हवाई वाहतूक सुलभ व वेगवान करण्यासाठी ‘एआय’चा उपयोग करणार

हवाई वाहतूक सुलभ व वेगवान करण्यासाठी ‘एआय’चा उपयोग करणार

केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांचे मत; एरोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडियातर्फे दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

पुणे: “हवाई क्षेत्रात भारताने नेत्रदीपक भरारी घेतली असून, २०४७ पर्यंत भारत जगाच्या क्षितिजावर आपला दबदबा निर्माण करेल. पूर्ण भारतीय बनावटीचे प्रादेशिक हवाई उड्डाण वाहतूक सुरू करण्यासाठी हवाई मंत्रालय प्रयत्नशील आहे. सध्या विमानाचे ३० ते ३५ टक्के समभाग देशांतर्गत निर्माण होत आहेत. हे प्रमाण वाढवण्यासाठी आगामी पाच वर्षाचा रोडमॅप तयार करण्यात आला आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने हवाई वाहतूक सुरळीत करण्यासह विविध उपाययोजना राबविण्यासाठी संशोधनावर भर दिला जाईल,” असे मत केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांनी व्यक्त केले.

दी एरोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडियातर्फे दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद आणि ७३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत राममोहन नायडू बोलत होते. पाषाण रस्त्यावरील डॉ. एपीजे अब्दुल कलाम ऑडिटोरियममध्ये ‘विकसित भारतासाठी एरोस्पेस क्षेत्रातील आव्हाने’ या संकल्पनेवर ही राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली होती. प्रसंगी संयुक्त अरब अमिराती येथील अबुधाबी स्कुल ऑफ मॅनेजमेंटचे चेअरमन डॉ. तय्यब कमाली, ‘इसरो’चे माजी चेअरमन डॉ. एस. सोमनाथ, ‘डीआरडीओ’चे माजी चेअरमन व सोसायटीचे अध्यक्ष डॉ. सतीश रेड्डी, सचिव जेष्ठ शास्त्रज्ञ जेया संथी, महासंचालक प्रा. प्रतीक किशोर, ‘डीआरडीओ’ ‘एचईएमआरएल’चे संचालक डॉ. ए. पी. दास, ‘एआरडीई’चे संचालक अकांती राजू, सहयोगी संचालक एम. व्ही. रमेश कुमार आदी उपस्थित होते. यावेळी सोसायटीच्या स्मरणिकेचे प्रकाशन केंद्रीय मंत्री नायडू यांच्या हस्ते करण्यात आले.

राममोहन नायडू म्हणाले, “एअरोस्पेस क्षेत्रात घडत असलेल्या बदलांचा फायदा सिव्हिल एव्हीएशन क्षेत्रास होत आहे. एरोनोटीकल सोसायटीचे ५० हजार शास्त्रज्ञ असून ते विविध विभागात काम करतात. देशाला नवीन आकार देण्याचे काम एरोनोटीकल सोसायटी देत आहे. या क्षेत्रात प्रत्येक आव्हान ही आपली संधी मानून त्यादृष्टीने काम केले पाहिजे. जगात सर्वाधिक वेगाने हवाई वाहतूक क्षेत्र भारतामध्ये विकसित होत असून, दरवर्षी १० ते १२ टक्के विमान प्रवासी वाढत आहेत. विमानतळांची संख्या मागील दहा वर्षात दुप्पट झाली आहे. पुढील पाच वर्षांत ५० नवीन विमानतळ, तर २०४७ पर्यंत २०० विमानतळ विकसित करण्यात येतील. नवी मुंबई, नोयडा विमानतळ काम अंतिम टप्प्यात आले आहे. मुंबई, पुणे सारख्या देशातील मोठ्या शहरातील हवाई वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि प्रवासी वेळ वाचविण्याकरिता आगामी काळात हवाई मंत्रालय सुरक्षित हवाई टॅक्सेस सेवा सुरू करण्यासाठी काम करत असून, याची प्रायोगिक चाचणी २०२६ मध्ये होणार आहे. भारतीय हवाई क्षेत्रात महिला पायलटचे प्रमाण २५ टक्के किमान करण्यासाठी आम्ही लक्ष्य ठेवले आहे. भारताकडे ड्रोन निर्मितीची चांगले कौशल्य आणि क्षमता असून सध्या ३० हजार ड्रोन आहेत. २०४७ पर्यंत ही संख्या तीस लाखांपर्यंत जाईल. स्टार्टअपमध्येही ड्रोन उत्पादकांनी आणि युवकांनी पुढाकार घ्यावा. ड्रोन उत्पादनाला प्रोत्साहन मिळण्यासाठी यावरील अटी शिथिल करून आयात शुल्क कमी करण्यात येईल.”
 
