जयंत गोरे यांची माहिती; स्मिता ग्रुप ऑफ कंपनीचा दशकपूर्ती सोहळा उत्साहात साजरा
पुणे : प्रसिद्ध अभिनेत्री जुई गडकरी यांची स्मिता हॉलिडेजच्या ब्रँड अँबेसेडर म्हणून निवड करण्यात आली आहे. पुढील तीन वर्षांच्या कालावधीकरिता गडकरी यांची ब्रँड अँबेसेडर म्हणून निवड करण्यात आली आहे. स्मिता ग्रुप ऑफ कंपनीचा दशकपूर्ती सोहळा नुकताच पुण्यासह छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अहमदनगर, लातूर, अंबेजोगाई या विविध शहराच्या शाखांमध्ये साजरा झाला, असे स्मिता हॉलिडेजचे संस्थापक जयंत गोरे यांनी सांगितले.
सांस्कृतिक कार्यक्रमासह उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शासकीय व निमशासकीय व्यक्तींच्या गौरव करण्यात आला. जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, अधिकारी व इतर मान्यवरांना विशेष स्मृतिचिन्ह प्रदान करून सन्मानित करण्यात आले. यावेळी भारतात आणि परदेशातील विविध ठिकाणच्या खास विंटर टूर्सची घोषणा करण्यात आली. भारतातील केरळ, अंदमान, राजस्थान तसेच परदेशातील दुबई, सिंगापूर, बाली यासह अनेक पर्यटन ठिकाणांचा यात समावेश आहे.

सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये देशभक्तीपर गीते, मराठी हिंदी चित्रपट गीते यांचा ‘सुनहरी गीतो का सफरनामा’ प्रसिद्ध गायक राजू काजे, सुप्रसिद्ध गायिका संगीता भावसार आणि किरण देशपांडे यांनी सादर केला. राजेश देहाडे आणि कलाकारांनी साथसंगत केली.
जयंत गोरे म्हणाले, “थोर समाजसेवक आमटे परिवाराच्या आदर्शातून आम्ही गेली १० वर्षे कार्यरत आहोत. आजवर स्मिता हॉलिडेज सोबतीने अकरा हजार पर्यटकांनी महाराष्ट्रातून वेगवेगळ्या ठिकाणी पर्यटन केले आहे. पर्यटनासोबतच स्मिता हॉलिडेजने सामाजिक बांधिलकी जपली असून, ‘एक झाड आपल्यासाठी’ उपक्रमाअंतर्गत तीन हजार झाडे लावण्यात पुढाकार, दिव्यांग, अनाथ आश्रमातील व्यक्तींना मोफत विमान प्रव, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळसह (एमटीडीसी) राज्यपातळीवर मराठवाडा साहसी पर्यटन महोत्सव, पॅराग्लाईडींग, पॅरामोटार, हॉट एअर बलून यासारख्या साहसी खेळांचे आयोजन, महिला दिनानिमित्त महिला सशक्तीकरण उपक्रम, जागतिक पातळीवर आयोजित झालेल्या अजंता-वेरूळ आंतरराष्ट्रीय महोत्सवामध्ये सक्रिय सहभाग, जी-२०, आझादी का अमृतमहोत्सव, मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृतमहोत्सव आदी उपक्रमांत स्मिता ग्रुप ऑफ कंपनीने भरीव योगदान दिले आहे.”

गायक राजेश सरकटे यांनी मनोगत व्यक्त करताना स्मिता ग्रुप ऑफ कंपनीच्या सामाजिक जाण आणि भान राखत करत असलेल्या कार्याचे भरभरून कौतुक केले. स्मिता हॉलिडेजसोबत जाणवलेला जिव्हाळा इतर कुठल्याही पर्यटन संस्थेसोबत पाहायला मिळाला नाही, अशी भावना अमरनाथ यात्रा केलेल्या ७२ वर्षीय चंदाबाई छनवाल यांनी व्यक्त केली.
                            
 
                     
             
                                         
                                         
                                         
                                                 
                                                 
                                                