जागतिक कर्करोग काँग्रेसमध्ये पुण्यातील डॉ. योगेश बेंडाळे यांच्याकडून शोधनिबंध सादर
स्वादुपिंड कर्करोगाचे निदान उशिराने होण्याचे प्रमाण ९५% असल्याचाही निष्कर्ष समोर
पुणे : स्वादुपिंड कर्करोगावर आयुर्वेदिक रसायन उपचारपद्धती अतिशय प्रभावी आणि सुरक्षितही आहे. स्वादुपिंड कर्करोगाचे निदान उशिरा होत असल्याने शस्त्रक्रियेच्या पलीकडे हा आजार गेलेला असतो. अशावेळी आयुर्वेदिक पद्धतीने रोगाच्या लक्षणांचे उपशमन करून रुग्णाच्या जीवनाची गुणवत्ता व जगण्याचा कालावधी वाढविण्यास आयुर्वेदिक रसायन उपचार पूरक ठरतात, असा निष्कर्ष पुण्यातील संशोधक डॉ. योगेश बेंडाळे यांनी मांडला आहे.
नुकत्याच नवी दिल्ली येथे झालेल्या जागतिक कर्करोग कॉँग्रेस-२०२१ मध्ये रसायु कॅन्सर क्लिनिकचे अध्यक्ष डॉ. योगेश बेंडाळे यांनी स्वादुपिंड कर्करोगावर आयुर्वेदिक रसायन उपचार घेतलेल्या रुग्णांच्या अभ्यासावर आधारित संशोधन सादर केले. जगभरातील कर्करोग तज्ज्ञ या काँग्रेसमध्ये सहभागी झाले होते. कर्करोगावर आयुर्वेद उपचार पद्धतीमधील संशोधन आणि विकास क्षेत्रात अग्रणी संस्था असलेल्या ‘रसायु कॅन्सर क्लिनिक’ याआधीही सहापेक्षा अधिक संशोधनांचे निष्कर्ष अमेरिकन असोसिएशन ऑफ कॅन्सर रिसर्च (एएसीआर), अमेरिकन सोसायटी ऑफ क्लीनिकल ऑन्कोलॉजी (एएससीओ), कोरियन सोसायटी ऑफ मेडिकल ऑन्कोलॉजी (केएसएमओ), सोसायटी ऑफ इंटेग्रेटिव्ह ऑन्कोलॉजी (एसआयओ), युरोपियन सोसायटी ऑफ मेडिकल ऑन्कोलॉजी (ईएसएमओ) अशा जगप्रसिद्ध कर्करोग विषयक संशोधन संस्थेत मांडले आहेत.
डॉ. योगेश बेंडाळे म्हणाले, “कर्करोग विरोधात नवनवीन उपचार पद्धती विकसित होत असताना स्वादुपिंडाच्या कर्करोगाबाबत काही लक्षणीय सुधारणा झाल्याचे आढळून येत नाही. स्वादुपिंडाचा कर्करोग अतिशय घातक आहे. स्वादुपिंडाचे स्थान पोटाच्या मध्यभागी तथा शरीरातील महत्त्वाच्या अवयवांजवळ असल्यामुळे तसेच स्वादुपिंडात विकसीत होणार्या गाठींमध्ये सामान्यत: स्वादुपिंडाच्या क्षेत्रात वाढ होईपर्यंत किंवा शरीराच्या इतर भागात तो पसरेपर्यंत लक्षणे दिसून येत नाहीत. स्वादुपिंडाच्या रुग्णाचे प्रगत अवस्थेतील आयुष्यमान हे केवळ तीन ते सहा महीने असते. अशावेळी सुरक्षित, रुग्णास जगण्यासाठी सहनशक्ती आणि दीर्घायुष्य प्रदान करणारी उपचार पद्धती हवी.”
यामध्ये अत्याधुनिक साधनांचा वापर करून जागतिक दर्जाची संगणकीय प्रणाली विकसित करण्यात आली असून, फॅक्ट-जी, फॅक्ट-आयटी आणि थकव्याच्या तीव्रतेचे प्रमाण मोजणे यासारख्या प्रमाणित मापकांचा वापर करण्यात आला आहे. संगणकीकृत माहिती व्यवस्थापन सॉफ्टवेअर विकसित करून त्यात माहिती साठविली जाते. त्यामुळे चिकित्सकांना व शास्त्रज्ञांना कर्करोगाच्या विविध प्रकारातील उपचारात्मक परिणाम व कल चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत होते. भारतातील या कर्करोगाच्या रुग्णांना सुरक्षित व परवडणारी एकात्मिक कर्करोग चिकित्सा व सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सरकार व खाजगी क्षेत्राने पुढाकार घेण्याची गरज आहे. वैद्यकीय विमा कंपन्यानी आयुष उपचारांवर विमा संरक्षण देण्याची गरज आहे.” असेही डॉ. बेंडाळे यांनी नमूद केले.