Post Views: 34
अवांछित गरोदरपण नाकारण्याचा अधिकार स्त्रीकडे हवाच
डॉ. मीना बोराटे यांचे प्रतिपादन; फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडियाचा अमृत महोत्सवी कार्यक्रम
पुणे : स्त्रियांना मूल हवे की नको, याचा निर्णय घेण्याचा अधिकार असला पाहिजे. हा अधिकार मिळवून देण्यासाठी वैद्यकीय, सामाजिक, आर्थिक, प्रशासकीय पातळ्यांवर सातत्याने प्रयत्न आणि पाठपुरावा करण्यात डॉ. सुमती कानेटकर यांचे बहुमूल्य योगदान आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, डॉ. कानेटकर यांच्या कन्या डॉ. मीना बोराटे यांनी केले. आयुष्यभर स्त्रियांचे आरोग्य, गरोदरपण नाकारण्याचा अधिकार आणि प्रबोधन यासाठी डॉ. कानेटकर यांनी स्वतः:ला वाहून घेतले होते, असेही त्या म्हणाल्या.
फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडियाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पुणे शाखेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. संस्थेच्या पुणे शाखेच्या अध्यक्ष ऍड. अवलोकिता माने, डॉ. उल्हास लुकतुके यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. संस्थेच्या वाटचालीत महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांचा विशेष प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. आपल्या आई डॉ. कानेटकर यांचे कार्य पुढे नेण्यासाठी डॉ. बोराटे यांनी संस्थेला पाच लाख रुपयांची देणगी जाहीर केली.
डॉ. मीना बोराटे म्हणाल्या, “आईने अतिशय प्रतिकूल परिस्थितीत वैद्यकीय उच्चशिक्षण पूर्ण केले. विविध ठिकाणी कुटुंब नियोजनाच्या मोहिमा राबवताना फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडियाच्या पुणे शाखेची गरज जाणवली. त्यामुळे ही पुणे शाखा सुरू झाली आणि उत्तम पद्धतीने कार्यरत आहे. जीवनभर आईने अडाणी, निरक्षर, गरीब स्त्रियांच्या आरोग्याचा विचार केला. नको असलेले गरोदरपण नाकारण्याचा अधिकार स्त्रीकडे हवाच, यासाठी लढा दिला. या संदर्भातील केंद्रीय कायदे, नियमावली तयार करण्यात तिचा महत्त्वाचा सहभाग होता.”
डॉ. उल्हास लुकतुके म्हणाले, “सुखी कौटुंबिक जीवन जगण्यासाठी नियोजन आवश्यक आहे, हे जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वाचे कार्य फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडियाने केले आहे. कुटुंब नियोजनाविषयी लोकांच्या मनात असणारे अनेक गैरसमज दूर करण्यासाठी संस्थेने काम केले आहे.”
ऍड. अवलोकिता माने यांनी फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडियाच्या कार्याचा आढावा घेतला. डॉ. वैशाली जाधव यांनी राष्ट्रगीत सादर केले तर प्रवीण सोनवणे यांनी सूत्रसंचालन केले. उज्ज्वला पारसनीस यांनी आभार मानले.