हास्ययोग प्रात्यक्षिके व डॉ. जगदीश हिरेमठ यांच्या व्याख्यानाचे आयोजन
पुणे : येत्या १ मे २०२२ रोजी ११० देशात जागतिक हास्यदिन (मे महिन्यातील पहिला रविवार) साजरा होतो आहे. या जागतिक हास्य दिनानिमित्त नवचैतन्य हास्ययोग परिवारातर्फे शनिवार, दि. ३० एप्रिल २०२२ रोजी सकाळी ८.४५ ते ११ यावेळेत बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. हास्ययोग प्रात्यक्षिके, तसेच प्रसिद्ध हृदयरोगतज्ञ डॉ. जगदीश हिरेमठ यांचे ‘ज्येष्ठांचे आरोग्य व हास्ययोग’ या विषयावर व्याख्यान होणार आहे, अशी माहिती हास्ययोग परिवाराचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल काटे यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रसंगी मुख्य समन्वयक मकरंद टिल्लू, सचिव पोपटलाल शिंगवी, उपाध्यक्ष विजय भोसले व सहकारी उपस्थित होते.
विठ्ठल काटे म्हणाले, “या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी महापौर मुरलीधर मोहोळ, अभिनेते विजय पटवर्धन, दत्ता बहिरट, मंजुश्री खर्डेकर, अमोल रावेतकर, संदीप खर्डेकर, ऍड. पांडुरंग थोरवे, प्रकाश धोका आदी उपस्थित राहणार आहेत. सकाळी ८.४५ वाजता रंगमंदिराच्या पटांगणात हास्य योगाची प्रात्यक्षिके सादर होतील. त्यानंतर रंगमंदिरात डॉ. हिरेमठ यांचे व्याख्यान व इतर कार्यक्रम होतील. रविवारी दि. १ मे रोजी संस्थेच्या विविध शाखातील सभासद पुण्यातील निरनिराळ्या भागात हास्ययोग प्रसाराची प्रात्यक्षिके घेणार आहेत.”
पुण्यातील पहिल्या हास्यक्लबची स्थापना संस्थापक अध्यक्ष विठ्ठल व सुमन काटे यांनी १९९७ मध्ये केली होती. त्यांनी सुरु केलेल्या या चळवळीचे यंदा रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. आता नवचैतन्य हास्ययोग परिवाराच्या २०३ हास्यक्लब शाखामधून २० हजारहून अधिक सदस्यांनी या आरोग्य चळवळीचा लाभ घेतला आहेत. स्वच्छ पुणे, सुंदर पुणे, आता हसरे पुणे करण्यात संस्थेचे मोठे योगदान आहे. हास्य हे अमूल्य आहे. त्यामुळे नवचैतन्य हास्ययोग परिवाराच्या शाखेचे सभासदत्व विनामूल्य आहे.
संस्थेचे मुख्य समन्वयक मकरंद टिल्लू हे गेली २५ वर्षे हास्ययोगाचा प्रसार व प्रचार करत आहेत. त्यांच्या प्रेरणेतून लॉकडाऊनच्या काळात सुरु झालेल्या संस्थेच्या ‘हसायदान’ या ऑनलाईन शाखेचा लाभ देशातील व परदेशातील सदस्य घेत आहेत. याच आठवड्यात ही सदस्य संख्या ५ हजार झाली असून, आता हा जगातील सर्वात मोठा ऑनलाईन हास्यक्लब झाला आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान, फिनलंड, दुबई आदी देशातून तसेच दिल्ली, चंदिगड, गुडगाव अशा परप्रांतातून तसेच महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून यामध्ये सभासद आहेत.
सध्याच्या जीवघेण्या स्पर्धेच्या युगात माणसाने प्रचंड प्रगती करून स्वत:चा आर्थिक दर्जा जेवढा उंचावला आहे, तेवढाच आरोग्याचा दर्जा मात्र खालावत चालला आहे. शारीरिक स्वास्थ्य, ताणतणाव मुक्ती व मानसिक प्रसन्नता समस्त पुणेकरांपर्यंत पोहचविण्याचे अत्यंत स्तुत्य काम ‘नवचैतन्य’ करत आहेत. मानसिक नैराश्य, दमा, डायबेटीस, ब्लड प्रेशर यांनी ग्रासलेल्या जेष्ठांना, महिलांना या हास्ययोगाने अनेक फायदे झाले आहेत. परदेशात मुले असलेले पालक, तसेच जेष्ठांना अडीअडचणीच्या वेळी हास्यक्लब हे कुटुंबच बनले आहे. देशातील पहिला अंधांसाठीचा हास्यक्लब ‘नवचैतन्य’ सुरु केला आहे.
या परिवारामध्ये येण्यासाठी कोणत्याही जात, धर्म, पंथ, भाषा, आर्थिक अशी कोणतीही अट नाही. आरोग्याची जाणीव, व्यायामाची आवड, नियमित एक तास देण्याची तयारी या गोष्टी सभासदत्व देताना विचारात घेतल्या जातात. कोणीही सकाळी ६.३० ते ७.३० या वेळेत यावे, आपल्याला झेपेल तेवढा मुक्तपणे व्यायाम, प्राणायाम, हास्य व्यायाम करावा आणि आपले मन भरपूर आनंदाने भरून घरी जावे. हा दिनक्रम हजारो ज्येष्ठ नागरिक दररोज करीत आहेत, असे मकरंद टिल्लू यांनी सांगितले.