पुणे, दि. ८ जून २०२२ : महाराष्ट्र विद्यार्थी सहाय्यक मंडळ संचलित अशोक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावीचा निकाल सलग नवव्या वर्षी शंभर टक्के लागला आहे. सुमारे २०८ मुलांना डिस्टिंक्शन मिळाले असून, उज्वल निकालाची परंपरा कायम राखल्याचे समाधान संस्थेच्या चेअरमन सुमन घोलप यांनी व्यक्त केले.
पुणे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले अशोक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय ज्ञानदानाचे कार्य गेली अनेक वर्ष नेटाने करत असून, येथील विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी गुणवत्ता जोपासत आहेत. यावेळी शिक्षकांचे आणि विद्यार्थ्यांचे परिश्रमाला उचित फळ मिळाल्याने त्यांचे अभिनंदन करण्यात आले. अभिनंदन करण्यासाठी संस्थेचे चेअरमन सुमन घोलप, सचिव प्रसाद मारुतराव आबनावे, खजिनदार प्रथमेश आबनावे, सहसचिव पुष्कर आबनावे, सदस्य प्रज्योत आबनावे, गौरव आबनावे, ज्युनिअर कॉलेजच्या रेखा दराडे, प्राचार्य विद्या कांबळे आदी उपस्थित होते.
सुमन घोलप यांनी संस्थेचे शिक्षक व कर्मचारी यांना गुणवत्ता कायम राखण्यासाठी मार्गदर्शन केले. प्रसाद आबनावे यांनी ज्ञानदानाचे कार्य असेच कायम ठेवून विद्यार्थ्यांना घडवणे हेच पुण्याचे काम आहे, असे सांगितले. संस्थेचे मानद अध्यक्ष मोहन जोशी यांनी सर्व विद्यार्थी व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.