डॉ. तय्यब कमाली यांनी सांगितले, “एरोस्पेससह विविध क्षेत्रात मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञानामुळे बदल घडत आहेत. त्यातील समस्याचा दबाव सर्वांवर आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर विविध क्षेत्रात होऊ लागला आहे. रुग्णांचे आजार निदान करणे आणि शस्त्रक्रिया यात एआयमुळे अचूकता आली आहे. वॉशिंग्टनमध्ये प्रवासी विमान आणि हेलिकॉप्टर धडकल्याची घटना नुकतीच घडली; पण त्याजागी एआय वापर झाला असता, तर घटना टळू शकली असती.”

डॉ. एस. सोमनाथ म्हणाले, “इसरोमध्ये काम करताना एरोनोटीकल सोसायटीकडे आम्ही आकर्षित झालो. डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या नेतृत्वात आम्हाला काम करण्याची संधी मिळाली. देशभरातील एरोस्पेसमध्ये काम करणारे सर्व तज्ज्ञ एकत्रित आले आहेत. एरोस्पेस क्षेत्र हे बदलत्या काळात ‘आत्मनिर्भर भारत’ विकसित करण्यासाठी पूरक आहे. युवकांनी या क्षेत्रात आकर्षित होऊन काम करावे. कौशल्य आधारित मनुष्यबळ त्यासाठी निर्माण केले गेले पाहिजे. स्टार्टॲप, संशोधनावर भर दिला पाहिजे.”

डॉ. सतीश रेड्डी म्हणाले, “स्वातंत्र्यानंतर १९४८ मध्ये एरोनोटीकल सोसायटीची स्थापना झाली. आज देशभरात २२ शाखा त्याच्या झाल्या असून एरोनोटीकल संदर्भात विविध काम करत आहे. ‘विकसित भारतमध्ये एरोस्पेस क्षेत्रातील आव्हाने’ याबाबत चर्चा या परिषदेत करण्यात येत आहे. विकसित भारत अंतर्गत प्रादेशिक ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट बनवण्याचे आमचे स्वप्न आहे. हे एअरक्राफ्ट देशाला इतर ठिकाणी निर्यात देखील करता येईल. एरोस्पेस मध्ये देशाला अग्रेसर करण्यासाठी सर्वांचे एकत्रित प्रयत्न गरजेचे आहे.”

या परिषदेत हवाई क्षेत्राशी संबंधित नागरी हवाई उड्डाण, स्पेस व्हेइकल्स, सॅटेलाईट्स, एरो इंजिन्स, मिसाईल सिस्टिम्स, लढाऊ विमाने व एरोस्पेस, ड्रोन्स, हेलिकॉप्टर्स अशा विविध विषयांवर  चर्चासत्रात तज्ज्ञ, शास्त्रज्ञ यांनी मार्गदर्शन केले. स्टार्टअप आणि उद्योग यांच्यातील संवाद सत्राचे, विद्यार्थ्यांच्या प्रकल्पाचे प्रदर्शन, तसेच विविध स्मृती व्याख्याने या परिषदेत आयोजित करण्यात आली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *