‘सूर्यदत्त’ विद्यार्थ्यांमध्ये जागवतेय राष्ट्रभक्तीची भावना
सुभेदार मेजर संजय कुमार यांचे मत; सूर्यदत्त राष्ट्रीय जीवनगौरव व सूर्यदत्त राष्ट्रीय पुरस्काराचे वितरण
पुणे: “इतिहास उज्जवल कार्याने लिहिला जातो. त्याग, बलिदान व समर्पण भावनेने कार्य करणाऱ्या प्रतिभावंत व्यक्तिमत्वांना सन्मानित करून समाजासमोर आदर्श ठेवणाऱ्या ‘सूर्यदत्त’ संस्थेचा हा सन्मान सोहळा प्रेरक आहे. यातून भविष्यातील चांगला नागरिक घडवण्याचे कार्य होत आहे. देशाच्या प्रगतीचे पंख असलेल्या युवा पिढीला दिशा देण्याचे कार्य ‘सूर्यदत्त’ संस्था व चोरडिया दाम्पत्य करीत आहे,” असे प्रतिपादन अहिंसा विश्वभारतीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. आचार्य लोकेश मुनी यांनी केले. मूल्याधिष्ठित, सर्वांगीण विकासाच्या शिक्षणासाठी कार्यरत सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे कौतुक वाटते, असेही आचार्य लोकेश यांनी नमूद केले.
सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या २७ व्या वर्धापनदिनी २३ व्या ‘सूर्यदत्त राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार’ व सूर्यदत्त राष्ट्रीय पुरस्कार’ वितरण समारंभात डॉ. आचार्य लोकेश मुनी बोलत होते. बाणेर येथील बंटारा भवन येथे आयोजित समारंभावेळी परमवीरचक्र विजेते सुभेदार मेजर संजय कुमार, ज्येष्ठ मूर्तिशास्त्र अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर, ज्येष्ठ अभिनेते रझा मुराद, सचिन पिळगावकर, ज्येष्ठ अभिनेत्री जया प्रदा, सिस्टर लुसि कुरियन, लेफ्टनंट जनरल अशोक आंब्रे, संगीतकार अबू मलिक, सूर्यदत्त एज्युकेशन फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, उपाध्यक्षा सुषमा चोरडिया, सहयोगी उपाध्यक्षा स्नेहल नवलखा, डॉ. किमया गांधी, मुख्य कार्यपालन अधिकारी अक्षित कुशल यांच्यासह सूर्यदत्त’च्या सर्व विभागांचे संचालक, प्राचार्य, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आचार्य डॉ. लोकेश मुनीजी यांना ‘सूर्यभूषण ग्लोबल पीस अवॉर्ड २०२५’ देऊन सन्मानित करण्यात आले. यंदाचा ‘सूर्यदत्त राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार’ परमवीर चक्र विजेते सुभेदार मेजर संजय कुमार, ज्येष्ठ मूर्तीशास्त्र अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर, प्रसिद्ध अभिनेते सचिन पिळगावकर, अवकाश शास्त्रज्ञ प्रा. डॉ. नरेंद्र भंडारी, सामाजिक कार्यकर्ते व साहित्यिक सीए डॉ. अशोककुमार पगारिया, नीलकंठ ज्वेलर्सचे दिलबाग सिंग बीर, वैद्यकीय सामाजिक सेवा प्रदान करणारे डॉ. सदानंद राऊत, उद्योजक मयूर वोरा, मयूर शाह यांना, तर सूर्यदत्त राष्ट्रीय पुरस्कार’ पर्यावरण अभ्यासक पद्मश्री चैत्राम पवार, माजी खासदार व ज्येष्ठ अभिनेत्री जया प्रदा, अभिनेत्री स्मिता जयकर, क्रस्ना डायग्नोस्टिकचे राजेंद्र मुथा, जागतिक व्यापार तज्ज्ञ सागर चोरडिया, सहकार तज्ज्ञ डॉ. शिवाजीराव डोले, प्रेरक वक्ते राहुल कपूर जैन, उद्योजक इंद्रनील चितळे, सामाजिक कार्यकर्ते किशोर खाबिया, कृषी उद्योजक सुनील वाघमोडे यांना, तर ‘सूर्यदत्त नॅशनल यंग अचिव्हर अवॉर्ड’ स्टार्टअप आणि उद्योजकतेसाठी जैनम व जीविका जैन यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. ‘सूर्यदत्त’च्या विद्यार्थ्यांनी बनवलेले खास उपरणे, मानचिन्ह व मानपत्र देऊन पुरस्कार्थीना सन्मानित करण्यात आले.
डॉ. गो. बं. देगलूरकर म्हणाले, “दृष्ट लागण्यासारखा हा कार्यक्रम असून, सूर्यदत्त ही शिक्षण क्षेत्रातील जगन्मान्य अशी संस्था आहे. या संस्थेकडून आम्हाला सन्मानित करण्यात आले, याचा आनंद वाटतो. ‘तमसो मा ज्योतिर्गमय’ या ध्येयावर ही संस्था काम करते. ज्ञान संपादन करण्याचे कार्य अविरत आहे. शेवटच्या श्वासापर्यंत ज्ञान मिळवत राहिले पाहिजे. समाजातील चांगले लोक शोधून त्यांना सन्मानित करण्याचे काम चोरडिया दाम्पत्य निर्मळ मनाने करत आहे.”
