वारकरी संप्रदायासाठी विशेष सन्मान योजना राबवाव्यात भालचंद्र सावंत यांची मागणी

वारकरी संप्रदायासाठी विशेष सन्मान योजना राबवाव्यात भालचंद्र सावंत यांची मागणी

 आषाढी एकादशीनिमित्त वारकऱ्यांना अभिवादन
 
पुणे, दि. ५-  “वारकरी संप्रदाय ही महाराष्ट्राच्या भूमीतील एक जगद्विख्यात आणि सशक्त लोकआंदोलनाची ओळख आहे. ही चळवळ फक्त धार्मिक नसून ती सामाजिक न्याय, समता, आणि आत्मोद्धाराचा महामार्ग आहे. संतांच्या शिकवणुकीवर आधारित ही वारी महाराष्ट्राच्या जनतेला एकत्र बांधणारी, प्रेरणा देणारी आहे. या वारकरी संप्रदायाची विशेष सन्मान योजना राबवाव्यात,” अशी मागणी राष्ट्र निर्माण दलाचे अध्यक्ष भालचंद्र सावंत  (Rashtra Nirman Dal President Bhalchandra Sawant)  यांनी केली.
 

देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त वारकरी संप्रदायास मानाचा मुजरा करून भालचंद्र सावंत म्हणाले, “आज व उद्या पंढरपुरात लाखो वारकरी बांधव निःस्वार्थ भक्तिभावाने विठ्ठल-रखुमाईच्या चरणी नतमस्तक होत आहेत. महाराष्ट्राच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचा हा समृद्ध ठेवा आहे. शासनाच्या वतीने वारकरी संप्रदायासाठी विशेष धोरणात्मक सन्मान योजना राबवाव्यात. वारकऱ्यांसाठी मोफत वैद्यकीय तपासणी, सुरक्षित निवास व्यवस्था, स्वच्छता आणि शाश्वत पाणीपुरवठा उपलब्ध करून द्यावा.”

“आजच्या काळात जात, धर्म, भाषा, पंथ याच्या पलीकडे जाऊन वारकरी बंधू-भगिनी विठुरायाच्या नामस्मरणात एकत्र येतात, ते खरे परिवर्तनाचे मूळ आहेत. महाराष्ट्राने या वारकऱ्यांकडून एकात्मतेचा आणि सेवाभावाचा आदर्श घ्यावा. वारकरी संप्रदाय हा शोषित, वंचित, कष्टकरी बहुजन समाजासाठी एक प्रेरणादायी शक्ती ठरला आहे. संत ज्ञानेश्वर संत तुकाराम, संत चोखामेळा, संत सावता माळी, संत बहिणाबाई यांच्यासह सर्वच संतांनी सामाजिक समतेचा दीप प्रज्वलित केला. महाराष्ट्राला भयमुक्त, अन्यायमुक्त आणि संतपरंपरेवर आधारित सशक्त राज्य बनवण्यासाठी संतांची शिकवण अंगीकारावी.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *