पुणे, दि. ११ – “पुस्तके मानवी जीवन, (Books human life) अनुभवविश्व समृद्ध करतात. वाचनाची आवड निर्माण करणारे साहित्य खिळवून ठेवते. मानवी व समाज जीवनाचे विविध पैलू उलगडण्याचा प्रयत्न लेखक करीत असतो. साहित्याचा वेध घेणारी पुस्तके आणि रसिकतेला दाद देणारी माणसे आपल्याभोवती आहेत, हे दिलासादायी आहे,” असे प्रतिपादन कवी व अभिनेते किशोर (सौमित्र) कदम यांनी केले.
कृष्णा पब्लिकेशन्सच्या वतीने कार्लोस मारिया दोमिंगेज लिखित ‘द हाऊस ऑफ पेपर’ (The house off peper)या अनुवादित पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात किशोर कदम बोलत होते. भांडारकर संशोधन संस्थेच्या सभागृहात आयोजित सोहळ्यात शरद पवार फेलोशिपचे समन्वयक व लेखक नितीन रिंढे, कवी व समीक्षक गणेश विसपुते, साहित्यिक प्रवीण बांदेकर,(pravin bandekar) अनुवादक करुणा गोखले, यशवंतराव चव्हाण सेंटरचे मानद व्यवस्थापक दत्ता बाळसराफ, पुस्तकाचे अनुवादक अभिषेक धनगर, प्रकाशक चेतन कोळी, अनिल पवार आदी उपस्थित होते.
किशोर कदम म्हणाले, “चांगल्या पुस्तकांचा शोध घेणे, संग्रह करणे आणि त्याचे वाचन करणे आयुष्याला घडवीत असते. काव्य आपल्याला भावना व्यक्त करण्याचे व्यासपीठ देते. साहित्य हवेहवेसे आणि आनंददायी असावे. पुस्तकांच्या सानिध्यात राहिले, तरी आपल्या आयुष्यात ऊर्जा निर्माण होत राहते.”
नितीन रिंढे म्हणाले, “पुस्तकांवर लिखाण करणे ही एक कला आहे. पुस्तके वाचली जातात की नाही, याची चिंता करण्यापेक्षा पुस्तकांच्या गर्दीत जगणे अतिशय सुंदर असते. पुस्तकांना केंद्रबिंदू मानून मराठीत पुस्तकांवरील पुस्तक येण्याची गरज आहे. पुस्तकांसोबतच पुस्तकांबद्दल मार्गदर्शन करणारा एक तरी मित्र आयुष्यात असावा.”
गणेश विसपुते म्हणाले, “वास्तवाच्या जवळ जाणारी पुस्तके मनाला भिडतात. या पुस्तकात अनेक वास्तविक प्रसंग असून, आपल्याला अचंबित करतात. पुस्तकांचा संग्रह करण्याचे वेड असावे. जगभरातील अनेक चांगली पुस्तके शोधून त्याचा विविध भाषांत अनुवाद झाला, तर सर्व भाषिकांना समृद्ध साहित्य वाचण्याची संधी मिळेल.”
प्रवीण बांदेकर यांनी साहित्याचा मानवी जीवनावर होणारा परिणाम विशद केला. वाचन माणसाला माणूस बनवते. जीवनाला एक नवी दिशा देते. विचार करायला शिकवते. त्यामुळे आपण सर्वांनी पुस्तकांशी मैत्री करा. वाचनामुळे मी घडलो, वाचनामुळेच माझ्यातील साहित्यिक निर्माण झाला व मला वेगळी ओळख मिळाली, असे त्यांनी सांगितले.
करुणा गोखले, दत्ता बाळसराफ, अभिषेक धनगर यांनीही मनोगत व्यक्त केले. चेतन कोळी यांनी प्रास्ताविक केले. मृदगंधा दीक्षित यांनी सूत्रसंचालन केले. अक्षय शिंपी यांनी पुस्तकातील निवडक उतार्यांचे अभिवाचन केले. आभार मृदगंधा दीक्षित यांनी केले.