पुणे, दि. ३० – बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या (बीएआय) महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी जगन्नाथ जाधव (Jagannath Jadhav appointed as state president of Builders Association of India) यांची, तर पुणे केंद्राच्या अध्यक्षपदी अजय गुजर (Ajay Gujar appointed as president of Pune center) यांची निवड करण्यात आली आहे. राज्य सचिवपदी मनोज देशमुख, राज्य कोषाध्यक्षपदी राजेंद्र गांधी, पुणे केंद्राच्या उपाध्यक्षपदी महेश मायदेव व राजाराम हजारे, सचिवपदी सी. एच. रतलानी, तर खजिनदारपदी महेश राठी यांची निवड झाली आहे. नुकत्याच झालेल्या असोसिएशनच्या वार्षिक बैठकीत २०२५-२०२६ या वर्षांकरिता कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
अखिल भारतीय स्तरावर पुणे केंद्राचे प्रतिनिधित्व करण्यासाठी पदाधिकाऱ्यांसह व्यवस्थापकीय समिती आणि सर्वसाधारण परिषद सदस्यांचीही निवड करण्यात आली आहे. मावळते अध्यक्ष सुनील मते यांच्याकडून अजय गुजर यांनी अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला. या निवडीबद्दल आनंद व्यक्त करून अजय गुजर म्हणाले की, ‘बीएआय’चे जन्मस्थान असलेल्या पुणे केंद्राच्या अध्यक्षपदी निवड होणे ही आनंदाची गोष्ट आहे. येत्या वर्षात बांधकाम व्यवसायाशी संबंधित विविध घटकांसाठी उपक्रम, कार्यशाळा, मार्गदर्शन सत्रे, वेल बिल्ट स्ट्रक्चर स्पर्धा, विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण शिबिरे आयोजित करण्याचा मानस आहे. ‘बीएआय’ची स्थापना १९४१ मध्ये काही कंत्राटदारांनी तत्कालीन मुख्य अभियंता व सदर्न कमांडचे ब्रिगेडियर सी. व्ही. एस. जॅक्सन यांच्या मदतीने आणि मार्गदर्शनाने केली होती.
सध्या देशभरात ‘बीएआय’चे २३० पेक्षा अधिक केंद्र, तर दीड लाख सदस्य आहेत. या सदस्यांच्या अडचणी सोडवण्यासह बांधकाम प्रकल्पांत गुणवत्ता जपणे, ज्ञानाचा प्रसार करणे, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना इंटर्नशिप व प्रशिक्षण कार्यक्रम उपल्बध करून देण्यावर येत्या वर्षात भर दिला जाणार आहे. राज्यातील शासकीय ठेकेदारांची स्थिती बिकट असून, ठेकेदारांची जवळपास ९० हजार कोटींची प्रलंबित देयके लवकरात लवकर मिळावीत, यासाठी मुख्यमंत्री व सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा करत असल्याचे जगन्नाथ जाधव यांनी नमूद केले.