बाबासाहेबांची छत्रपती शिवाजी महाराजांवरील निष्ठा कौतुकास्पद

बाबासाहेबांची छत्रपती शिवाजी महाराजांवरील निष्ठा कौतुकास्पद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून कौतुक; शंभरीनिमित्त बाबासाहेब पुरंदरे यांचा नागरी सत्कार
 

पुणे : “छत्रपती शिवाजी महाराजांप्रती बाबासाहेब पुरंदरे यांची असलेली निष्ठा आणि त्यांचे विचार जगभरात पोहोचविण्यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत कौतुकास्पद आहे. शिवाजी महाराजांचे जीवन आणि विचार तळागाळात पोहोचविण्यासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाप्रती आपण सर्वानी त्यांचे ॠणी राहिले पाहिजे. त्यांच्या शंभरीनिमित्त त्यांना साष्टांग नमस्कार करतो,” अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे कौतुक व अभिष्टचिंतन केले.

 
आपल्या ओजस्वी वाणीतून शिवचरित्र घराघरात पोहोचविणारे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या शंभरीनिमित्त ‘शतकवीर पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे सत्कार समारोह समिती’च्या वतीने नागरी सत्कार सोहळ्यावेळी मोदी बोलत होते. प्रसंगी समितीच्या अध्यक्षा व लोकसभेच्या माजी सभापती सुमित्रा महाजन, सत्कार समारोह समितीचे सदस्य खासदार विनय सहस्त्रबुद्धधे आणि ‘महाराजा शिवछत्रपती
प्रतिष्ठान’चे विश्वस्त जगदीश कदम आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, प्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आभासी पद्धतीने शिवशाहिरांना मानाचा मुजरा केला.
 
पंतप्रधान मोदी म्हणाले, “हिंदवी स्वराज्य, अनुशासन, वंचितांना न्याय देणे, नौसेनाची उपयुक्तता हे त्यांचे प्रयोग आजही अनुकरणीय आहेत. बाबासाहेबांनीच नव्या पिढीला शिवाजी महाराजांचे हे रूप अवगत करून दिले. शिवाजी महाराजांविषयीच्या गोष्टी सांगण्याच्या बाबासाहेबांच्या शैलीतून प्रत्येकाच्या मनात शिवाजी महाराजांची प्रतिमा जिवंत होते. ’जाणता राजा’च्या प्रारंभीच्या काळात हा प्रयोग पाहाण्यासाठी मी पुण्यालाही गेलो होतो. खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचण्याची गरज आहे. आज देशाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त देशाचा इतिहास लिहिताना बाबासाहेबांसारखीच प्रेरणा आणि प्रमाणिकतेच्या कसोटीवर लेखन करावे, असे आवाहनही मोदी यांनी तरूण इतिहासकारांना केले.”
 
सचिन तेंडुलकर म्हणाला, लहानपणी शिवाजी महारांजाबद्दल शाळेत गोष्टी ऐकायचो. त्या गोष्टी ऐकल्यावर लढण्याची वृत्ती निर्माण होते, शिवाजी महाराजांवर ८० वर्षे अभ्यास करून शिवचरित्र त्यांनी जगभरात

पोहोचविले याचे कौतुक आहे. मात्र एक खंत आहे जाणता राजा कधी बघितले नाही कामाच्या व्यापात तो योग जुळून आला नाही बाबासाहेब समोर आले की वाकून नमस्कार करण्याची भावना होते. आमची प्रार्थना आहे की तुम्हाला उदंड आयुष्य मिळो.”

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “१०० वर्षात पदार्पण केले. त्यांना दिर्घआयुष्य लाभो, मेगा प्रकल्प म्हणून नावलौकिक असलेला हा शिवसृष्टी प्रकल्प लवकरच पूर्ण व्हावा अशी अपेक्षा आहे. बाबासाहेबांना वयाच्या आठव्या वर्षापर्यंत शिवचरित्र ऐकून पाठ झाले होते..गडकिल्ल्यांच्या भेटी, माहिती संकलित करणे यातून त्यांनी संशोधन वृत्ती जोपासली. इतिहास त्यांनी मोडून तोडून सांगितला नाही..शिवचरित्र आणि सुराज्य म्हणजे राष्ट्रीय चरित्र असे ते म्हणतात. ते ख-या अथार्ने शिवरायांचे आदर्श सेनानी ठरले आहेत.”
मोहन भागवत म्हणाले, स्वत:च्या परिश्रमाने त्यांनी शिवचरित्र घराघरात पाहोचविले. छत्रपती शिवाजी महाराज हे त्यांचे दैवत. यासाठी त्यांनी गडकिल्ले पालथे घातले..अडचणी आणि संकटावर मात करून शिवचरित्र पोहोचविण्याची तपस्या पार पाडली. प्रेरणास्रोत जीवनाची शंभरी सुरू होत आहे. समर्पण, निष्ठा आणि ध्यासातून त्यांनी समाज मन घडविले आहे.”
 
सुमित्रा महाजन म्हणाल्या, “एक संकल्प दिन म्हणून इथे जमलो आहोत, शिवाजी महाराजांचा इतिहास पुढच्या पिढीसमोर ठेवायचा आहे आणि राष्ट्रीय चरित्र घडवायचे आहे. त्यांनी जे स्वप्न बघितले आहे ते आपण पूर्ण करूयात. राजकारण आणि समाजकारण करा पण शिवाजी महाराजांनी जो विचार दिला तो घेऊन पुढे जायला हवे. स्वच्छ कमाईच्या पेन्शनमधून एक लक्ष रुपये मी शिवसृष्टीला देत आहे.” जगदीश कदम यांनी प्रस्ताविक केले. स्नेहल दामले यांनी सूत्रसंचालन केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *