– भैरवा फिल्म्स निर्मित ‘स्वामी-२’ भक्तिगीताचे दिमाखदार लोकार्पण
पुणे, दि. ३१- ‘अनंतकोटी ब्रह्मांडनायक’, ‘जय जय स्वामी समर्थ’ असा जयघोष अन भक्तिमय वातावरणात ‘स्वामी’ प्रेक्षागृहात अवतरले. स्वामींचा अगाध महिमा ध्वनिचित्रफितीतून मांडणाऱ्या ‘स्वामी-२’ (Swami -2)या भक्तिगीताचे लोकार्पण मंगळवारी झाले. किवळे येथील एमडीएस बँक्वेट्समध्ये आयोजित सोहळ्यात स्क्रीनवर स्वामींची लीला अन प्रेक्षागृहात प्रत्यक्ष स्वामींच्या रूपातील दर्शनाची उपस्थितांनी अनुभूती घेतली.
भैरवा फिल्म्स निर्मित ‘स्वामी’ या भक्तिगीताला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर ‘स्वामी-२’ या पुढील भागाची निर्मिती करण्यात आली आहे. (After the overwhelming response to the devotional song ‘Swami’ produced by Bhairava Films, a sequel, ‘Swami-2’, has been produced.) सत्य घटनेवर व अनुभवावर आधारित या गीतामध्ये युवा उद्योजक डॉ. प्रशांत गवळी यांनी भावस्पर्शी अभिनय केला आहे. मनीष महाजन यांचे दिग्दर्शन, हर्षवर्धन वावरे यांचे गायन, नरहर राहेरकर व ब्रह्मा महाजन यांचे गीत व संगीत संयोजन यामुळे हे गाणेही ‘स्वामी’सारखेच अतिशय दर्जेदार झाले आहे. डॉ. प्रशांत गवळी यांचा संघर्षमय जीवनपट या गाण्यातून उलगडला आहे.
‘स्वामी-२’च्या लोकार्पणावेळी उद्योजक अविनाश तुपे, उस्मान शेख, प्रकाश मंगाने, सुदामा दास, योगिता गवळी, ज्येष्ठ अभिनेते सुनील गोडबोले, ‘स्वामी’ गाण्याचे गायक अवधूत गांधी, अक्षय वाघमारे, सागर दोलताडे, अभिजित बोराटे, अभिनेता प्रतीक लाड, अरबाझ शेख, हंसराज जगताप आदी उपस्थित होते.
(Dr. Prashant gavali said) डॉ. प्रशांत गवळी म्हणाले, “माझ्या आईमध्ये मला स्वामी दिसतात. स्वामींची माझ्यावर मोठी कृपा आहे. स्वामींच्या छायेत, अध्यात्मिक भावनेतून आजवर काम करतो आहे. माझ्या आयुष्यात स्वामींची झालेली कृपा या गीताच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. जगताना येणाऱ्या अडचणी, वेदना दूर करण्याचे काम स्वामी करतात, हे पावलोपावली अनुभवतो आहे. प्रत्येकाला प्रेरणा देणारे हे गीत आहे. पहिल्या भागाला दीड कोटींपेक्षा अधिक स्वामीभक्तांनी पाहिले आहे. या गीतालाही स्वामीभक्तांचा उदंड प्रतिसाद मिळेल, असा विश्वास आहे.”
(Bramha mahajan said)ब्रह्मा महाजन म्हणाले, “स्वामींच्या कृपेने सर्वांचे आयुष्य आनंदी होऊ शकते. भक्तिभावाने, श्रद्धेने स्वामींची सेवा केली, तर सामान्य माणूसही कसा यशस्वी होतो, हे दाखवणारे हे गाणे आहे. पहिल्या भागाला मिळालेला प्रतिसाद आमच्यासाठी ऊर्जादायी होता. प्रशांत गवळी यांचे संघर्षमय जगणे आणि स्वामींच्या आशीर्वादाने त्यांनी केलेली वाटचाल या दोन्ही भागांमधून मांडण्याचा हा प्रयत्न लोकांना नक्की आवडेल.”