पतीसह सासू-सासरे, नणंदेविरोधात पैशाची मागणी, शिवीगाळ आणि मारहाणीची तक्रार
पुणे, प्रतिनिधी – शहरातील बावधन परिसरात एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षिका म्हणून काम करणाऱ्या ३८ वर्षीय महिलेस तिच्या पतीने पैशांसाठी वारंवार शिवीगाळ करत तिला मारहाण केली. तसेच तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केला. सासरच्या कुटुंबीयांच्या छळाला कंटाळून महिलेने पती, सासरे, सासू, नणंद आणि तिचा पती यांच्याविरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम ४९८ (अ) नुसार कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला आहे.
कौस्तुभ रमेश पिसाळकर (वय-४०), सासरे रमेश कडूजी पिसाळकर (वय-६६) आणि सासू मंदा रमेश पिसाळकर (वय-६५, तिघे मुळ राहणार – यवतमाळ), नणंद अपूर्वा लक्ष्मीकांत वाघमारे (वय-३७), तसेच तिचा अभियंता पती लक्ष्मीकांत वाघमारे (वय-४०, दोघे राहणार – खराडी, पुणे ) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला आणि तिचे पती कौस्तुभ पिसाळकर यांचे २६ डिसेंबर २०१८ रोजी लग्न झाले असून, त्यांना साडेतीन वर्षाचा एक मुलगा आहे. लग्नानंतर विवाहिता पतीसोबत सुरुवातीला यवतमाळ येथे आणि नंतर पुण्यात बावधन भागात सासरी नांदत होती. त्यावेळी पतीने तो रियल इस्टेटचे काम करतो असे सांगितले होते. मात्र, तो काहीच काम करत नव्हता. त्यानंतर त्याने पत्नीला वारंवार पैशांची मागणी करून त्रास देण्यास सुरुवात केली. जर पत्नीने पैसे दिले नाही तर, तिला शिवीगाळ व मारहाण करत होता.
विवाहितेने संबंधित गोष्ट सासू आणि सासऱ्याने सांगितली असता, त्यांनीही मुलाची बाजू उचलून धरत विवाहितेस नेहमी माहेरहून पैसे, कपडे, सोन्याचे दागिने घेऊन ये, अशी मागणी करत होते. ही मागणी पूर्ण झाली नाही, तर ते पतीचे कान भरून देत. त्यामुळे वारंवार पती हा पत्नीस शिवीगाळ करून मारहाण करत असे. महिलेची नणंद आणि तिचा पती हे पिडीतेविरोधात त्याला वेगवेगळ्या गोष्टी सांगून तक्रार करत होते. त्याचप्रमाणे नंणदेचा पती पत्रिका पाहत असल्याने त्याने सांगितले की, पिडीतेची पत्रिका चांगली नाही. तिच्यामुळे पतीची प्रगती होणार नाही, अशप्रकारे सासूला भरून दिल्याने सासरची लोक महिलेचा वारंवार छळ करत होते. याबाबत पुढील तपास हिंजवडी पोलीस करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.