‘प्रगत दंतोपचार व रोपण’वर पुण्यात तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद
शुक्रवार, दि. २२ नोव्हेंबर २०२४ रोजी सायंकाळी ६.०० वाजता बालेवाडी येथील हॉटेल ऑर्किड येथे सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठातील प्रोफेसर डॉ. दीनानाथ खोळकर यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन होणार आहे. जर्मनी येथील ओरल सर्जन डॉ. फ्रॅंक झास्ट्रो व इजिप्त येथील इम्प्लांटालॉजिस्ट डॉ. सॅम ओमर आदी विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती इंडियन सोसायटी ऑफ डिजिटल डेन्टिस्ट्रीचे अध्यक्ष डॉ. रत्नदीप जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रसंगी सचिव डॉ. विजय ताम्हाणे, खजिनदार डॉ. कौस्तुभ पाटील, संचालक डॉ. माधवी मापूस्कर व डॉ. विजय मब्रूकर उपस्थित होते.
डॉ. रत्नदीप जाधव म्हणाले, “जगभरातील दंतवैद्यकांना एकत्रित आणून नवतंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देणे, जगभरातील नाविन्यपूर्ण, डिजिटल डेन्टिस्ट्रीचा प्रचार व प्रसार करून अत्याधुनिक उपकरणे बनवणाऱ्या कंपन्यांना व डॉक्टरांना एकत्र आणणे, या उद्देशाने ही परिषद महत्वपूर्ण ठरणार आहे. तीन दिवसीय या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये अत्याधुनिक मशिनरी, विविध प्रगत संगणक प्रणाली, थ्रीडी प्रिंटिंग, स्कॅनिंग, रोबोटिक सारख्या नव्या दंतोपचार व दंतरोपण उपचारांवर चर्चा होणार आहे. देशभरातून ८०० हुन अधिक दंतवैद्यक सहभागी होणार आहेत. भारतासह अमेरिका, इंग्लंड,, इटली, इजिप्त, ग्रीस, टर्की, ऑस्ट्रिया, पोलंड या देशातूनही काही दंतवैद्यक सहभागी होतील. तीनही दिवस चर्चासत्रांसह प्रात्यक्षिक कार्यशाळा होणार आहेत. तसेच अत्याधुनिक उपकरणांचे प्रदर्शन येथे असणार आहे.”
डॉ. विजय ताम्हाणे म्हणाले, “परिषदेत माईक बारसेव (जर्मनी), डॉ. विपीन माहूरकर (भारत), डॉ. नीरज रोहिडा, डॉ. निखिल देशपांडे, डॉ. नील आशर, डॉ. सतीश पालायन (अमेरिका), डॉ. पंकज चिवटे, डॉ. निखिल जाधव, डॉ. फ्रॅंक झास्ट्रो (जर्मनी), डॉ. रत्नदीप जाधव, डॉ. सॅम ओमर (इजिप्त), डॉ. लॉरेन्स सेर्स (फ्रान्स), डॉ. दाईही ली (न्यूझीलंड), डॉ. नीरज किनारीवाला, डॉ. लुईगी रूबिनो (युरोप), आंद्रेई अँड्रीव्ह (रशिया), डॉ. माजिद ओमर इसा अबु आर्कुब (जॉर्डन), सुदीप पॉल यांची विविध विषयांवर मार्गदर्शन सत्रे होणार आहेत. ‘डिजिटल डेंटिस्ट्री : क्लिनिकल पर्स्पेक्टिव्ह’ या विषयावर चर्चासत्र होणार आहे.”