Post Views: 334
समाजकार्यात योगदान देणाऱ्याचे कार्य आदर्शवत
– परमपूज्य प्रीतिसुधाजी महाराज; बन्सी-रत्न चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विविध पुरस्कारांचे वितरण
– बन्सी-रत्न चॅरिटेबल वेल्फेअर ट्रस्टतर्फे चंचला व मोतीलाल सुराणा यांना ‘आदर्श माता-पिता पुरस्कार’
——-
आदर्श व्यक्तिमत्त्वांना सन्मानित करण्याचा उपक्रम कौतुकास्पद
– परमपूज्य मधुस्मिताजी महाराज; बन्सी-रत्न चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विविध पुरस्कारांचे वितरण
——–
ज्येष्ठांच्या सन्मानातून नव्या पिढीसमोर आदर्श ठेवण्याचे कार्य
अभिनेते रझा मुराद यांचे मत; बन्सी-रत्न चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विविध पुरस्कारांचे वितरण
पुणे : सूर्यदत्ता संचालित बन्सी-रत्न चॅरिटेबल वेल्फेअर ट्रस्टतर्फे ‘आदर्श माता-पिता पुरस्कार’ चंचला व मोतीलाल सुराणा यांना, तर सुशिलाबाई बंब यांना समाजरत्न पुरस्कार, डॉ. अशोककुमार पगारिया यांना समाज शिरोमणी पुरस्कार, महावीर नहार यांना समाजभूषण पुरस्कार व डॉ. रसिक सेठिया यांना मानवसेवा पुरस्कार प्रदान करण्यात आले. मानपत्र, सन्मानचिन्ह व उपरणे असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
संस्कार भारती, वाणीभूषण परमपूज्य प्रीतिसुधाजी महाराज, स्वरसम्राज्ञी परमपूज्य मधुस्मिता जी महाराज व अन्य साध्वी महाराज साहेबांच्या उपस्थितीत, ज्येष्ठ गायक, भजनसाम्राट अनुप जलोटा, ज्येष्ठ चरित्र अभिनेते रझा मुराद यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. वडगावशेरी येथील श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ येथे मंगळवारी झालेल्या या पुरस्कार व गौरव सोहळ्याप्रसंगी सुर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया, उपाध्यक्षा सुषमा चोरडिया, मुख्य विकास अधिकारी सिद्धांत चोरडिया, कार्यकारी संचालक प्रा. सुनील धाडीवाल, प्रा. अक्षित कुशल, रोशनी जैन
रोहित संचेती, नयना गोडांबे, अभिश्री मोर, बटू पाटील, सोनाली ससार आदी उपस्थित होते. कार्यक्रमास सकल जैन संघाचे बहुतांश पदाधिकारी उपस्थित होते.
परमपूज्य मधुस्मिताजी महाराज यांचा वाढदिवस यावेळी साजरा करण्यात आला. तसेच यावेळी उपस्थित सर्व साधुसंताना सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये राष्ट्रसंत आचार्य सम्राट परमपूज्य श्री आनंदऋषीजी म.सा., जपाराधिका पूज्य श्री भावप्रीतिजी म.सा. मधुर कंठी पूज्य श्री प्रेरणाजी म.सा., मधुरवक्ता पूज्य श्री प्रज्ञाजी म.सा. आगम आराधिका पूज्य श्री संयमप्रीतीजी म.सा. ज्ञान आराधिका पूज्य श्री श्रीप्रीतीजी म.सा., स्वाध्याय लीन पूज्य श्री विधीश्रीजी म.सा. यांना सन्मानित करून त्यांचे आशीर्वाद घेण्यात आले.
परमपूज्य प्रीतिसुधाजी महाराज म्हणाल्या, “आज निवडण्यात आलेले पुरस्कारार्थी अतिशय योग्य आहेत. त्यांचे समाजाप्रती असलेले कार्य खूप मोठे आणि कौतुकास्पद आहे. संजय चोरडिया हे समाजसेवेमध्ये अग्रेसर आहेत. त्यांचे शैक्षणिक आणि सामाजिक कार्य समाजातील इतरांसाठी आदर्शवत असे आहे. त्यांच्या आई-वडिलांचे संस्कार ते पुढे नेत आहेत.”
परमपूज्य मधुस्मिता जी महाराज म्हणाल्या, “बन्सीलाल चोरडिया भल्या पहाटे भजन करत असत. त्यामुळे समाजातील इतर लोकही प्रेरित होत आणि धार्मिक कार्यात सहभागी होत असत. संस्काराची तीच बीजे संजय चोरडिया यांच्या अंगी आहेत. चोरडिया परिवार समाजातील आदर्श व्यक्तिमत्वांना सन्मानित करून चांगले काम करत आहे.”
रजा मुराद म्हणाले, ”मुलांना शिक्षण देऊन त्यांचे भविष्य घडवणे हे पुण्याचे काम आहे. शिक्षणाबरोबरच जेष्ठांचा सन्मान करत नव्या पिढीसमोर आदर्श ठेवण्याचे कार्य सुषमा व संजय चोरडिया करीत आहेत. खूप मेहनत, काबाडकष्ट करून आई-वडील मुलांना शिक्षण आणि चांगले आयुष्य देण्यासाठी झटतात. त्यांच्या त्यागाचा, बलिदानाचा विसर पडता कामा नये. संपूर्ण जगात भारत एक असा देश आहे, जिथे जेष्ठांच्या पाया पडले जाते. ज्येष्ठांच्या आशीर्वादाची शक्ती मोठी असते. माझी आणि चोरडियांची मैत्री याच प्रेमाचे प्रतीक आहे.”
प्रा. डॉ. संजय चोरडिया प्रास्ताविकात म्हणाले, “ज्ञानाबरोबरच विद्यार्थ्यांना चांगले संस्कार मिळावेत, यासाठी सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट अशा प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करत असते. अभ्यास, मेहनत, व्यायाम, आई-वडिलांचा, जेष्ठांचा सन्मान केला पाहिजे. माता-पिता व गुरूंचे स्मरण करणे ही आजच्या काळाची गरज आहे. त्यांचे संस्कार ही आपल्या आयुष्याची खरी संपत्ती आहे. आज साध्वी महाराजांच्या सानिध्यात असा कार्यक्रम होताना आणि या आदर्श व्यक्तिमत्त्वांचा सन्मान करताना अतिशय आनंद होत आहे.”
डॉ. अशोककुमार पगारिया म्हणाले, “समाज शिरोमणी हा पुरस्कार स्वीकारताना आनंद होत आहे. शिक्षणक्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण केलेल्या डॉ. संजय चोरडिया यांचा समाजाला अभिमान आहे. आपल्या आई-वडिलांच्या स्मरणार्थ समाजातल्या कर्तृत्ववान लोकांना सन्मानित करण्याचा त्यांचा उपक्रम कौतुकास्पद आहे.”
पुरस्कार सोहळ्यानंतर अनुप जलोटा यांच्या भजन संध्या कार्यक्रमाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. सुराणा यांनी सुमधुर भजन गायले. प्रशांत पितालिया यांनी सूत्रसंचालन केले.