एकपात्री कलाकार परिषदेच्या वतीने महिनाभर एकपात्री कला महोत्सव

एकपात्री कलाकार परिषदेच्या वतीने महिनाभर एकपात्री कला महोत्सव

मधुकर टिल्लू यांचा स्मृतीदिन (१ जून) ‘एकपात्री कलाप्रसार दिन’ म्हणून साजरा होणार१ जून ते २ जुलै दरम्यान ५० पेक्षा अधिक कलाकार करणार एकपात्री कला सादर

पुणे : एकपात्री कलाकार परिषदेच्या वतीने ज्येष्ठ एकपात्री कलाकार मधुकर टिल्लू यांचा २१ वा स्मृतिदिन व हास्यषष्ट्यब्दीपूर्ती वर्षानिमित्त १ जून (स्मृतिदिन) २ जुलै (जन्मदिन) या कालावधीत महिनाभर रोज विविध कार्यक्रम सादर होणार आहेत. तसेच १ जून हा ‘एकपात्री कलाप्रसार दिन’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे. महिनाभर चालणाऱ्या या एकपात्री कला महोत्सवात ५० पेक्षा अधिक कलाकार आपली कला सादर करणार आहेत. या महोत्सवाचे उद्घाटन मंगळवार, १ जून २०२१ रोजी ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक स्वरुपकुमार यांच्या कार्यक्रमाने होणार आहे. ‘श्री व सौ भंपकजी आडमुठे’ हा त्यांचा एकपात्री प्रयोग सादर होणार आहे, अशी माहिती एकपात्री कलाकार परिषदेचे अध्यक्ष दीपक रेगे यांनी दिली.

दीपक रेगे म्हणाले, “मधुकर टिल्लू हे मराठी रंगभूमीवर एकपात्री कलाप्रकार रुजवणाऱ्या पहिल्या पिढीतील कलाकार होते. भालबा केळकर यांच्या विविध नाटकात ते काम करायचे. ‘रंगदीप’ संस्थेच्या संगीत ‘देवमाणूस’ या नाटकातील उत्कृष्ट भूमिकेबद्दल उपराष्ट्रपती बी.डी. जत्ती यांच्यातर्फे उत्कृष्ट अभिनयाबद्दल गौरव व पुरस्कार मिळाला होता. कामामुळे नाटकापासून दूर जावे लागल्यानंतर विनोदी प्रसंग रंगवून सांगण्याची विलक्षण हातोटी असल्याने, १९६१ पासून त्यांनी एकपात्री कला सादरीकरण सुरु केले. विनोदी प्रसंगांची गुंफण करून एकपात्री सादर करता येतो ही पद्धती त्यांनी मराठी रंगभूमीवर आणली. तसेच महाराष्ट्रात एकपात्रीची नवी पिढी निर्माण करण्यात त्यांचे मोठे योगदान होते. टिल्लू कुटुंबातील तीन पिढ्या मधुकर टिल्लू, मुलगा मकरंद टिल्लू, नात हर्षदा टिल्लू गेल्या ६० वर्षांपासून एकपात्री सादर करत आहेत. हा एकपात्री क्षेत्रात, मराठी रंगभूमीच्या इतिहासात देशात व जगातही प्रथमच घडणारा योग आहे.”

“वेडेवाकडे अंगविक्षेप आणि अश्लील कोटीक्रम न करताही विनोद सादर करता येतो, हे टिल्लू यांच्या सादरीकरणाचे वैशिष्ट्य होते. महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर त्यांनी गावोगावी ‘प्रसंग लहान, विनोद महान’, ‘हसायदान’, ‘जिंदादिल’ मराठी शेरोशायरी आदींचे हजारो कार्यक्रम करून रसिकांमध्ये एकपात्री कलाप्रकार रुजवला,” असे उपाध्यक्ष चैताली माजगावकर भंडारी यांनी नमूद केले.

एकपात्री कलाकार परिषदेचे सचिव नरेंद्र लवाटे म्हणाले, “एकपात्री कलाकारांना नवीन दालन निर्माण करणाऱ्या मधुकर टिल्लू यांना सर्व एकपात्री कलाकारांच्या व रसिकांच्या वतीने मानाचा मुजरा म्हणून या महोत्सवाचे आयोजन केले आहे. टिल्लू यांचा स्मृतिदिन विविध कलाकार एकपात्री, कथाकथन, काव्यावर आधारित एकपात्री, द्विपात्री, अभिवाचन, नाट्यप्रवेश असे बहुविध कार्यक्रम सादर करणार आहेत. सदर कार्यक्रम एकपात्री कलाकार परिषदेच्या फेसबुक पेजवरून सर्वांना विनामूल्य पाहता येतील.”
महोत्सवात सहभागी कलाकार
विश्वास पटवर्धन, संदीप बेलवलकर, विलास पोतनीस, राहुल भालेराव, चैताली माजगावकर भंडारी, अंजली शहा, रविंद्र देवधर व सहकारी, विजय कोटस्थाने, स्वाती सुरंगळीकर, प्रशांत पुंड, अंजली कर्‍हाडकर, कल्पना देशपांडे, सुजाता भगत, चैत्राली अभ्यंकर, मंजुषा जोशी, भाग्यश्री देशपांडे, आशिष भोर, नरेंद्र लवाटे, सुरेंद्र गुजराथी, मेधा गोखले, अनुपमा कुलकर्णी, वंदना आचार्य, मृणाल कुलकर्णी, रेवती मिंडे, वृंदा बाळ, पल्लवी परब, मेघा पाटील, दिलीप हल्ल्याळ आणि दीपक रेगे, मंजिरी धामणकर, मंजुषा जोशी आणि सहकारी, दिलीप हल्ल्याळ आणि सहकारी, अरुण पटवर्धन आणि दीपाली निरगुडकर, नयन तळवेलकर, नेहा ठाकूर, मेघा पाटील, श्रीप्रकाश सप्रे आणि सहकारी, प्रभाकर निलेगांवकर, मकरंद टिल्लू आदी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *