देऊन सत्कार करण्यात आला.
 
 
 
“जागतिकीकरणाच्या आजच्या जगामध्ये उद्योगांमध्ये नेटवर्किंग म्हणजेच संवाद असणे आवश्यक आहे. हे ओळखूनच ‘जीआयबीएफ’तर्फे प्रत्येक क्षेत्रांमध्ये कार्यरत असणाऱ्या सुमारे ९७ हजार उद्योजकांचे जाळे निर्माण केले आहे. राजदूतांशी थेट संवाद साधून त्यात्या देशातील संधी, वातावरण यांचा अभ्यास केला जातो. आजवर मुंबई, दिल्ली, कलकत्ता, पुणे अशा मेट्रो शहरासह सोलापूर, कोल्हापूर, कराड, सांगली सातारा अशा नव्याने विकसित होणाऱ्या शहरातील उद्योजकांसाठीही अशा परिषद घेण्यात आल्या आहेत. 
प्रसंगी ‘बिझनेस टायकून’ मासिकाचे प्रकाशन करण्यात आले. अभिषेक जोशी यांनी स्टार्टअप्सना जगभरात असलेल्या संधींविषयी मार्गदर्शन केले. सावनी अधिकारी व ऐश्वर्या जोशी यांनी सूत्रसंचालन केले. दीपाली गडकरी यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *