पिंपरी,दि.३- अल्प अशा ४९ वर्षांच्या आयुष्यात असामान्य साहित्यिक वाटचाल करून समाजाच्या तळागाळातील लोकांचा आवाज व आदर्श ठरलेले साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे आजही त्यांच्या विचारांनी आणि कार्याने जिवंत आहेत.समाज परिवर्तन आणि सशक्त भारताच्या निर्मितीसाठी अण्णाभाऊ साठे यांच्या लेखनाचा आणि विचारमूल्यांचा ठेवा नव्या पिढीपर्यंत पोहचवण्याची गरज असल्याचे मत प्रा. नितीन बानगुडे पाटील यांनी व्यक्त केली. (Prof. Nitin Bangude Patil expressed the need to reach the new generation.)
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त पाच दिवसीय ‘विचार प्रबोधन पर्वा’चे भव्य आयोजन (A grand five-day ‘Vichar Prabodhan Parva’ was organized on the occasion of Annabhau Sathe’s birth anniversary. ) करण्यात आले आहे. निगडी येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक परिसरात आयोजित केलेल्या प्रबोधन पर्वाचा दुसर्या दिवशी सायंकाळी “लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे-एक थोर साहित्यिक” या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आली होते,त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, माजी नगरसदस्य भगवान शिंदे, मारुती भापकर, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष बाबासाहेब रसाळ,सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब आडागळे, संदीपान झोंबाडे, नाना कसबे,संजय ससाणे,अरूण जोगदंड,सतिश भवाळ,नितीन घोलप,युवराज दाखले,दत्तू चव्हाण,आशाताई शहाणे,केसरताई लाडगे, चंद्रकांत लोंढे ,डी.पी.खंडाळे, आण्णा कसबे,शिवाजी साळवे,विशाल कसबे,गणेश अवघडे,शंकर खवळे,शांताराम खुडे,महादेव आडागळे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विविध विषयांवर समर्थ लेखणी
अण्णाभाऊ साठेंनी न्याय, हक्क, अधिकार, सामाजिक प्रबोधन, अंधश्रद्धा, रुढीपरंपरा, लोककला आदी विविध विषयांवर प्रभावी लेखन केलं. ते केवळ लेखक नव्हते, तर झुंजार विचारवंत होते. जगभरातील चळवळी, आंदोलने, श्रमिकांचे लढे यांच्याशी सुसंगत विचार त्यांनी आपल्या साहित्यातून व्यक्त केले.
शोषितांचा आवाज, कष्टकऱ्यांचा प्रतिनिधी
शोषित, वंचित, कामगार, कष्टकरी वर्गाचे प्रश्न केंद्रस्थानी ठेवून त्यांनी लेखणी चालवली. सामान्य माणसाच्या वेदना, स्वप्नं, संघर्ष यांना शब्द देणारा हा लेखक प्रत्यक्षात स्वातंत्र्य चळवळीतही सहभागी झाला होता. “कृतिशील लढवय्या” असा त्यांचा खणखणीत लौकिक होता.
तमाशातून-लोकनाट्य, लोकनाट्यातून प्रबोधन
अण्णाभाऊंनी तमाशा या पारंपरिक लोककलेचे लोकनाट्यात रूपांतर करून ते प्रबोधनाचं प्रभावी माध्यम बनवलं. त्यांनी लोककलांमध्ये परिवर्तन घडवून आणत सामाजिक जागृतीचं महत्त्वाचं कार्य केलं.
“अण्णाभाऊ साठेंनी कलांचे केवळ जतन केले नाही, तर त्यांना परिवर्तनशीलतेचं अस्त्र बनवलं,” असं वक्त्यांनी नमूद केलं.
रशियापर्यंत पोहोचलेला मराठीचा अभिमान
ते रशियात मराठी भाषेचा अभिमानाने पुरस्कार करणारे पहिले साहित्यिक होते. तिथे त्यांनी गर्वाने म्हटलं – “ही भारतभूमी माझी आहे.” छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीतून मी आलो आहे.” त्यांचा देशप्रेमाचा आणि मराठीचा आवाज केवळ भारतातच नाही, तर आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरही घुमला,रशियात देखील त्यांनी मराठीतूनच भाषण केले.
संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सिंहाचा वाटा
अण्णाभाऊ साठे यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीला लोकचळवळीचं स्वरूप दिलं. त्यांनी लोकनाट्य, पथनाट्य, जलसा, पोवाडे यांसारख्या लोककलेच्या माध्यमातून तळागाळातील जनतेपर्यंत चळवळीचे विचार पोहोचवले. विशेषतः मुंबईसह महाराष्ट्रात त्यांनी समाजजागृती करत लोकांना चळवळीत सहभागी करून घेतले. त्यांची भाषणं, लेखन व शाहिरी महाराष्ट्राच्या प्रांतिक अस्मितेला ऊर्जा देणारी ठरली. अण्णाभाऊंचे साहित्य हे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचे संस्कृतिक शस्त्र होते, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. असेही बानगुडे पाटील म्हणाले.
साहित्याचा वारसा आणि वैचारिक समृद्धी
अण्णाभाऊ साठेंनी केवळ साहित्य निर्माण केलं नाही, तर पिढ्यानपिढ्या मार्गदर्शक ठरणारा विचारांचा ठेवा दिला.
आजही त्यांच्या लेखनातून माणसाला माणूस म्हणून उभं राहण्यासाठी लढण्याचं बळ मिळतं.
त्यांची शिकवण, त्यांचा लढा, आणि त्यांचे संस्कार नव्या पिढीला दिले गेले तर सशक्त भारताच्या निर्मितीचा पाया अधिक भक्कम होईल, असा विश्वास या कार्यक्रमात त्यांनी व्यक्त केला.
दूस-या दिवसाची सुरूवात सनई वादनाने झाली,त्यानंतर पल्लवी घोडे आणि मोहम्मद रफी शेख यांनी प्रबोधनपर गीते सादर केली,तर विशाल मराठे यांनी “लहुजी वस्ताद साळवे – एक थोर क्रांतिगुरू ” या विषयावर व्याख्यान देत स्वातंत्र्यपूर्व चळवळीतील लहुजी वस्ताद साळवे यांच्या महत्त्वपूर्ण योगदानावर मार्गदर्शन केले.
दुपारच्या सत्रात “साहित्यसम्राटास गीतातून अभिवादन” या कार्यक्रमात गायक धीरज वानखेडे यांनी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनावर आधारित गीते सादर केली तर भाऊ बापू मांग कलापथक नारायणगावकर यांच्या १५ कलाकारांनी गीतगायन तसेच नृत्याद्वारे अण्णाभाऊंना अभिवादन केले.
या प्रबोधनपर्वात “संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील अण्णा भाऊ साठे यांचे योगदान ” या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आलेला होता.या परिसंवादात प्रा.प्रदीप कदम,प्रा.बालाजी कांबळे,संदीपान झोंबाडे,दिशा खिलारे यांनी सहभाग घेतला होता.