पुणे: विद्यार्थी साहाय्यक समितीच्या वसतिगृहात मुलींसाठी प्रवेश सुरू झाले आहेत. ग्रामीण भागातील गरजू, होतकरू आणि अल्प उत्पन्न गटातील विद्यार्थिनी ज्यांनी उच्च शिक्षणासाठी पुण्यात प्रवेश घेतला आहे, अशाच विद्यार्थिनींनी या टप्प्यात अर्ज करावेत, असे समिती व्यवस्थापनाने कळविले आहे.
पुण्यात मुलींसाठी नवे वसतिगृह बांधले आहे. तेथे ३३६ मुलींची व्यवस्था वाढणार आहे. ग्रामीण भागातील ज्या विद्यार्थिनी सध्या दुसऱ्या, तिसऱ्या आणि त्यापुढील वर्गात पुण्यातील महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत आणि त्यांची निवास, भोजनाची अडचण आहे, अशांना समितीच्या वेबसाईटवर (www.samiti.org) जाऊन प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज भरता येतील. अर्जाची छाननी होऊन मुलाखतीनंतर प्रवेश निश्चित केले जातील.
समितीचे कार्य केवळ समाजाच्या मदतीवर ६९ वर्षे सुरू असून, सध्या पाच वसतिगृहांतून ७५० मुला-मुलींसाठी व्यवस्था उपलब्ध आहे. ग्रामीण भागातील मुलींचे पुण्यात शिक्षणाला येण्याचे प्रमाण वाढल्याने अजून एका वसतिगृहाची उभारणी केल्यामुळे ही संख्या सुमारे ११०० होणार आहे. केवळ कमी खर्चात निवास, भोजनाची सुविधा पुरविणे एवढाच समितीचा हेतू नसून, युवा परिवर्तनाचे केंद्र म्हणून समिती काम करते, असे संस्थेने कळवले आहे.