वारकऱ्यांना देण्यात येणाऱ्या सेवासुविधांबाबत घेण्यात आला आढावा, स्वागताची तयारी अंतिम टप्प्यात
पिंपरी, २८ – आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या स्वागताची तयारी अंतिम टप्प्यात आली असून पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे आणि महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी पालखी मार्गाची आज, मंगळवारी (२७ मे) पाहणी केली.
पिंपरी चिंचवड शहरात जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे १९ जून रोजी आगमन होणार असून यादिवशी पालखीचा मुक्काम आकुर्डी येथे असणार आहे. तर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे पिंपरी चिंचवड हद्दीमध्ये २० जून रोजी आगमन होणार असून त्याच दिवशी पालखी पुण्याच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे. या दोन्ही सोहळ्याच्या स्वागत आणि नियोजनासाठी पोलीस आणि महापालिका प्रशासन सुक्ष्म नियोजन करीत आहे. या अनुषंगाने आज पोलीस व महापालिका प्रशासनाच्या वतीने पालखी मार्गाची संयुक्त पाहणी करण्यात आली.
या पाहणी दौऱ्यावेळी महापालिका शहर अभियंता मकरंद निकम, सह शहर अभियंता बापू गायकवाड, देवन्ना गट्टूवार, उपायुक्त अण्णा बोदडे, राजेश आगळे, सचिन पवार, सहाय्यक आयुक्त उमेश ढाकणे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे, कार्यकारी अधिकारी शिवराज वाडकर, संतोष दुर्गे, अपर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, पोलीस उप आयुक्त डॉ. शिवाजी पवार, बापू बांगर यांच्यासह पोलीस आणि महापालिका प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते.
आषाढीवारी पालखी सोहळ्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने देण्यात येणाऱ्या सेवा सुविधांमध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता राहणार नाही, यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने सोयीसुविधांचे नियोजन करावे. पालखी मार्गावर पावसाचे पाणी कोठेही तुंबणार नाही, याची दक्षता घेऊन या मार्गावरील खड्डे बुजविण्याच्या सुरु असलेल्या कार्यवाहीचा वेग वाढवावा. (The ongoing process of filling the potholes on the Palkhi route should be accelerated, ensuring that rainwater does not stagnate anywhere.) वारकऱ्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी योग्य त्या सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश यावेळी आयुक्त सिंह यांनी दिले. पालखी सोहळा मार्गावर वारकऱ्यांसाठी देण्यात येणाऱ्या सुविधांचा आढावा यावेळी घेण्यात आला.