सचिन पिळगावकर म्हणाले, “जीवनात ईश्वराचा आणि प्रेक्षकांचा आशीर्वाद भरभरून मिळाला. प्रेक्षकांना सतत काहीतरी नाविन्यपूर्ण, मनोरंजन करणारे देण्याच्या भावनेतून काम करत आलो. नव्या दमाच्या निर्मात्यांना सहकार्य करण्याची भावना माझी आहे. स्त्री ही पुरुषापेक्षा श्रेष्ठ असते. आपल्या मातेचे, पत्नीचे, मुलीचे खूप योगदान असते. सूर्यदत्त इन्स्टिट्यूट्समधून आदर्श पिढी घडवण्याचे काम होते आहे. हा पुरस्कार भारतीय सेनेला समर्पित करतो.”
सुभेदार मेजर संजय कुमार म्हणाले, “देशात विद्यार्थ्यांच्या मनात राष्ट्रभक्तीचा, ज्ञानाचा दिवा पेटवण्याचे काम सूर्यदत्त संस्था करत आहे. शिक्षण हे जीवनात येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी उपयुक्त ठरते. हा सन्मान माझा एकट्याचा नाही, तर सैन्यदलातील माझ्या प्रत्येक सहकाऱ्याचा आहे. देशासाठी कायम समर्पित भावना जपायला हवी.”
लूसी कुरियन म्हणाल्या, “समाजातील अनाथांसाठी काम करण्याची प्रेरणा मिळाली. माहेर संस्थेतून आज शेकडो विद्यार्थी घडले, याचा आनंद वाटतो. या कार्यात अनेक चांगल्या लोकांची साथ मिळते. त्यामुळे माहेरचे काम आज सात रस्त्यांत विस्तारले आहे. आपण सर्वानी मिळून हे काम आणखी पुढे न्यायला हवे. आपल्या सर्वांची साथ भविष्यातही मिळेल, असा विश्वास वाटतो.”
रझा मुराद म्हणाले, “सूर्यदत्त संस्था ही विद्यार्थ्यांची मुळे आहेत. आईवडिल खूप परिश्रम करून तुम्हाला शिकवत असतात. त्यामुळे आपल्याला घडवणाऱ्या आईवडिलांना, शिक्षण संस्थेला कधीही विसरता कामा नये. भारतीय संस्कार, मूल्ये खूप महान आहेत. या मूल्यांचे व संस्काराचे शिक्षण या संस्थेत दिले जाते. त्यामुळे भविष्यातील पिढी चांगली घडणार यात शंका नाही.”
जया प्रदा म्हणाल्या, समाजामध्ये सेवा करण्याची संधी मिळाली, तर सोडू नये. तेराव्या वर्षी चित्रपट सृष्टीत आले. करिअरमध्ये प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले. राजकारणातही तीनवेळा खासदार झाले. चित्रपट सृष्टी आणि राजकारणातून समाजाची सेवा करता आल्याचे समाधान आहे.
पद्मश्री चैत्राम पवार यांनी जंगल, जल, जमीन, जन आणि पशुधन याचे महत्व विशद केले. ही स्थानिक संपत्ती असून, त्याचे रक्षण करायला हवे. शाश्वत विकास, पर्यावरण संवर्धनासाठी आपण कार्यरत राहायला हवे, असे त्यांनी नमूद केले.
राहुल कपूर जैन यांनी प्रेरक भाषणाने उपस्थितांना प्रभावित केले. विद्यार्थ्यांसमवेत, तरुणासोबत काम करताना मलाही खूप ऊर्जा मिळते, असे त्यांनी नमूद केले. इंद्रनील चितळे यांनी टीमवर्क, आव्हानात्मक भूमिका निभावण्याची तयारी गरजेची असल्याचे सांगितले.
प्रास्ताविकात प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी हा पुरस्कार सोहळा विद्यार्थ्यांना प्रेरणा व ऊर्जा देणारा असल्याचे सांगितले. दीपस्तंभासारखे कार्य करणाऱ्या समाजातील विविध क्षेत्रात भरीव योगदान दिलेल्या व्यक्तींना गेली तेवीस वर्षे सूर्यदत्त जीवनगौरव व सूर्यदत्त राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. सर्वांसाठी सर्वांगीण विकासाचे शिक्षण हे ध्येय घेऊन सूर्यदत्त गेली २७ वर्षे वाटचाल करत आहे. विविध उपक्रमांतून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाला चालना देण्यात येते.
सीए अशोक कुमार पगारिया, राजेंद्र मुथा यांनीही मनोगते व्यक्त केले. सर्व मान्यवरांनी पुरस्कारप्राप्त व्यक्तींचा गौरव केला व सूर्यदत्त संस्थेच्या कार्याला शुभेच्छा दिल्या. डॉ. श्वेता राठोड-कटारिया यांनी सूत्रसंचालन केले. स्नेहल नवलखा यांनी आभार मानले.