‘स्मार्ट इंडिया हाकेथाॅन २०२४’ स्पर्धेत आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी प्रथम

‘स्मार्ट इंडिया हाकेथाॅन २०२४’ स्पर्धेत आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी प्रथम

नाविन्यपूर्ण संशोधनासाठी संघाना प्रत्येकी एक लाखाचे पारितोषिक
पुणे: दिघी येथील आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या (एआयटी) विद्यार्थ्यांनी अभिमानास्पद कामगिरी करत ‘स्मार्ट इंडिया हॅकेथॉन २०२४’ स्पर्धेत दोन विभागांत प्रथम क्रमांक मिळवला. विद्यार्थ्यांच्या चमूने कल्पकता, बुद्धीवैभव आणि नवकल्पनांचे दर्शन घडवत राष्ट्रीय स्तरावरील निर्भेळ यश मिळवत संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला.

देशभरात अत्यंत प्रतिष्ठेची असलेल्या ‘स्मार्ट इंडिया हॅकेथॉन’ स्पर्धेची अंतिम फेरी नुकतीच देशभरातील ५१ नोडल केंद्रांवर पार पडली. ही स्पर्धा विद्यार्थ्यांमधील नवकल्पनांचे जागरण आणि नागरी समस्या निवारणाच्या उपाययोजना यांचे नाते जोडणारा केंद्र सरकारचा विशेष पुढाकार आहे. या स्पर्धेत ‘एआयटी’च्या ‘टीम ब्लॅक सिंडिकेट’ व ‘टीम कार्बन डेटर्स’ हे दोन संघ सहभागी झाले होते. दोन्ही संघानी प्रथम क्रमांक पटकवला आहे.

न्यायवैद्यकीय संगणकीय पुराव्यांचे महत्त्व आणि विश्लेषण अधोरेखित करण्यासाठी साह्यभूत ठरणारी संगणकीय प्रणाली विकसित करणाऱ्या ‘टीम ब्लॅक सिंडिकेट’ या संघात चेतन सिंग, यश पाठक, धरिंदरसिंग, रोशनी गौडा, आदित्य प्रताप, रजत सिंग यांचा समावेश होता. नोएडा इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नाॅलाॅजी, ग्रेटर नोएडा येथील स्पर्धेत या टीमने एक लाख रुपयांचा प्रथम पुरस्कार विभागून मिळवला. ‘क्रिएटिंग अ सायबर ट्रिंज टूल टू स्ट्रीमलाईन डिजिटल फाॅरेन्सिक इन्व्हेस्टिगेशन’ या समस्येवर उपाय शोधणारी प्रणाली या टीमने विकसित केली असून, त्यासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी-एनआयए) टीमला अर्थसहाय्य पुरवले होते.

टीम कार्बन डेटर्सने कौशल व्यासच्या नेतृत्वाखाली निखिल धारिवाल, रिया कुमारी, शुभम कुमार, एच. आयुष आणि केबीव्ही किशोर यांच्या संघाने आयआयटी तिरुपती येथे विभागून प्रथम क्रमांकाचे एक लाख रुपयांचे पारितोषिक विभागून मिळवले. ‘पोर्टल फाॅर इनोव्हेशन एक्सलन्स इंडिकेटर्स’ या पोर्टलच्या माध्यमातून शैक्षणिक संस्थांमधील नवकल्पनांच्या गुणवत्तेचे मोजमाप प्रदर्शित करणारी प्रणाली त्यांनी विकसित केली असून, यासाठी आयुष मंत्रालयाअंतर्गत ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद यांनी अर्थसाहाय्य दिले होते.

प्रा. वैशाली इंगळे आणि प्रा. कुलदीप हुले यांनी विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले. एआयटीचे अध्यक्ष मेजर जनरल के. के. चक्रवर्ती, एआयटीचे संचालक ब्रिगेडियर अभय भट, एआयटीचे प्राचार्य डॉ. बी. पी. पाटील यांनी पुरस्काप्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *