डॉ. नरेंद्र जाधव यांचे प्रतिपादन; पुणे बार असोसिएशनतर्फे विशेष व्याख्यान
पुणे : “महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना कोणी दलित नेता म्हटले की मला फार वाईट वाटते. बाबासाहेबांनी दलितांचा तर उद्धार केलाच आहे, पण त्यांनी सबंध देशाचा, देशातील प्रत्येक नागरिकाचा उद्धार केला आहे. त्यामुळे ते कोणत्याही एका जाती, धर्माचे वा समाजाचे नेते नसून संपूर्ण देशाचे आहेत, हे आपण ध्यानात ठेवायला हवे,” असे प्रतिपादन राज्यसभेचे खासदार डॉ. नरेंद्र जाधव यांनी केले.
छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिम्मित पुणे बार असोसिएशनतर्फे आयोजित ‘युगप्रवर्तक महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर’ या विषयावरील व्याख्यानात डॉ. नरेंद्र जाधव बोलत होते. यावेळी जिल्हा व सत्र न्यायालयाचे प्रमुख जिल्हा न्यायाधीश संजय देशमुख, पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. पांडुरंग थोरवे, डॉ. जाधव यांच्या पत्नी वसुंधरा जाधव, सचिव ॲड. सुरेखा विठ्ठल भोसले, सदस्य ॲड. अर्चिता मंदार जोशी, उपाध्यक्ष ॲड. विवेक भरगुडे, ॲड. लक्ष्मण येळे पाटील, सचिव ॲड. अमोल शितोळे यांच्यासह मोठ्या संख्येने वकील बंधु आणि भगिनीं उपस्थित होत्या.
डॉ. नरेंद्र जाधव म्हणाले, “बाबासाहेबांच्या प्रतिभेला कोणत्याही विषयांचे बंधन नव्हते. ते ज्ञानमार्गी, प्रज्ञासुर्य होते. असा कोणताच विषय नाही, ज्यावर त्यांचे प्रभुत्व नव्हते. ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ हा त्यांचा प्रमुख मूलमंत्र होता. शिकणे आणि शिकवणे हे त्यांच्या गाभ्यात होते. आपल्या देशात असा दुसरा कोणताही राजकीय नेता नाही जो बाबासाहेबांच्या जवळपासही जाईल. त्यांच्याएवढे ज्ञानार्जन कोणाचेच नाही.”
“बाबासाहेब अर्थतज्ज्ञ होते. ते थोर समाजसेवक होते. प्रत्येकाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क आहे हे त्यांनी जनमनात रुजवले. अनेक आर्थिक धोरणे बनवणारे ते अर्थप्रशासक होते. वर्णव्यवस्था श्रमाची नाही, तर श्रमिकांची विभागणी करते हे ठासून सांगणारे बाबासाहेब होते. ते मानववंश शास्त्रज्ञ, राजकीय मुत्सद्दी होते,” असेही त्यांनी यावेळी सांगितले.
बाबासाहेब आणि महात्मा गांधी यांच्यात प्रचंड वाद होते. पण तरीही देशासाठी ते वेळोवेळी एकत्र आले. मात्र लोक एकच अंग पकडून चालतात, याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली. बाबासाहेबांची दृष्टी काळाच्या खूप पुढची असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. “बाबासाहेबांनी केवळ घटना लिहिली नाही, तर त्यातील प्रत्येक तरतुदींच्या दोन्ही बाजू सांगत त्यावर चर्चाही घडवून आणली होती. एकूणच बाबासाहेब हे प्रखर राष्ट्रवादी होते,” असे ते म्हणाले.
न्यायाधीश देशमुख म्हणाले, “भारतीय घटना हा मोठा कल्पवृक्ष आहे आणि त्याची फळे पोहचविणे हे आपले काम आहे. हे काम म्हणजेच बाबासाहेबांचे उरलेले काम आहे. हा वृक्ष कायमच जिवंत राहणार आहे. त्याचे मूळ कधीही बदलणार नाही. हा वृक्ष जपण्याचे काम प्रत्येक माणसाचे आहे. भारताला घटनेनेच एकसंध ठेवले आहे.”
अध्यक्ष ऍड. पांडुरंग थोरवे यांनी प्रास्ताविक केले. सचिव ऍड. सुरेखा विठ्ठल भोसले सूत्रसंचालन केले. सदस्य ऍड. अर्चिता मंदार जोशी यांनी आभार मानले.