पुणे, दि. १२ – मनमोहक कथक नृत्य, वैविध्यपूर्ण व मधुर गायकी, राग व बंदिशींचे भाव अन ठुमरीने झालेली सांगता अशा शास्त्रीय संगीत, नृत्य व गायनाने सजलेल्या ‘गंगाधर स्वरोत्सव युव-रंग’मध्ये युवा कलाकारांच्या बहारदार सादरीकरणाने रसिकांना मंत्रमुग्ध (The audience was mesmerized by the energetic performances of young artists at the ‘Gangadhar Swaratsav Yuva-Rang’, which was adorned with classical music, dance and singing.) केले. स्वरनिनाद पुणे संस्थेच्या वतीने दोन दिवसीय शास्त्रीय संगीत महोत्सवाचे नुकतेच आयोजन केले होते. युवा पिढीतील प्रतिभावान कलाकारांना व्यासपीठ मिळवून देणारा हा महोत्सव आहे. या महोत्सवाला राहुल देशपांडे, अमोल निसळ, तेजस उपाध्ये, राजस उपाध्ये, रईस खान, अंजली दाते, गायत्री जोशी, धनंजय गोखले आणि मेहेर परळीकर यांसारख्या अनेक नामवंत कलाकारांनी उपस्थित राहून युवा कलाकारांना प्रोत्साहन केले. वृषाली निसळ यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.
पहिल्या दिवशी पंडिता शमा भाटे यांच्या शिष्या ईशा नानलच्या कथक नृत्याने महोत्सवाची सुरुवात झाली. ईशाने ‘वंदना’, ‘चौताल’ (तोडे, तुकडे, तत्कार) आणि ‘अभिनय पक्षात’ ‘एक और एकलव्य’ या कलाकृती सादर करत उपस्थितांची मने जिंकली. त्यांच्या नृत्यातून कथक परंपरेची शुद्धता आणि अभिनयाची खोली दिसून आली. पंडित अजय चक्रवर्ती यांचे शिष्य अनुभव खमारूने यमन रागामध्ये विलंबित एकतालात ‘सुमरन तोरा’ ही बंदिश, ‘झपताल’मध्ये ‘चंद्रमा ललाट पर’ आणि ‘द्रुत एकताल’मध्ये ‘गुन नाही एको’ सादर केले. ‘द्रुत तीन ताला’मध्ये तराणा आणि ‘पिलू रागा’मध्ये ‘पिया के बोल ना बोल’ ही ठुमरी सादर केली. तबल्यावर यशद गायकी, हार्मोनियमवर अभिनय रवंदे यांनी साथ दिली. एस. आकाश यांच्या प्रभावी गायनाने पहिल्या दिवसाची सांगता झाली. रागेश्रीमध्ये आलाप, ‘झपतालात’ गत आणि ‘तीन ताला’मधील द्रुत गत सादर केली. त्यांना तबल्यावर आशय कुलकर्णी यांनी साथ दिली.
महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात अथर्व वैरागकर यांच्या मधुर गायनाने झाली. गुरु ओंकार वैरागकर आणि गायत्री जोशी यांचे शिष्य असलेल्या अथर्वने ‘राग मधुवंती’मध्ये ‘विलंबित एकताल’मध्ये ‘कोयलिया बोले डाल’ आणि ‘द्रुत बंदिश’ ‘काहे छेडत बलिहारी’ सादर केली. तसेच त्यांनी ‘पहाडी रागा’मध्ये ठुमरी सादर करत आपल्या गायन कौशल्याची झलक दाखवली. त्यांना कार्तिकस्वामी आणि माधव लिमये यांनी साथ दिली. तेजस उपाध्ये यांचे शिष्य अमन वरखेडकरने ‘रागेश्री’मध्ये आलाप, जोड आणि झाला सादर केले. तसेच त्यांनी ‘रूपक ताल’ आणि ‘तीन ताला’मध्ये गत सादर करत रसिकांची दाद मिळवली. त्यांना कार्तिक स्वामी यांनी तबल्यावर साथ दिली.
‘स्वरनिनाद’च्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सामूहिक गायनाने दुसऱ्या दिवसात रंगत आणली. त्यांनी ‘खमाज थाटा’तील सरगम गीत सादर केले. ज्यात तिलककामोद ,देस, जयजयवंती, झिंझोटी, कलावती या रागांच्या छटा होत्या. त्यानंतर ‘कल्याण रागा’त तिल्लाना सादर करत त्यांनी उपस्थितांना आनंदित केले. तबल्यावर यशद गायकी, हार्मोनियमवर निषाद जोशी आणि व्हायोलिनवर आशिष बेहरे यांनी साथ दिली. महोत्सवाची सांगता शरयू दातेच्या प्रभावी शास्त्रीय गायनाने झाली. अश्विनी भिडे यांच्या शिष्या असलेल्या शरयूने ‘राग नंद’मध्ये ‘विलंबित एकताल’मध्ये ‘ढूंडु बन सैंया’ ही बंदिश आणि ‘द्रुत तीन ताला’तील ‘मोहे करून दे बिया’ ही बंदिश सादर केली. तसेच त्यांनी साडेसात मात्राच्या तालामध्ये ‘राग प्रतीक्षा’ सादर करत मैफिलीला उंचीवर नेले. त्यांना आशय कुलकर्णी आणि माधव लिमये यांनी साथ दिली.