चार दिवस दिवाळी, ख्रिसमस, रमजान अंकांचे प्रदर्शन पाहण्याची पुणेकरांना संधी
पुणे, दि. २६- स्वर्गवासी कमलाबाई रसिकलाल धारिवाल पुरस्कृत ‘छंदश्री आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक स्पर्धा पुरस्कार’ (‘Chhandshree International Diwali Numeral Competition Award’ awarded by the late Kamalabai Rasiklal Dhariwal ) वितरण सोहळा व दिवाळी, ख्रिसमस, रमजान निमित्ताने प्रकाशित होणाऱ्या अंकांच्या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. १ ते ४ जुलै २०२५ या कालावधीत सकाळी ११ ते सायंकाळी ८ या वेळेत आयोजित प्रदर्शनाचे उद्घाटन मंगळवारी (ता. १ जुलै) सकाळी ११ वाजता बालगंधर्व रंगमंदिराच्या कलादालनात माजी संमेलनाध्यक्ष व संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते, धारिवाल इंडस्ट्रीजचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाशशेठ धारिवाल यांच्या हस्ते होणार आहे. पुरस्काराचे यंदा नववे वर्ष असून, पुरस्कार वितरण सोहळा संध्याकाळी ५ वाजता गणेश सभागृह, टिळक रस्ता पुणे येथे प्रसिद्ध अभिनेत्री डॉ. निशिगंधा वाड, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, ज्येष्ठ लेखिका सिसिलिया कार्व्हालो, संमेलनाचे माजी अध्यक्ष भारत सासणे यांच्या उपस्थितीत होणार आहे, अशी माहिती दिनमार्क पब्लिकेशनचे दिनकर शिलेदार यांनी दिली. (Dinkar Shiledar of Dinmark Publications gave ) प्रसंगी साहित्यिक माधव राजगुरू उपस्थित होते.
दिनकर शिलेदार म्हणाले, “ही स्पर्धा दिवाळी अंकांसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर घेण्यात येते. यंदा स्पर्धेत ख्रिसमस सणाच्या निमित्ताने वसई येथून प्रकाशित होत असलेल्या अंकांच्या प्रवेशिका, तसेच रमजान सणानिमित्त प्रकाशित होणार ‘नब्ज्’ हा अंक स्पर्धेसाठी स्वीकारण्यात आला आहे. देशभरातून प्रकाशित होणाऱ्या दिवाळी अंकांची माहिती पुणेकरांना व्हावी, यासाठी या अंकांचे प्रदर्शन भरविण्यात येत आहे. कादौडी, पाशिहार हे अंक ख्रिसमसमध्ये कादौडी भाषेत प्रसिद्ध होतात. स्पॅनिश लोक भारतात ५०० वर्षांपूर्वी आले होते; तेव्हा कादौडी भाषेचा जन्म झाला. कादौडी भाषा काही लोकांची बोली भाषा म्हणून प्रचलित झाली. गीत, संक्रमण अशासारखे अंक मराठी भाषेतच प्रसिद्ध होतात. त्यामुळे त्यांना या स्पर्धेत सामावून घेण्यात आले. पुढील वर्षी पश्चिम बंगालमधून बंगाली भाषेतील दुर्गा पूजेनिमित्त प्रसिद्ध होणारे अंक सामील करून घेतले जाण्याचा मानस आहे. यंदा स्पर्धेमध्ये २३४ प्रवेशिका स्वीकारण्यात आल्या आहेत. अमेरिकेतून दोन दिवाळी अंक स्पर्धेत सहभागी झाले आहेत. अशा प्रकारची स्पर्धा आणि प्रदर्शन भारतात प्रथमच सादर करण्याचा मान दिनमार्क पब्लिकेशन्सला मिळणार आहे. काही अंक पूनम एजन्सीच्या श्रीकांत भुतडा यांच्या सहकार्यातून मिळवणार असून, ३०० पेक्षा जास्त अंक प्रदर्शनात असतील, असा विश्वास आहे.”
पुण्यातून मिनाज लाटकर या गेली तीन वर्षे रमजाननिमित्त ‘नब्ज’ नावाचा अंक मराठी भाषेत देवनागरी लिपीत सादर करीत आहेत. कोणत्याही सणानिमित्त प्रसिद्ध होणारे अंक वाचन संस्कृतीचा आधारस्तंभ ठरतात. विविध प्रकारची माहिती त्यामुळे उपलब्ध होते. यामुळेच अंकांचे प्रदर्शन भरवण्याचा घाट घालण्यात आला आहे. इथे धर्माचा विचार बाजूला ठेवला आहे. फक्त वाचन संस्कृतीवर भर देण्यात येतो. आक्षेपार्ह लिखाण केले जात नाही ना, याची काळजी घेण्यात येते. यात कुणाच्या भावना दुखावण्याचा विचार मनात आलेला नाही. त्यातूनही कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या तर मी त्याची आगाऊ माफी मागतो. केवळ वाचकांना चांगले खाद्य मिळावे, हाच त्यामागचा विचार आहे, असे दिनकर शिलेदार यांनी नमूद केले.
छंदश्री आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक स्पर्धा पुरस्कार
सर्वोत्कृष्ट दिवाळी अंकाचे दोन्ही पुरस्कार यावर्षी सकाळ माध्यम समूहाच्या ‘अवतरण’ आणि ‘ॲग्रोवन’ या दिवाळी अंकाने पटकावले. उत्कृष्ट मुखपृष्ठाचा मान लोकमत समूहाच्या ‘दीपोत्सव’ दिवाळी अंकाला मिळाला आहे. त्याचे श्रेय सुप्रसिद्ध चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी यांना जाते. त्याशिवाय उत्कृष्ट दिवाळी अंकांचे प्रथम, द्वितीय आणि उत्तेजनार्थ पुरस्कार असे एकूण ४२ पुरस्कार यावर्षी देण्यात येणार आहेत. अनेक पुरस्कारांत महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, दिव्यमराठी या वृत्तपत्रांनीही उल्लेखनीय कामगिरी केली आहे.