हणमंतराव गायकवाड यांचा विद्यार्थ्यांना सल्ला; समितीतील मुलींच्या वसतिगृहात तीन मजल्यांचे उद्घाटन
पुणे: “जीवनात स्वतः पलीकडे जाऊन इतरांचाही विचार करा. मनात जिद्द ठेवा. धाडसी वृत्तीचा अंगीकार करा. सर्वोत्तमाचा ध्यास घेऊन त्याला परिश्रमांची जोड दिली, तर यश तुमचेच आहे,” असा सल्ला बीव्हीजी ग्रुपचे अध्यक्ष हणमंतराव गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना दिला. गायकवाड यांनी स्वतःची संघर्षपूर्ण व्यावसायिक वाटचाल विद्यार्थ्यांसमोर उलगडली. प्रजासत्ताक दिनी विद्यार्थी साहाय्यक समितीमध्ये ध्वजारोहण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
गायकवाड म्हणाले, “मी छोट्या गावातून पुढे आलो. घरच्यांचा विरोध पत्करून तरुण वयात स्वतःची कंपनी स्थापन केली. नोकरी करत असताना वेळ, श्रम आणि पैसा यांचा विचार न करता अधिक काम करण्याचा प्रयत्न केला. वरिष्ठांपर्यंत ही गोष्ट पोचल्याने मला बढतीची संधी मिळाली. त्यांच्या परिचयातून माझ्या स्वतःच्या कंपनीला कामे मिळू लागली आणि नंतर मी मागे वळून पाहिले नाही. बीव्हीजी हा आज ब्रॅंड झाला आहे. त्यामागे माझ्यासह आमच्या टीमचे अथक परिश्रम उभे आहेत.”
“हाऊसकीपिंगचे काम हलके मानले नाही. दर्जा, सुधारणा आणि काळानुरूप योग्य तंत्रज्ञान व यंत्रांचा स्वीकार, ही त्रिसूत्री आम्ही अंगिकारली. आठ लोकांपासून सुरु झालेला व्यवसाय आज एक लाखापेक्षा जास्त लोकांना रोजगार देणारा झाला आहे. देश-विदेशांत व्यवसायाचा विस्तार झाला असून, संसद, राष्ट्रपती भवनासह अनेक विमानतळ, प्रमुख कंपन्या, आस्थापनांसाठी बीव्हीजी कार्यरत आहे. विद्यार्थ्यांनी मनात जिद्द ठेवली पाहिजे. दृढनिश्चयी असले पाहिजे. सर्वोत्तम कामाचा ध्यास घेतला पाहिजे आणि त्याला परिश्रमांची जोड दिली पाहिजे,” असेही त्यांनी सांगितले.
ध्वजारोहण झाल्यानंतर मुलींच्या नवीन वसतिगृहातील दुसऱ्या, तिसऱ्या व चौथ्या मजल्याचे, तसेच संगणक कक्षाचे उद्घाटन देणगीदारांच्या हस्ते करण्यात आले. प्रसंगी देणगीदार नितीन कारिया, प्रीती राव व जय राव, परशुराम दाते, शिवाजीराव गणगे, समितीचे अध्यक्ष प्रतापराव पवार, मानद विश्वस्त भाऊसाहेब जाधव, कार्यकारी विश्वस्त तुषार रंजनकर, विश्वस्त तुकाराम गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी जय राव यांनी समितीला ५० लाख रुपयांची देणगी जाहीर केली. विद्यार्थ्यांच्या पालकांचा मेळावा घेण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांनी दिवाळी सुट्टीत संकलित केलेल्या निधीचा धनादेश समितीचे अध्यक्ष व खजिनदारांकडे सुपूर्द करण्यात आला.
नितीन कारिआ म्हणाले, ‘इमारतीच्या भूमीपूजनाला आलो होतो. अवघ्या २२ महिन्यांत वसतिगृहाची इमारत उभी राहिली, हे काम वेळेपूर्वी झाले हे कौतुकास्पद आहे. ‘स्वतःपलीकडे जाऊन समर्पित वृत्तीने काम कसे करता येते, याचा आदर्श समितीने निर्माण केल्याची खात्री पटल्यानेच देणगी दिली आणि ती किती सार्थ आहे, हे समितीने कामातून सिद्ध केले,’ असे प्रीती राव म्हणाल्या.
‘समिती गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी आधारवड आहेच, ती वटवृक्षाप्रमाणे विस्तारत जाईल, असा विश्वास परशुराम दाते यांनी व्यक्त केला. ‘समाजसेवा कशी करावी आणि उत्तम नागरिक कसे घडवावेत, हे समितीच्या कामातून लक्षात येते. समितीशी जोडले जाण्याचा आम्हाला अभिमान वाटतो,’ असे शिवाजीराव गणगे म्हणाले.
प्रतापराव पवार म्हणाले, “समितीच्या कार्याची सुरवात अच्युतराव आपटे यांनी किती द्रष्टेपणाने केली होती, हे आज लक्षात येत आहे. आपटे यांनी जे स्वप्न पाहिले, तो एक हजार विद्यार्थ्यांच्या सोयीसुविधांचा टप्पा आज पूर्ण होत आहे, ही आनंदाची बाब आहे. समितीच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा, विद्यार्थ्यांचा, माजी विद्यार्थ्यांचा, विश्वस्तांचा आणि देणगीदारांचा या कार्यात महत्त्वाचा वाटा आहे.”
समितीचे विश्वस्त भाऊसाहेब जाधव यांनी आभार मानले. संजय अमृते यांनी समितीच्या कार्यामागील भूमिका मांडली. अनुष्का राउत, सागरिका उढाणे आणि पूर्वा अहिरराव यांनी सूत्रसंचालन केले.