प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांचे मत; चार दिवसीय ‘घे भरारी’ प्रदर्शनाचे उद्घाटन
पुणे : “छोटे व महिला व्यावसायिक, घरगुती व्यवसाय करणाऱ्या गृहिणी अशा सगळ्यांचे जवळपास १५० स्टॉल पाहिले. अतिशय दर्जेदार वस्तू आणि व्यवसायाचा दुर्दम्य विश्वास पाहायला मिळाला. कोरोनानंतर होत असलेले हे प्रदर्शन सर्वांसाठीच एक पर्वणी ठरेल. असे महोत्सव, प्रदर्शने महिला उद्योजकांना व्यासपीठ ठरत असून, त्यातून अनेकजणी सक्षमपणे आपला व्यवसाय विस्तारतात, याचा आनंद वाटतो,” असे मत भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा माजी आमदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
छोट्या व महिला व्यावसायिकांचे व्यासपीठ असलेल्या ‘घे भरारी’ फेसबुक ग्रुपतर्फे २८ ते ३१ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत आयोजित चार दिवसीय ‘घे भरारी’ प्रदर्शनाचे उद्घाटन मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. डीपी रस्त्यावरील शुभारंभ लॉन्समध्ये ३१ ऑक्टोबरपर्यंत सकाळी ११ ते रात्री ९ या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे. यावेळी संयोजक नीलम उमराणी-एदलाबादकर व राहुल कुलकर्णी आदी उपस्थित होते.
महाराष्ट्रभरातून चवदार खाद्यपदार्थ, गृहसजावटीच्या वस्तू, हस्तकला, रेडिमेड, कोकणी पदार्थ, डिझायनर ड्रेसेस, हर्बल प्रॉडक्ट्स, आयुर्वेदिक औषधे, अत्तरे, परफ्युम, हॅण्डमेड दागिने, पेपर क्विलिंग, फ्रिज मॅग्नेट, अॅक्रॅलिक गिफ्ट आर्टिकल, फ्रीज बॅग, सुंगधी उदबत्त्या, लाईट वेट पर्स, चंदेरी कलमकारी साड्या, आकर्षक नक्षीकाम केलेल्या ओढण्या, वेगवेळ्या चवीची सरबते, नाचणी, तीळ, शेंगदाण्याचे लाडू, उपवास खाकरा, लहानांसाठी खेळणी असे वैविध्यपूर्ण स्टॉल येथे आहेत.
प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी म्हणाल्या, “एरवी बाजारात पहायला न मिळणाऱ्या अशा नाविन्यपूर्ण व कलात्मक वस्तू येथे मिळतात. यातून महिलांमधील कलागुणांना वाव मिळत आहे. समाजात या प्रकारचे उपक्रम राबवले जाणे गरजेचे आहे. साड्या, दागिने यासह विविध कलाकुसरीच्या व पर्यावरणपूरक वस्तू बनवत महिला स्वतःला व्यवसायिकतेकडे घेऊन जात आहेत.”
राहुल कुलकर्णी म्हणाले, “लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच आवडतील असे १५० स्टॉल येथे आहेत. विविध वस्तू, खाद्यपदार्थ आणि मनोरंजन होईल. प्राजक्ता कोळपकर संचालित प्रा फाउंडेशन मधील विशेष मुलांनी रंगवलेल्या पणत्या, प्रसिद्ध गायिका मनीषा निश्चल यांचा ‘सदाबहार’ हा दोन दिवसांचा गायनाचा कार्यक्रम ‘घे भरारी’ या चार दिवसीय प्रदर्शनातील मुख्य आकर्षण असणार आहे.”
नीलम उमराणी-एदलाबादकर म्हणाल्या, “घे भरारी फेसबुक ग्रुपच्या माध्यमातून महिलांना, स्टार्टअपना व्यासपीठ देण्याचा प्रयत्न आहे. जवळपास ८० टक्के महिलांचा सहभाग या प्रदर्शनात असून, इतर तरुण मुलांचे स्टार्टअप यात आहेत. प्रदर्शनातून महिला व्यावसायिकांना अनेक ग्राहकांना जोडता येते.”