प्रा. डॉ. संजय चोरडिया यांचे मत; ‘सूर्यदत्त’मध्ये मोफत कृत्रिम अवयवरोपण शिबीर
दत्ताजी चितळे, राजेंद्र जोग, विनय खटावकर यांना ‘सूर्यदत्त धन्वंतरी पुरस्कार २०२२’ प्रदान
पुणे : जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्युट्स संचालित सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्स, कॉलेज ऑफ फिजिओथेरपी आणि विकलांग पुनर्वसन केंद्र, भारत विकास परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांगासाठी शिबीराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात कृत्रिम हात, पाय, क्यालीपरचे मोफत वाटप करण्यात आले.
‘सूर्यदत्त’च्या बावधन कॅम्पसमध्ये झालेल्या या शिबिरावेळी कायदेतज्ञ अनूप अवस्थी, भारत विकास परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष दत्ताजी चितळे, प्रादेशिक सचिव राजेंद्र जोग, विकलांग केंद्र पुणेचे प्रमुख विनय खटावकर, जयंत जेस्ले, वासुदेव कालरा, विजय गोरे, प्रशांत सातपुते, अमित तोडकर, डॉ. किमया गांधी, डॉ. सिमी रेठरेकर, प्रशांत पितालिया, डॉ. कांचन घोडे, डॉ. नेहा भोसले, डॉ. कल्याणी शिवरकर, डॉ. योगिता गोसावी आदी उपस्थित होते.
दत्ताजी चितळे, राजेंद्र जोग व विनय खटावकर यांना त्यांच्या विकलांगाप्रती केलेल्या कार्याबद्दल अनुप अवस्थी व डॉ. संजय चोरडिया यांच्या हस्ते ‘सूर्यदत्त धन्वंतरी पुरस्कार २०२२’ प्रदान करण्यात आला. मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा असून, त्याच भावनेतून ‘सूर्यदत्त’ अविरतपणे काम करत असल्याचे डॉ. चोरडिया यांनी नमूद केले.
प्रा. संजय चोरडिया म्हणाले, “कॉलेज ऑफ फिजिओथेरपीला नुकतीच मान्यता मिळाली असतानाव संस्थेअंतर्गत कर्करोग तपासणी शिबिर, आरोग्यविषयक विविध व्याख्याने आदी उपक्रम राबविले जात आहेत. दिव्यांगाना विशेषत: ज्यांना आजवर कोणतीही मदत पोहोचू शकली नाही, अशा मुळशी परिसरातील, पुणे आणि पुण्याबाहेरील दिव्यांगांना कृत्रिम हात, पाय, कॅलिपर्स उपलब्ध देण्याचा या शिबिराचा उद्देश होता. दर तीन महिन्याला असे शिबीर आयोजित केले जाणार आहे. पुढील शिबीर जुलै महिन्यात होईल. पूर्वी पैसा, ज्ञान असणारा श्रीमंत मानला जात असे. कोविडनंतर मात्र आरोग्य उत्तम असणारा श्रीमंत समजाला जातोय. दिव्यांगांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी.”
अनुप अवस्थी म्हणाले, “सुर्यदत्त संस्थेकडून राबविला जाणारा हा उपक्रम अतिशय स्तूत्य आहे. इतरांसाठी हे कार्य आदर्शवत आहे. दिव्यांगांना मिळालेल्या या अवयवांमुळे त्यांना स्वावलंबी होण्यास मदत होणार आहे. समाजातील अधिकाधिक दिव्यांगांना मदत करण्यासाठी इतरांनीही ‘सूर्यदत्त’प्रमाणे पुढाकार घ्यावा.”
डॉ. किमया गांधी यांनी दिव्यांगांची सेवा करण्याची संधी मिळत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच मानवसेवा हीच सर्वोत्तम सेवा असल्याचे सांगितले. डॉ. सीमी रेठरेकर यांनी संस्थेबद्दल व फिजिओथेरपी महावि्द्यालयाबद्दल माहिती दिली.
दत्ताजी चितळे म्हणाले, “चोरडिया यांना समाजसेवेची आंतरिक इच्छा आहे. त्यांचे प्रतिबिंब त्यांच्या संस्थेअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या समाज उपयोगी शिबिरातून उमटते. संस्थेचे कार्य भरीव स्वरूपाचे असून भारतीय विकास परिषदेचा संपूर्ण प्रतिसाद राहील.”
दिव्यांगांच्या वतीने बोलताना वडगाव शेरी येथील साहिल शेख म्हणाले, “संस्थेच्या माध्यमातून मला दोन हात उपलब्ध झाले, याबद्दल आभार मानतो. जुलै महिन्यातील पहिल्या आठवड्यात होणाऱ्या शिबिराची माहिती इतर गरजुंना देण्यासाठी प्रयत्न करणार आहे.”
शिबिरास उत्तम प्रतिसाद मिळाला. दिव्यांग व्यक्तींना ने-आण करण्याची व अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती. पुण्यासह कोल्हापूर, सोलापूर, रत्नागिरी येथूनही शिबिरात सहभाग नोंदवला गेला. बाटु पाटील, रोहन जमदाडे यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचे शिबिरास सहकार्य मिळाले. सूत्रसंचालन योगिता गोसावी यांनी केले. आभार प्रशांत पितालिया यांनी मानले.