सुरेल बंदिशी, मनमोहक चित्रांतून ‘रामगाना’ची रसानुभूती

सुरेल बंदिशी, मनमोहक चित्रांतून ‘रामगाना’ची रसानुभूती

 
भारतीय विद्या भवन, इन्फोसिस फाउंडेशन व अविष्कार क्रिएशन्सतर्फे ‘रामगान’च्या पहिल्या प्रयोगाचे आयोजन
 
पुणे, दि. २५-  सुरेल बंदिशींना प्रासंगिक चित्रांची जोड, विविध रागांमध्ये गुंफलेल्या बंदिशी, कलाकारांचे कर्णमधुर सादरीकरण, बंदिशींना बोलके करणाऱ्या चित्रांचे दर्शन, या माध्यमातून रसिकांनी रामायणातील विविध प्रसंगांवर आधारित ‘रामागाना’ ( ‘Ramagana’)   ची रसानुभूती घेतली. राम जन्मापासून ते रावणवध करून प्रभू श्रीराम अयोध्येला परतल्यानंतर त्यांचा राज्याभिषेक होईपर्यंत, वनवासावेळी माता शबरीची भेट, अहिल्या उद्धार, सीताहरण, सीतेला शोधतानाचा विरह, राम हनुमान भेट, विजयी पताका व जयघोष असे अनेक शब्दबद्ध व चित्रबद्ध केलेले प्रसंग पाहून रसिक भारावून गेले. 
 
भारतीय विद्या भवन (Bhartiy vidya bhavan) व इन्फोसिस फाऊंडेशनच्या  (infosis foundation )सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमाअंतर्गत आविष्कार क्रिएशन्सतर्फे (avishkar creations) आयोजित ‘रामगान’ या सांगितीक मैफिलीचे आयोजन केले होते. भारतीय विद्या भवनचे मानद सचिव नंदकुमार काकिर्डे यांच्यासह कला क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते. बंदिशकार, गायिका व चित्रकार भाग्यश्री गोडबोले यांनी रामायणातील विविध प्रसंगांवर स्वतः रचलेल्या रागाधारित बंदिशींचे सादरीकरण, तसेच त्यावर आधारित रेखाटलेल्या चित्रांचे प्रदर्शन अशा दृक-श्राव्य कार्यक्रमाचा हा पहिलाच प्रयोग रसिकांच्या विशेष पसंतीस पडला. पं. अमोल निसळ, भाग्यश्री गोडबोले, डॉ. सानिका गोरेगावकर, सावनी दातार, श्वेता कुलकर्णी यांचे सुरेल शास्त्रीय गायन, खुमासदार शैलीतील डॉ. सुनील देवधर यांचे निवेदन आणि तबल्यावर अमित जोशी, संवादिनीवर शुभदा आठवले, व्हायोलिनवर अंजली राव-सिंगडे यांची लाभलेली साथसंगत यामुळे मैफलीत रंगत वाढली.
 
‘रघुनंदन रूप मनोहर’ या भटियार, ललत रागातील बंदिशीने मैफलीची सुरुवात झाली. केदार रागातील ‘प्रकट होत खुद’ ही बंदिश श्वेता कुलकर्णी यांनी, तर मालकंस रागातील ‘कड कड कड नाद’ ही बंदिश अमोल निसळ यांनी सादर केली. वनवासाचे वर्णन करणाऱ्या हिंडोल रागातील ‘राम का हो निर्वासन’ व ललत रागातील ‘गमन करत रामलखन’ या बंदिशी सादर करीत सावनी दातार यांनी वनवासाचा प्रसंग उभा केला. सानिका गोरेगावकर यांनी जनसंमोहिनी या शांतरसाच्या रागात ‘रामचरण स्पर्श होत’, तर भूपेश्वरी रागात अमोल निसळ यांनी ‘शूर्पणखा अति क्रोधित’ बंदिशींतून शूर्पणखेचा संताप व्यक्त केला. सानिका गोरेगावकर यांनी ‘शबरी असीम रामभक्त’ ही मिश्र झिंझोटी व ‘मृग प्यारासा’ ही जौनपुरी रागातील बंदिश सादर केली. जयजयवंती रागातील ‘सीताहरण की बात’ बंदिशीतून श्वेता कुलकर्णी यांनी रावण सीतेचे हरण करत असल्याचा प्रसंग उभारला. सेतू बांधण्यात खारुताईचे योगदानावर भाग्यश्री गोडबोले यांनी सादर केलेली शुद्ध सारंग रागातील बंदिश, मारवा, मधुकंस, सोहोनी रागातील बंदिशींनी अशोक वाटीकेतील सीतेच्या मनातील भावना, हनुमान-सीतामातेची भेट, वानरसेनेने केलेल्या जयघोष असे अनेक प्रसंग उभारले. ‘राम सुमीर करुणाकर’ या भैरवीने मैफलीची सांगता झाली.
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *