पुणे : अहमदाबादमधील चांदखेडा परिसरात घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण गुजरात हादरले आहे. प्रजापती कुटुंबातील दोन लहान मुलींचा मृत्यू सुरुवातीला अन्नातून विषबाधेमुळे झाल्याचे मानले जात होते. मात्र, तपास पुढे सरकत असताना या प्रकरणाने धक्कादायक वळण घेतले आहे.
तपासादरम्यान पोलिसांना घरातून एक डायरी सापडली, जी मुलींची आई भावना प्रजापती हिची असल्याचे समजते. या डायरीतील नोंदींमध्ये मुलगा होण्याची तीव्र इच्छा वारंवार व्यक्त करण्यात आली आहे. पहिल्या मुलीनंतर दुसरे अपत्य मुलगाच असावा, अशी अपेक्षा स्पष्ट दिसून येते. त्यामुळे, मुलगा न झाल्यामुळे निर्माण झालेल्या मानसिक तणावातून किंवा नैराश्यातून हा प्रकार घडला असावा का, याचा तपास पोलीस करत आहेत.
दरम्यान, फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीच्या अहवालाने सुरुवातीचा ‘फूड पॉयझनिंग’चा अंदाज चुकीचा ठरवला आहे. मुलींचा मृत्यू अन्नामुळे नसून ‘सल्फास’ या घातक कीटकनाशकामुळे झाल्याचे स्पष्ट झाले आहे. घरातही या विषाच्या गोळ्या आढळून आल्याने संशयाची दिशा आता कुटुंबाकडे वळली आहे.
या प्रकरणातील आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, कुटुंबाचे स्वतःचे मेडिकल स्टोअर आहे. त्यामुळे विषाचा स्रोत शोधण्यासाठी पोलिसांनी दुकानातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. वडील विमल प्रजापती यांच्या वैयक्तिक आयुष्याचीही चौकशी सुरू असून, त्यांची जीवनशैली, करिअरच्या महत्त्वाकांक्षा आणि परदेशात जाण्याची तयारी या गोष्टी तपासल्या जात आहेत.
आतापर्यंत पोलिसांनी शेजारी, नातेवाईक आणि इतर संबंधित अशा सुमारे २५ जणांचे जबाब नोंदवले आहेत. तसेच, आई-वडिलांच्या फोन कॉल डिटेल्सचीही चौकशी सुरू आहे. सध्या दोन्ही पालक रुग्णालयात उपचार घेत असून, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर होणारी सखोल चौकशी या प्रकरणातील सत्य उघड करण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे.
